Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeललितदोन बायकांचा दादला… रंगा कारभारी

दोन बायकांचा दादला… रंगा कारभारी

चंद्रकांत पाटील

रंगा कारभारी म्हणजे गुडघ्यापातूर लालकाठाचं धोतर, खादीचा नेहरुशर्ट आणि डोक्याला मुंडासं, कपाळावर गंध, बुक्का लावलेला आणि भराभरा चालणारा गडी… पहाटे पाचला उठून विठ्ठल रूकमाईच्या मंदfरात जायाचा, मंदिर झाडलोट करायचा, सगळं चकाचक करायचा आणि तसाच शेतात जायचा जनावराचं शानघाण बघायचा आणि दूध घेऊन डेअरीला याचा… रंगा कारभारी चालायला लागला म्हणजे त्याच्या कापशीटाइप चप्पलमधून ‘कार- कूर’ असा आवाज निघायचा आणि तो आला हे समजायचं…

तर अशा या कारभाऱ्याला दोन बायका पहिली बायको ‘रकमा’ शेजारच्या पाडळीतली आणि दुसरी ‘लक्ष्मी’ उरणाची. पहिली बायको गोरीपान आणि जरा बारक्या अंगकाठीची… पण कणखर होती. ती घरातली सगळी कामं आवरायची, पण तिला शेतातलं काम जमायचं नाही. शिवाय, तिला एका पाठोपाठ एक अशा दोन मुलीच झाल्या म्हणून कारभार्‍यानं तिला टाकली आणि दुसरी बायको आणली. दुसरी बायको आणल्याबरोबर पहिल्या बायकोला राग आला, ती जी माहेरला गेली ती परत आलीच नाही!

‘दोन पोरी झाल्या म्हणून कोन संसार मोडतं का? चांगल्या पाच पाच पोरी हुत्यात आणि मग पोरगा झाल्याची किती तरी उदाहरणं हाई ती… आणि हे काय म्हणायचं? मुळात कारभार्‍याला आपल्याविषयी प्रेमच नाही म्हणून असं झालंया!’ असा ती विचार करायची आणि मनातल्या मनात कुडत बसायची. वास्तविक कारभारी काय रकमाला घर सोडून जा म्हणाला नव्हता किंवा तुला नांदवित नाही… असं पण म्हणाला नव्हता. त्याची दोन्ही बायका नांदवायची तयारी होती. एक शेतात बरोबर काम करायला होईल आणि दुसरी घरकामाला होईल, या हिशोबाने तो पुढे गेला होता पण तसं घडलं नव्हतं…

रकमाला राग आला होता, ती उलटा विचार करत होती… ‘माझी किंमत ह्यांना कळाली नाही… पण एक दिवस माझी आठवण झाल्याशिवाय राहायाची नाही,’ असं म्हणून ती माहेरात राहू लागली. तिचे आई, वडील, भाऊ सगळे चांगले आणि घरंदाज होते, त्यांनी तिला सांभाळली.

कारभारी तसा हाडाचा शेतकरी होता. जमीन काही फार नव्हती, दोन एकरच होती; पण ‘मव्हाचा टुकडा’ म्हणजे कुठलंही पीक घेतलं तरी भरभरुन उत्पन्न निघत असे… थोडक्यात जमीन चांगली आणि पानस्थळ होती. वारणेचं पाणी सगळ्या शिवारात फिरलं होतं, त्यामुळे उसाचं पीक उत्तम निघायचं. आडसाली ऊस असेल तर सरासरी 80/90 टन पडायचं… जवळच वारणानगर कारखाना असल्याने ऊस वेळत कारखान्याला जायाचा, चांगले पैसे मिळायचे. शिवाय, मोकळं रान झालं की भोंड्यावर हरभरा, भुईमुग, गहू अशी आंतरपिकं तो घ्यायचा. बांधावर भाजीपाला करायचा. महिन्याला कारखान्याची साखर शिवाय सणासुदीला काहीतरी गोडधड श्रीखंड, तुप वगैरे किंवा जादा साखर मिळायची. त्यामुळे घर चालायचे आणि पैसा शिल्लक राहायचा. त्यामुळे पुढच्या काही काळात त्यानं शेजार्‍याची एक एकर जमीन घेतली आणि उत्पन्न वाढलं. शेतात प्रगती झाली, विकास झाला तसेच घरात पण प्रगती आणि विस्तार झाला. दुसर्‍या बायकोला एका पाठोपाठ एक असे दोन मुलगे झाले. तिसरी मुलगी झाली. हळूहळू संसार मोठा होऊ लागला. मग कारभार्‍यानं घर बांधायला काढले पदरात दोन मुले आहेत म्हणून चांगलं सहा जापत्याच मोठं घर बांधलं!

