Tuesday, March 10, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : माझा मराठाचि बोलु कौतुकें, परि अमृतातेहीं पैजासीं जिंकें…

Dnyaneshwari : माझा मराठाचि बोलु कौतुकें, परि अमृतातेहीं पैजासीं जिंकें…

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय सहावा

माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेहीं पैजासीं जिंकें । ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥14॥ जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे । वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥15॥ ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा । बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥16॥ सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥17॥ नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी । ते म्हणती उघडली खाणी । रूपाची हे ॥18॥ जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें । बोलु भुजाही आविष्करे । आलिंगावया ॥19॥ ऐशीं इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी । जैसा एकला जग चेववी । सहस्त्रकरु ॥20॥ तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण । पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥21॥ हें असोतु या बोलाचीं ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरलीं । ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥22॥ आतां आत्मप्रभा नीच नवी । तेचि करुनी ठाणदिवी । जो इंद्रियांतें चोरुनि जेवी । तयासीचि फावे ॥23॥ येथ श्रवणाचेनि पांगें- । वीण श्रोतयां व्हावें लागे । हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ॥24॥ आहाच बोलाचि वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे । मग सुखेंसी सुरवाडिजे । सुखाचिमाजि ॥25॥ ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाईल । एरव्हीं आघवी गोठी होईल । मुकया बहिरयाची ॥26॥ परी तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांतें कडसावें । जे एथ अधिकारिये स्वभावें । निष्कामकाम ॥27॥

हेही वाचा – Dnyaneshwari : अर्जुना तूं परिससी, परिसोनि अनुष्ठिसी…

अर्थ

माझे हे प्रतिपादन मराठी आहे हे खरे, परंतु लीलेने अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकील, अशा तर्‍हेची रसयुक्त शब्दरचना मी करीन. ॥14॥ ज्या माझ्या अक्षरांच्या कोवळेपणाच्या मानाने पाहिले असता, सुस्वरांचे निरनिराळे राग कमी योग्यतेचे दिसतील आणि ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचे बल नाहीसे करील. ॥15॥ ऐका, रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील आणि माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियांमधे परस्परांत भांडण लागेल. ॥16॥ सहज पाहिले तर, शब्द हा केवळ कानांचा विषय आहे. परंतु जिव्हा म्हणेल की, हा शब्द माझा रसविषय आहे. नाकाला असे वाटेल की, या शब्दांच्या योगाने मला सुवास मिळावा तर तो शब्दच अनुक्रमे रस आणि सुवास होईल. ॥17॥ या बोलण्याचा ओघ असा आश्चर्यकारक आहे की, तो पाहिला असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल आणि ते म्हणतील, ‘हे आम्हाला रूपविषयाचे कोठारच उघडले आहे.’ ॥18॥ संपूर्ण पद जेथे तयार होईल, तेथे त्याच्या भेटीकरिता अंत:करण बाहेर धाव घेईल आणि शब्दाला आलिंगन देण्यास बाहूही पुढे सरसावतील. ॥19॥ याप्रमाणे इंद्रिये आपल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दाला लगट करतील, पण तो शब्द सर्वांचे सारखे समाधान करेल. ज्याप्रमाणे एकटाच सूर्य सर्व जगाला आपल्या सहस्त्र किरणांनी जागे करतो ॥20॥ त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे, असे समजावे. त्याचा विचार करून अभिप्राय जाणणार्‍याला यात चिंतामणीसारखे गुण दिसून येतील ॥21॥ हे राहू द्या. असे शब्द हीच कोणी चांगली ताटे आणि त्यात मोक्षरूप पक्वान्ने वाढलेली आहेत, अशी ही ग्रंथरचनारूपी मेजवानी मी निष्काम पुरुषांना केली आहे. ॥22॥ आता नित्य नवा आत्मप्रकाश हाच कोणी ठाणदिवा करून, जो इंद्रियांना न कळता जेवतो (उपभोग घेतो); त्यालाच (कैवल्यरूप पक्वान्नांचा) लाभ होतो. ॥23॥ या मेजवानीकरिता श्रोत्यांना श्रवणेंद्रियांचा पंगिस्तपणा टाकावयास पाहिजे. ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेने भोगावयाची आहे. ॥24॥ वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत अर्थरूपी ब्रह्म आहे, त्याच्यशी तद्रूप व्हावे, नंतर सुखामध्येच सुखाने रंगून जावे. ॥25॥ याप्रमाणे चित्ताला जर हळूवारपणा येईल, तरच माझ्या निरूपणाचा उपयोग होईल. नाहीतर मुक्याबहिर्‍याच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल. ॥26॥ परंतु ते आता सर्वच राहू द्या. श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही. कारण या विषयात सहजच निष्काम अंत:करणाचे लोकच अधिकारी आहेत. ॥27॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari :  कैसी दैवाची थोरी नेणिजे, जैसें तान्हेलिया तोय सेविजे…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!