Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बहुरुपी गुलब्या
    ललित

    बहुरुपी गुलब्या

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 11, 2025No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, बहिरुपी, कीर्तनकार गुलब्या, गुलाबराव महाराज, तृतीयपंथी गुलब्या, बहुरुपी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    चंद्रकांत पाटील

    टीव्हीवरच्या त्याच त्याच बातम्या ऐकून कंटाळा आला म्हणून सहज चॅनेल चेंज केलं तर, एका ठिकाणी कीर्तन लागले होते. कीर्तनकारांचा आवाज छान होता. पखवाज आणि टाळांचा आवाज गोड वाटत होता… कीर्तनाची ओवी अतिशय अर्थपूर्ण विचार करायला लावणारी होती. महाराज तल्लीन होऊन प्रत्येक ओळीचे उदाहरणासह स्पष्टीकरण, दृष्टांत सांगत होते… मी कधी असले कार्यक्रम शेवटपर्यत बघत नाही; पण मला महाराजाचं नाव जाणून घ्यायचं होतं म्हणून पाहात होतो. महाराज शेवटच्या चरणावर आले… कार्यकर्त्यांनी हार घातला आणि कार्यकर्त्यांच्या भाषणात महाराजाचं नाव समजलं… गुलाबराव म्हासुरकर, आळंदी!

    मला या माणसाला कुठेतरी बघितल्यासारखे वाटत होतं, पण नेमकं आठवत नव्हते. शेवटी युट्यूबवर त्यांचा फोटो निरखून निरखून पाहिला आणि त्याच्या चाफेकळी नाकावरून अन् भुवयांवरून माझी खात्री झाली की, हा माणूस दुसरा-तिसरा कोणी नसून तो ‘गुलब्या बहुरूपी’च आहे!

    दहा वर्षांपूर्वीची गोष्ट…

    मी हिंजेवाडीला मुलाकडे गेलो होतो. हडपसरला येताना युनिव्हर्सिटी चौकात सिग्नलला माझी गाडी थांबली आणि एक तृतीयपंथी टाळी वाजवत गाडीजवळ आला! गाडीच्या काचा बंद होत्या, मग त्याने काचेवर ‘टकटक’ केले. मला खूप राग आला ही काय ‘पीडा’ म्हणून मी त्याला हाताने पुढे जायला सांगितले. पण तो गेला नाही म्हणून मी त्याच्याकडे रागाने पाहिले, पण माझा राग क्षणात विरघळला. आणि मी बघतच राहिलो….

    खरोखरच तो देखणा होता. चाफेकळी नाक, काजळ घातलेले डोळे, गोर्‍या माणसाने नुकतीच दाढी केल्यावर दिसतात तसे हिरवेगार गाल, पोळीच्या काठासारखे रंगविलेले ओठ…. तेवढ्यात हिरवा दिवा लागला… मग मी लगभगीने पाच रुपये दिले आणि पुढे सरकलो. बराच वेळ त्याचं रूपडं माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं…

    या निमित्ताने आम्ही मलेशिया, थायलंड टूरमध्ये कसे फसलो होतो, त्याची आठवण झाली. आम्ही एका ट्रॅव्हल एजन्सीमार्फत सहलीला गेलो होतो. टूर बँकॉक पटायालाला गेल्यावर आमच्या टूर मॅनेजरने इथला सुप्रसिद्ध ‘कल्चरल शो’ दाखविण्यासाठी एका थिएटरात नेले. त्या शोचं नाव होते ‘अल्काझार शो’! या शोमध्ये उत्कृष्ट संगीतावर मुलींचा ग्रुप अतिशय रेखीव पद्धतीने डान्स करीत होता. जणू काही देवाच्या दरबारात ‘अप्सरा’ आपली अदाकारी पेश करतायत, असे दृश्य! एकंदरीतच ‘नृत्य’ आणि ‘संगीत’ याचा सुंदर मिलाफ!

    थोडक्यात सांगायचं झालं तर, एकदम ‘पैसा वसूल’ कार्यक्रम! शो संपल्यावर त्या नट्या प्रेक्षागृहाबाहेर येऊन प्रेक्षकांना ‘हव्या’ त्या पोझमध्ये फोटो काढून देत होत्या. नंतर बसमधून परत हॉटेलवरती येताना टुर मॅनेजरने सगळ्याना विचारले….

    “कसा काय झाला कार्यक्रम?”

    सगळ्यांनी “छान झाला” म्हणून सांगितले.

    मग पुढे तो म्हणाला मुली कशा होत्या?

    आम्ही म्हणालो, “सुंदर एकदम छान!”

    “बघा, तुम्ही फसलात की नाही!! अहो त्या मुली नव्हत्या… ‘लेडी-बॉईज’ होते!”