कालांतराने मुले मोठी झाली. पहिल्या बायकोच्या दोन मुलीही मोठ्या झाल्या त्यांची लग्ने त्यांच्या मामांनी केली. दुसर्‍या बायकोच्या दोन मुलांची लग्ने कारभार्‍याने केली, मुलीचेही लग्न झाले, ती नांदायला गेली. मुले हाताखाली आली छोटामोठा व्यवसाय करू लागली. दोन सुना घरी आल्या. नातवंडे झाली. कालांतराने मुले सुना विभक्त झाली आणि एकाच्या तीन चुली झाल्या. दोन मुले वेगळी आणि म्हातारा म्हातारी वेगळे राहू लागले.

अशा तर्‍हेने कारभार्‍याचा संसार चालला होता…

पण कारभार्‍याच्या सुखी आणि चांगल्या चाललेल्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली आणि अचानक एके दिवशी काय झाले कुणास ठाऊक दोन नंबरची बायको लक्ष्मी सकाळी उठली आणि मोरीत तोंड धुवायाला म्हणून गेली, ती तिथेच पडली. तिला रक्ताची उलटी झाली, पोरांनी डॉक्टरला बोलवेपर्यंत सगळा कारभार आटोपलेला होता.

या अचानक आलेल्या संकटाने रंगा कारभारी पार हबकून गेला. भयंकर दु:खी कष्टी झाला. चालत्या गाडीला घुणा लागला. नाही म्हटलं तरी दैनदिन गोष्टींचा प्रश्न गंभीर झाला. बायकू होती, तेव्हा चहापाणी, जेवाणखान सगळं टायमावर मिळत होतं… मुले आणि सुना आपआपल्या संसारात गुंतले असले तरी, मालकीण मात्र काळजीनं कारभार्‍याला बघत होती. आता हे सगळं कोलमडून पडलं होतं…

हल्ली कारभारी पहाटे देवळात गेला की, विठ्ठलासमोर बसून रडायचा… “माझी चालतीबोलती बायकू का नेलीस?” म्हणून जाब इचारायचा… पण झाल्या गोष्टीपुढे काय इलाज चालतो का? अशी स्वत:च स्वत:ची समजूत घालायचा आणि शेतात जायाचा. कारभार्‍याची बायको वारल्यापासून तो अतिशय निराश झाला होता. मग एक दिवस धाकल्या लेकीने कारभार्‍याला दु:ख सांडायला म्हणून चावर्‍याला नेले. तिथ गेल्यावर त्याला जरा बरे वाटू लागले… विसर पडल्यागत झाले पण पावण्याच्या गावात तरी किती दिवस राहणार? म्हणून एके दिवशी तो निघुन आला. घरी आल्यावर त्यानं दार उघडले आणि लाइट लावली आणि पाहतो तो काय…  सगळं घर रिकामं झालेलं होतं! म्हणजे दोन्ही खोल्यातील भांडीकुंडी, गॅस, अंथरून-पांघरून सगळं नाहीसं झालेलं होते. फक्त एक कॉट आणि वलणीवरची काही कपडे तेवढी शिल्लक होती. कारभार्‍यानी बाहेर येऊन सगळ्यास्नी विचारलं… “अरं! इथलं सामान काय झालं?” तर थोरली सुन पुढे आली आणि म्हणाली… “मामंजी आता तुमास्नी सामान काय कामाचं? उगाच धूळ खात पडायचं म्हणून आम्ही दोघींनी वाटून घेतलया!” हे ऐकून कारभारी चाटच पडला आणि म्हणाला, “पर इचारयाचं तरी!” त्यावर धाकली म्हणाली, “अवं मामंजी… त्यात विचारायचं काय? तुम्ही काय परकं हायसा व्हय? जिकडच्या तिकडं सामान असलं म्हजी धुरळा पडत नाही. घर स्वच्छ राहतया…”

