वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
श्रीभगवानुवाच : अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः । स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥1॥
आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनानें झणीं मानी । एऱ्हवी विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥39॥ सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगी तोचि संन्यासु । पहातां ब्रह्मीं नाही अवकाशु । दोहींमाजी ॥40॥ जैसें नामाचेनि अनारिसपणें । एका पुरुषातें बोलावणें । कां दोहीं मार्गीं जाणें । एकचि ठाया ॥41॥ ना तरी एकचि उदक सहजें । परि सिनानां घटीं भरिजें । तैसें भिन्नत्व हें जाणिजे । योगसंन्यासांचें ॥42॥ आइकें सकळ संमते जगीं । अर्जुना गा तोचि योगी । जो कर्में करुनि रागी । नोहेचि फळीं ॥43॥ जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुद्धीवीण सहजें । आणि तेथिंचीं तियें बीजें । अपेक्षीना ॥44॥ तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें । जें जेणें अवसरें । करणें पावे ॥45॥ तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं । आणि बुद्धिही करोनि फळवेरीं । जायेचिना ॥46॥ ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं । तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु ॥47॥ वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हें सांडीन बद्धक । तरी टांकोटांकीं आणिक एक । मांडिचि तो ॥48॥ जैसा क्षाळूनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां ॥49॥ गृहस्थाश्रमाचें ओझें । कपाळीं आधींचि आहे सहजें । कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥50॥ म्हणूनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां । आहे योगसुख स्वभावता । आपणापांचि ॥51॥
हेही वाचा – Dnyaneshwari : माझा मराठाचि बोलु कौतुकें, परि अमृतातेहीं पैजासीं जिंकें…
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले – कर्मफलाचा आश्रय न करता, जो कर्तव्य असे कर्म करतो, तोच (खरा) संन्यासी आणि तोच योगी होय. केवळ अग्निहोत्राचा त्याग करणारा अथवा निष्क्रिय मनुष्य (संन्यासी अथवा योगी) नव्हे. ॥1॥
अर्जुना ऐक. या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. त्यांना कदाचित् तू वेगळे मानशील, पण तसे मानू नकोस. कारण, विचार करून पाहिले तर, हे दोन्ही एकच आहेत. ॥39॥ नावाच्या वेगळेपणामुळे भासणारा दुजेपणा टाकून दिला तर, योग तोच संन्यास होय. तत्वत: पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोहोत अंतर राहात नाही. ॥40॥ ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावांनी एकाच पुरुषाला हाक मारतात किंवा दोन रस्त्यांनी एकच मुक्काम गाठतात ॥41॥ किंवा स्वभावत: पाणी तितके एकच, परंतु ते वेगवेगळ्या घागरीतून भरले म्हणजे जसे ते वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे योग आणि संन्यास यांचा वेगवेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे. ॥42॥ अर्जुना ऐक, जो कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही, तोच या जगामध्ये सर्वांना मान्य असलेला योगी होय. ॥43॥ ज्याप्रमाणे पृथ्वी ही अहंकारावाचून सहजच वृक्षादिकांना जन्म देते, आणि त्यांना येणार्या फलांची अपेक्षा करत नाही ॥44॥ तसे कुलक्रमातील वहिवाटीप्रमाणे वर्णाश्रमधर्मातील आचारांना अनुसरून जे कर्म ज्या वेळेला (करणे) प्राप्त आहे ॥45॥ ते त्याप्रमाणेच यथास्थित करतो, परंतु त्यासंबंधी आपल्या ठिकाणी कर्तृत्वबुद्धी घेत नाही, आणि बुद्धीनेही फलापर्यंत जात नाही. (फलाची इच्छा करत नाही) ॥46॥ असा जो असेल, तोच संन्यासी होय. अर्जुना ऐक, तोच खात्रीने योगीराज आहे असे समज. ॥47॥ उलट, जो नित्यनैमित्तिक कर्म करणे प्राप्त झाले तर, त्या कर्माला हे कर्म बंधन करणारे आहे, हे मी टाकीन, असे म्हणतो पण हे कर्म टाकले की, लागलीच तो दुसरे कर्म करण्याचे आरंभितोच. ॥48॥ जसा एक लेप धुवून टाकून लागलीच दुसरा लावावा, त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो. ॥49॥ डोक्यावर अगोदरच स्वभावत: गृहस्थाश्रमाचे ओझे आहेच, ते टाकण्याकरिता संन्यास घेतला तर, त्याबरोबरच पुन: संन्यासाश्रमातील कर्मांचे ओझे तो डोक्यावर घेतो. ॥50॥ म्हणून अग्निसेवा न टाकता आणि कर्माचरणाची मर्यादा उल्लंघन न करता योगाचे सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळाणारे आहे ॥51॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जें दिठीही न पविजे, तें दिठीविण देखिजे…