    सगळे आश्चर्यचकित झाले. एवढे देखणे किन्नर कसे असू शकतात?  याचा विचार करीत आम्ही पुढील कार्यक्रमास गेलो. तर असे हे किन्नरपुराण…

    तर, मूळ कथेकडे येऊया…

    लगेचच पुढच्या आठवड्यात पुन्हा हिंजेवाडीला जायचा प्रसंग आला… येताना युनिव्हर्सिटी चौकात आलो तर ‘तो’ मला कुठेच दिसला नाही, मग मी निराश झालो आणि म्हणालो… “चला, आता नंतर कधी तरी भेटेल!” म्हणून पुढे आलो तर, तो डाव्या बाजूच्या रस्त्याने लंगडत येत होता. चेहर्‍यावर उत्साह नव्हता… मी गाडी साइडला घेतली आणि त्याची वाट पाहात थांबलो.

    हेही वाचा – एका लग्नाची पुढची गोष्ट…

    तो आला… मी त्याला विचारले, “काय झालय रे?” माझे मराठी ऐकून तो म्हणाला, “तुम्ही सांगलीचे का?”

    मी म्हणालो, “हो! अरे पण तुला मराठी कसं काय येतंय?”

    “दादा, मी तुमच्या भागातलाच हाय, आष्ट्याचा! सकाळी पाय मुरगळलाय, त्यामुळं थोडी सूज आलीय…”

    मी म्हणालो, “गाडीत बस चल, चहा पाजतो तुला.”

    “आता नको दादा, पुन्हा कधी तरी… अभी धंदे का टाइम है!”

    “नाही, मी तुला नंतर भेटणार नाही, मी परदेशी चाललोय!”

    मग तो अनिच्छेनेच गाडीत बसला. मला त्याची स्टोरी ऐकायची होती. त्यासाठी एवढा अट्टाहास… मग पुढच्या हॉटेलात मी त्याला घेऊन गेलो आणि एक कोपरा पकडला…

    मी त्याला विचारलं, “तुझं नाव काय?”

    “गुलाब, पण सगळी मला गुलब्याच म्हणत्यात!”

    “मग पुण्यात कसा आलास?”

    “आलो घरच्या भांडणामुळं…”

    “पण साडीत कसा गेलास?”

    त्यावर तो म्हणाली “गरीबी! पोटासाठी सगळं कराव लागलं… वडील अण्णा कर्नाटकातून कामासाठी आष्ट्याला आले. त्यांना दारूचं व्यसन होतं, मग दारूसाठी ते घरातील वस्तू विकायला मागायचे… मग आईचं आणि अण्णांचं भांडण लागायचं! हे दररोजचं झालं होतं. मी नववीला होतो. एक दिवस अण्णांनी दारू पिऊन आईला खूप मारलं… मग मी अण्णाच्या अंगावर गेलो, पण अण्णानं मला चड्डी ओली होईपर्यंत मारला. त्या रात्री मी घरातून निघून जायचं ठरविले… आणि एका दुधाच्या गाडीत बसून पुण्यात आलो!”

    हेही वाचा – दोन बायकांचा दादला… रंगा कारभारी

    तो दोन क्षण थांबला आणि सांगू लागला, “पुण्यात आलो खरा, पण इथलं काहीच माहीत नव्हतं. मग रस्त्यावर भीक मागायचो आणि फूटपाथवर झोपायचो. मग एक दिवस एका हॉटेलात कामाला लागलो. पडेल ती कामं करू लागलो आणि पोटाला मिळायला लागलं. खाली बेसमेंटमध्ये झोपायला लागलो. मला आईची खूप आठवण यायची, पण वडिलांच्या माराच्या भीतीने घरी जायची इच्छा व्हायची नाही. असे दिवसा मागून दिवस चालले होते…”

    “आमच्या हॉटेलातून पुढच्या चौकातलं सगळं दिसायचं. सिग्नल लागला की, फेरीवाले, भिकारी गाड्यांच्या भोवती जमा व्हायचे आणि भीक मागायचे. त्यात एक हिजडापण होता ‘रेखा’ त्याचं नाव… दिसायला एकदम छान होता. तो टाळ्या वाजवून पैसे मिळवायचा त्याला बर्‍यापैकी पैसे मिळायचे. तो आमच्या हॉटेलमध्ये जेवायला यायचा. त्यामुळे त्याची माझी दोस्ती झाली. तो यूपी साइडचा असावा… त्याला मराठी बर्‍यापैकी येत होते. मग एक दिवस त्याला मी म्हटलं मलापण टाळ्या वाजवायला शिकव की! माझी आई तिकडे गावाकडं असते तिला पैसे पाठवायचे आहेत, ती आता म्हातारी झाली असेल. इथं हॉटेलात राहून कोण पैसे देईल?   मग जरा तो भावनाविवश झाला बहुतेक… त्याला त्याची आई आठवली असेल आणि म्हणाला, ‘अरं गुलब्या, हे लई वाईट असतं! नको त्या भानगडीत पडू!’”

