Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeललितसासू, सून अन् लेक...

सासू, सून अन् लेक…

विवेक वैद्य

वनिताबाई आणि सुनेचे भांडण झाले. भांडण काही मिटेना. वाढतच गेले. अशातच वनिताबाईंच्या मुलाने (साहजिकच) बायकोची बाजू घेतली. मग वनिताबाईंनी थेट फोन करून लेकीला बोलावले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लेक जावयाला घेऊन वनिताबाईंसमोर हजर झाली. चहापाणी झाले आणि पुन्हा वादाला सुरुवात झाली… वाद वाढतच गेला. सासू आणि सून एकमेकांवर ‘जगणे असह्य करत’ असल्याचा आरोप करत होते. लेकीने आईचीच कड घेतली. जावई त्यांच्या कौटुंबिक कलहात आपण कशाला पडा? म्हणत बाहेर बसून होता. सूर्य डोक्यावर आला तरी वाद शमण्याची चिन्हे दिसेना. शेवटी जावई उठला आणि मधे येत म्हणाला,

“जेवणाचे जरा बघता का? आम्हा तिघांना जेवण करून परत जायचे आहे?”

“तिघे? तिसरा कोण?” सगळ्यांनी एकदम विचारले.

“मी, ही आणि आई! आईंना मी कायमस्वरुपी माझ्याकडे घेऊन जाणार आहे.”

मुलगी आली होती, वनिताबाईंकडून भांडायला… पण आपला नवरा असला काही बॉम्ब टाकेल, अशी तिची अपेक्षा नव्हती. दोन-चार दिवसांकरिता ठीक आहे, आईला घरी नेणे… पण कायमचे? घरी आधीच सासू आहे, तिचीही सेवा करावी लागते, त्यात आईची भर… आणि उद्या या दोघी म्हाताऱ्यांचे एकमेकांशी जमले नाही तर? आपल्या डोक्याला ताप! शिवाय, आईचे काम एकदम टापटीप स्वच्छ. तिथेही ती बारीकसारीक बघायला लागली तर? त्यातच आईला मॉर्डन राहणीमान आवडत नाही. हलकी लिपस्टिक लावलेलीही तिला सहन होत नाही… तिथे त्याबाबतीत तिने कटकट केली तर?  त्यापेक्षा आईला राहूदे इथेच, काय ते सासू आणि सून बघून घेतील.

हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!

इकडे सुनेनेही थोडा विचार केला. कुरबुरी सुरू असल्या तरी वनिताबाईंचा आधार होता तिला! घरातली छोटीमोठी कामे त्या करायच्या. पोरांकडे (नातवांकडे) लक्ष ठेवायच्या. तिला बाहेर कुठे उशीर झाला तरी, घरी सासू असल्याने काळजी नसायची. अधूनमधून पार्टीला जाणारा तिचा नवरा अधूनमधूनच जायचा, नियमित नाही… कारण आईचा धाक होता! आणि शेवटी पेन्शनचे साठवलेले पैसे. ते आपल्याला नाही तरी नातवांडाना नक्की देईल. अंगावर नसले तरी चार-पाच तोळे सोने ठेवले आहे ते नक्की आपल्यालाच देणार. तिकडे गेली आणि सगळे लेकीलाच दिले तर?

हेही वाचा – निखळ मैत्रीचा ‘दीप’

वनिताबाईंना खरेतर हा धक्काच होता. जावयाबद्दल त्यांचे मन अभिमानाने भरून आले. पण जसा विचार करत गेल्या तसतसे ते तितकेसे सोपे नाही, हे त्यांच्या लक्षात आले. नाही म्हटले तरी हे घर हक्काचे होते. सून काहीशी फटकळ असली तरी, मनाने वाईट नव्हती. वयोमानाने आजारपण यायचे, तेव्हा चांगली देखरेख ठेवायची. मुलगाही सूनेची बाजू घेत होता तरी, आपला मान ठेवतो. दर महिन्याला पेन्शन आणून देतो, पण कधीही एक रुपया मागत नाही. नातवंड तर थोडा वेळ दिसले नाही तर, आपण बेचैन होतो. लेकीकडेही तिची सासू आहे तिच्याशी तरी जमवून घेता येईल, पण लेकीशी जमेल? लहानपणापासून काहीशी हट्टी असलेल्या आपल्या मुलीला त्या चांगलच ओळखून होत्या… आणि शेवटी जावयाकडे कायमचे राहायचे, हे काही त्यांच्या जुन्या वळणाच्या मनाला पटेना! नको, आहे हेच बरे आहे… वनिताबाईंनी विचार केला.

जेवण करून निघायला संध्याकाळ झाली. पण जाताना तिघे नाही तर, दोघेच गेले. मुलगी आणि जावईच! कारण वाद मिटला होता…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!