कारभार्‍याला बी कळून चुकलं होतं, सुना म्हणत्यात ते बरोबरच हाय. नाहीतरी आता या सामानाचा काय उपयोग? जे होतंय ते बर्‍यासाठी म्हणायचं आणि पुढं चालायचं… असं म्हणून त्यानं मनाची समजूत काढली आणि कामाला लागला.

दिवसामागून दिवस जायाला लागलं दोन्ही सुना अगोदरच सवत्या राहिल्या होत्या, मग  कारभार्‍याच्या पोटाचं हाल सुरू झालं… दररोज नातवासनी खेळीवल्याशिवाय पोटाला तुकडा मिळेनासा झाला… त्यात सकाळी एकीकडं आणि संध्याकाळी दुसरीकडं जेवायची पाळी आली… एकंदरीत सगळं अवघड आणि अशुद्ध व्हायला लागलं. कधी चहा मिळायचा तर कधी नाही, असं व्हायला लागलं… तब्येत ढासळायला लागली.

तिकडे पहिल्या बायकोनं पंन्नाशी ओलांडली… तिचे आई-वडील मरून गेले. भाऊ-भावजयांचे राज सुरू झाले… त्यांचीही मुलं मोठी झाली. ते सगळे तिला चांगले सांभाळून घेत होते. पण तिलाही वाटायचे… “माझा हक्काचा नवरा असताना, मी हे विधवेचं जीणं काय म्हणून जगत असेन? बरं, माझ्या नवर्‍यानं काय मला घराबाहेर काढली नाही… पण माझ्या अंगात मस्ती म्हणून इथं येऊन पडली. माझ्या घरात कवापण हक्कानं चहा करून प्याली असती, मालकाला दिला असता. माझ्या घरात मी कशीपण राहीली असती. इथं नाही म्हटंल तरी, सांगतील ते काम करायला लागतंय. जुळवून घ्यायला लागतंय. आता सवत मेल्या, आपून पुन्हा जावं मालकाकडं आणि नव्यानं एकत्र राहावं… पण म्हातारपणी हे चांगलं दिसल का? आणि मालक तरी नेईल का?” असं तिला वाटायचं.

हेही वाचा – बदनामी… आतून उद्ध्वस्त करणारी!

दररोज संध्याकाळी पारावरच्या भल्या मोठ्या लिंबाच्या झाडावर दिवसभर बाहेर असणारे पक्षी जमा व्हायचे आणि किलबिलाट सुरू व्हायचा… त्याचबरोबर खाली म्हातार्‍याचा कट्टा भरायचा… रामा तुपे, बंडगर आप्पा, नाना पाटील, दादू परीट यांच्या गप्पा सुरू व्हायच्या. आज नेहमीप्रमाणे ग्रुप जमला होता. त्यात दादू परटाची चेष्टा सुरू होती. दादुनं बायको मेल्यावर दुसरं लगीन केल होतं. दादूची बायको तरूण होती.

नाना पाटील दादूला म्हणाला, “बायला काय बी म्हणा, लगीन केल्यापस्न दादू तुझी तब्बेत सुधारली गड्या!”

“न सुधरायला काय झालं, त्येला प्वॉटभर मिळत नव्हतं! म्हणून त्यों हडकुळा झाला होता आता खुराक चालू झाल्यावर बघा गडी कसा ताजातवाणा झालाय!” बंडगर आप्पा म्हणाला.

त्यावर दादू म्हणाला… “होय, आप्पा म्हणत्यात ते खरं हाय! माझ्याकडं सगळं होतं, पण या सुना माझ्याकडं बघत नव्हत्या, म्हणून हाल चाललं होतं… माणसाकडं कितीबी इस्टेट असू द्या, तिचा उपभोग घेता येत नसेल तर, त्येचा काय बी उपयोग नाय…”

“व्हय तेबी खरंहाय म्हणा…” आप्पा म्हणाला.

तोपर्यत कारभारी नातवाला घेऊन पारावर पोहोचला. त्याला बघून रामा तुपे दादूला म्हणाला… “दादू कारभार्‍याला वाईच तुझा अनुभव सांग की, म्हजी त्येच बी दुसरं लगीन करू या…”

त्यावर नाना पाटील कारभार्‍याला म्हणाला.. “गड्या बायकू गेल्यापास्न जरा जास्तीच थकलास…”  त्यावर कारभारी म्हटला, “व्हय त्ये बी खरं हाय म्हणा… पर आता लेका सुनंच्या राज्यात असंच हुयाचं!”

“ती का म्हणून? अजून जमीनजुमला तुमच्या नावावर हाय नवका, मग त्येला काय घाबरायच हाय! कारभारी… मी एक उपाय सांगू का? दादूगत दुसरं लगीन केलं तर कसं हुईल म्हणायचं?” बंडगरअप्पा म्हणाला.

“या वयात कोन पुरगी दिल मला…” कारभारी हसत हसत म्हणाला.

“तुमचं वय किती?”

“आता दिवाळीला पासट चालू झालंया!”

त्यावर नाना पाटील म्हणाला, “अहो आप्पा कारभार्‍याचं म्हणणं बरोबर आहे, इथं तरण्या पोरास्नी पोरी मिळनात आणि म्हातार्‍याला कोन देताया! पण कारभार्‍याला लगीन करायची गरजच काय?”

हेही वाचा – जीवनाचे टार्गेट

“म्हंजी काय म्हणतुयास, जरा उलघाडून सांग की!” आप्पा म्हणाला.

“व्हय त्येच सांगतुया.. आपुन सरळ पहिल्या वैनीला आनलं तर कसं हुईल कारभारी?”

“चांगलच हुईल की, पण ती यील का?”

“का येणार नाय? नक्की ईल…! बघा तरी इचारून?”

कारभार्‍याला नानाचा इचार पटला आणि मीटिंग संपली. संध्याकाळी झोपताना कारभारी विचार करू लागला… “बायला, नाना म्हणतुया तेबी खरंच हाय! नाहीतर आपून असून नसल्यागत झालुया… धड पोटाला मनासारखं नाय, का मनातल बोलायला जवळच कोन नाही… पाडळीकरनीला आणली तर, मनातलं बोलायला यील… शिवाय, तुकडापाणी करील. पण आता ती यील का नाय कुणास ठावं? आता तिला न येण्यासारखं कारण बी काय राहिलं नाय…  सवत तरी मरून गेली. दुसर्‍या बाजूनं विचार केला तर, तिथं ती पावनी म्हणून किती दिवस राहील? आता ती कटाळली असंलच की! शिवाय काम केल्याबिगार कोन पोटाला घालतंय? तशी ती हुशार हाय! नाही म्हणायची नाही. बघूया ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली’…”

मग एके दिवशी कारभारी उठला आणि सरळ पाडळी गाठली. अचानक आलेल्या पावण्याला बघून सगळी अचंबित झाली. चहापाणी झाल्यावर कारभार्‍यानं डायरेक्ट रकमालाच विचारलं, “हे बघा उरणकरीन वारल्या हे तुमास्नी ठावं हाय आणि लॅकसुना आपापल्या संसारात  गुतल्याती आणि आमच्याकडं बघायला कुणाला वेळ नाही. तवा तुम्ही आलासा तर राहिलेली चार वर्स आनंदाने जगू! बघा तुम्हास्नी पटतंय का ते!”

कारभारी एका दमात बोलून मोकळा झाला…

त्यावर रकमा म्हंणाली, “पण आता लोकं काय म्हणतील, म्हातारपणी बाई नांदायला निघाल्या म्हणून…”

“अवं लोक कायबी म्हणू द्यात आपून आपला इचार करायचा असतो. काय करायचं ते आपून ठरावयच असतंया!”

ती काहीच बोलली नाही.

“मग काय?”

“बघू! मला जरा विचार करू द्या. आज तरी मी येत नाही…” रकमा म्हणाली.

“जशी तुमची मर्जी…” म्हणून नाराज मनाने कारभारी उठला आणि धोतार झाडत गावाकडे आला.

रात्रभर तो विचार करीत होता. “बायला रकमाचं बरोबरच हाय म्हणा, लक्ष्मी होती तवा आपून कवा तिची आठवण काढली नाय का विचारपूस केली नाय! आजमातूर ‘बाजारातूनू म्हस सोडून आणावी तसं’ तिला आणायला गेलो,  ह्यो काय माणसांचा व्यवहार नव्हं… नाहीच ती येणार.”

पण दुसर्‍या बाजूनं त्याला वाटायचं… “किती झालं तरी बाईच्या जातीला नवर्‍याच्या घराशिवाय पर्याय नसतो!” असा विचार करीत तळमळत त्यो आड्याकडं बघून बिछान्यावर पडून राहिला… अंधार वाढत गेला.

हिकडं रकमाला बी कळून चुकलं होत की… “किती झालं तरी नवर्‍याच्या घराशिवाय शेवट नाय लागायचा. किती झाल तरी मी सवाशीण आहे आणि आता माझी त्यासनी गरज हाय तवा आपून रूसून माह्यारात राहणं योग्य नाही…” शेवटी तिच्या मनातही शेवट गोड व्हावा, हा विचार होताच. मग तिने रात्रीच भाऊ आणि भावजयीच्या कानावर ही गोष्ट घातली… त्यांना पण आनंद झाला.

दुसऱ्या दिवशी भावजयीने गल्लीतल्या बायका गोळा केल्या, चांगल्या पांच दुरड्या पोळ्याची शिदोरीची तयारी केली. वहिनीला हिरवीगार साडी आणली, बांगड्या भरल्या आणि रकमा नवर्‍याकडे निघाली. माहेर सोडताना रकमा वहिनीच्या गळ्यात पडून रडू लागली…. “माझ्यासाठी तुम्ही लई केलसा म्हणू लागली.” वहिनी म्हणाली, “तुमचा स्वभाव इतका गोड हाय की, तुम्ही आम्हाला कवा परकं वाटला नाहीसा. आता करमायचं नाई. जावा आनंदानं रहावा.” आणि गाडी हलली तसं रकमाच्या बंधूराजानी कारभार्‍याला फोन केला आणि “आम्ही रकमाला घेऊन येतोय म्हणून पुढे कळविले.” त्याबरोबर त्यालाही आनंद झाला.

लगेच कारभार्‍याच्या वाड्यात गडबड सुरू झाली. सुना आणि गल्लीतल्या बायका गोळा झाल्या आणि बघता बघता रकमाची गाडी दारात आली.

एखाद्या नव्या नवरीसारखी रकमा दिसत होती. आज ती पंचवीस वर्षांनी पुन्हा एकदा सासरच्या पायर्‍या चढत होती. ती आत निघाली तर, दारातच सुनांनी तिला थांबविली. भाकरीचा टुकडा ववाळून बाजूला टाकला… पाणी पायावर वतलं… टावेल पुसायला दिला आणि रकमा नव्या पावलानी घरात आली

आणि कारभार्‍याचा दुसरा डाव सुरू झाला…


मोबाइल – 9881307856

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!