    “पण मी रोजच त्याच्या मागं लागल्यावर एक दिवस तो मला घेऊन गेला, ते थेट एका ब्युटी पार्लरमध्ये… तिथं मेकअप वगैरे केला. साडी नेसविली. ‘काय छान दिसतोस रे!’ तो मला म्हणाला आणि त्यानी माझ्या डोक्यावर हात ठेवला… आणि मी चौकात उभा राहिलो! तिथून पुढे लाइफच बदललं… कधी पाच रुपये बघायला मिळाले नाहीत… तिथं पन्नास, शंभर, दोनशे मिळू लागले… पुढं पुढं मी तरबेज आणि धीट झालो. लोकांना काय आवडतंय त्याचा अभ्यास केला. गाडीत एखादं बाळ असलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला की, त्याची आई खुशीने शंभर दोनशे देऊ लागली. एखादं खट म्हातार्‍याला ‘वो मेरे धरमिंदर म्हटलं’ किंवा ‘एखाद्या बाईला किती छान दिसता तुम्ही! असं म्हटलं की, आपोआप माणसं सुखावू लागली. अहो, स्तुती कोणाला प्रिय नाही? त्याना बरं वाटतं आणि आपोआप हात ढिला होतो. आता तर नेहमी ये-जा करणारी लोक परिचयाची झालीत… त्यामुळे ती न मागताच देतात… “आता महिन्याकाठी 20-25 हजार सहज सुटतात!”

    “सध्या मी आळंदीला राहतो, तिथे मी आईला आणलंय… वडील केव्हाच वारले. मी काय करतो हे अजून आईला माहीत नाही. संध्याकाळी घरी जाताना मेकअप, साडी उतरवितो, शर्ट पँट चढवितो आणि घरी जातो,” त्याने आतापर्यंतचा प्रवास सांगितला.

    “म्हणजे तू खरोखरचा हिजडा नाहीस तर!”

    “नाही हो नाही, फक्त चरितार्थासाठी हा पेशा मी स्वीकारलाय. ‘बहुरूपी’ म्हणा हवं तर! मेकअप केल्यावर माझा चेहरा बाईसारखा दिसतो, शिवाय गोर्‍या रंगाचा वारसा आईकडून मिळालाय. ही सगळी माऊलीची कृपा बाकी काही नाही! पुढे मग यात जम बसला म्हणून हे स्वीकारलंय…”

    “रेखाचं काय झालं?”

    “सुरुवातीला मला रेखाने खूप आधार दिला. तो खरोखरचा हिजडा होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याची हेटाळणी केली. घरातून हाकलून दिले म्हणून तो इथे आला… मला त्याने कधी आपल्या मोहल्ल्यात येऊ दिलं नाही. त्याने मला शपथ घातली होती, केवळ चौकातच हे नाटक कर, इतर वेळी पुरुषासारखा राहा. पुढे तो कुठे गेला मला माहीत नाही…”

    “मग पुढं काय? पुढं म्हणजे लग्न वगैरे?” मी विचारलं.

    “दादा, तुम्ही बरोबर विचारलं… हा धंदा जवानी हाय तोवरच चालणार, त्याच्या पुढं चालणार नाही. म्हणून मी ठरविलंय की, ‘कीर्तनकार’ व्हायचं! तसा माझा आवाज बरा आहे आणि मला त्याची पहिल्यापासून आवड आहे. म्हणून संध्याकाळी कीर्तन शाळेत जातो. एकादशी करतो. पखवाज वाजवितो. ही बघा माझ्या गळ्यात ‘माळ’ आहे. यंदा मी वारीला पण गेलो होतो. दररोज सकाळी माऊलीचं दर्शन घेतो आणि चौकात उभा राहतो. सगळ्या पोलिसांच्या आणि नगरसेवकांच्या ओळखी झाल्यात त्यांचे हप्ते देतो आणि चाललंय माऊलीच्या कृपेने बाकी काही नाय!”

    गुलब्या जे बोलला होता, ते त्याने आज खरे करून दाखविले होते आणि तो गुलाबराव महाराज झाला होता… विचारांच्या तंद्रीत टीव्ही बराच वेळ चालू होता, तो बंद केला. संध्याकाळचे सात वाजलेले. बाल्कनीत येऊन ऊभा राहिलो तर, जवळच्या देवळात माऊलीचे पसायदान लागले होते…

    दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।

    जो जे वांच्छिल तो तें लाहो प्राणिजात ।।

    राम कृष्ण हरी!!


    मोबाइल – 9881307856

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn