डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
सकाळीच एक जोडपं ओपीडीत आलं होतं. त्याला अपचनामुळं दोन-एक उलट्या झाल्या होत्या आणि थोडं गळाल्यासारखं वाटत होतं…
“डॅाक्टर यांना ताबडतोब ॲडमिट करा, कितीही खर्च लागू द्या…” तिनं विनंती-कम आदेश दिला.
“नको, नको मला फक्त एखादी गोळी द्या; थोडी चक्कर आहे फारसं काही नाही…” त्यानं आदेश-कम विनंती केली.
मी काही सुचवावं, यापूर्वीच दोघांची बाचाबाची सुरू झाली!
एस्क्यूज मी… एक मिनिट… श्शऽऽ… दोघंही ऐकेनात…!!
थोड्या वेळात “ओके… तू म्हणशील तसं…” दोघांचंही एकमत झालं… पण आता तो ‘ॲडमिट’ व्हायला तयार झाला; पण आता ती नकार द्यायला लागली तर, ती ‘नको’ म्हणत असताना हा ॲडमिटचा आग्रह करायला लागला…!
हेही वाचा – सुख म्हणजे नक्की काय असतं?
सरतेशेवटी त्यांना एक ‘झेन कथा’ सांगितली…
जपानस्थित सुकूबा पर्वतांवर एक अतिशय सुंदर छोटेखानी झेनमठ होता. तिथं झेनगुरू ‘अकिरा’ आपल्या ओटो आणि हारू या दोन लाडक्या शिष्यांसह राहायचा. हे दोघं शिष्य म्हणजे तसे मनानं अतिशय भोळसट… पण यातल्या ओटोला सतत कसली तरी घाई असायची तर, हारूचं काम कायम आपलं अगदी निवांत असे…
एके दिवशी दोघं एकमेकांशी चर्चा करत होते आणि अचानक उठून ते झेनगुरू अकिरांच्या कक्षात पोहोचले आणि एका सुरात म्हणाले,
“गुरूजी, आम्हाला ज्ञानप्रकाश मिळवायचा आहे… मार्ग दाखवा.”
अकिरांनी मंद स्मित केलं आणि ते पुटपुटले, ”एवढंच ना? नदीपल्याड टेकडीवर एक बोधीवृक्ष आहे, तुम्हाला फक्त एक काम करायचंय, उद्या सूर्योदयापूर्वीच तिथं ध्यानाला बसायचंय.”
दुसऱ्या दिवशी ओटो आपला घाईघाईत पहाट उजाडण्यापूर्वीच टेकडीकडं निघाला आणि धापा टाकत ध्यानास जाऊन बसला…
हारूनं लवकर उठायचं ठरवलं होतं, पण सूर्योदयाला वेळ आहे, म्हणून आता निघू तेव्हा निघू करत करत त्याला उशीर झाला आणि ध्यानाचा तो क्षण निघून गेला!
हेही वाचा – आठवणींचा एक कोपरा हळुवार उघडणारी… ‘शाळा’
संध्याकाळी दोघंही मठात पोहोचले आणि त्यांना बघताच अकिरांनी उत्साहात विचारलं, ”काय मिळवलं?”
“मी लवकर पोहोचायचं म्हणून घाईघाईत निघालो, पण दमल्यामुळं चित्त स्थिर राहूच शकलं नाही…” मान खाली घालत ओटो उत्तरला.
“मी वेळेवर निघू असं ठरवलं होतं, पण… पण, उशीर झाला….” हारूनंही मान खाली घालत उत्तर दिलं.
अकिरा शांतपणे हसले आणि म्हणाले, ”घाई केली की, मन पुढं धावतं आणि वेळकाढूपणा केला की, ते मागंच थांबतं; बोध तेव्हाच मिळतो जेव्हा मन ‘आता’च्या पावलावर टिकून राहातं…”
यथोचित वैद्यकीय उपचाराचंही तसंच असतं. वेळ नाही म्हणून घाईत आणि वेळच वेळ आहे म्हणून सावकाश नव्हे तर, यथायोग्य पद्धतीनं उपचार केले तरंच आजारातून ‘खऱ्या’ अर्थानं मुक्त होता येतं!


