मनोज जोशी
व्यक्ती तितक्या प्रकृती, असं म्हटलं जातं. क्षेत्र कुठलंही असो तिथे तयारीचे, दिखाऊपणा करणारे, दुसऱ्यांना शहाणपण शिकवणारे… असे माणसांचे नानाविध प्रकार पाहायला मिळतात. क्षेत्र जितकं मोठं तितकी व्हरायटी जास्त! पत्रकारितेतही अनेक प्रकारची माणसे पाहिली. काहींची विद्वत्ता तोंडात बोटं घालयला लावणारी होती. अफाट वाचन, भाषेवर प्रभुत्व, पक्की वैचारिक बैठक, लिहिण्याची खास शैली… अशी वैशिष्ट्ये त्यांच्यात होती. काही ‘गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास’ असेही होते, पण ते हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. काहींचा अभ्यास चांगला, वाचन चांगले पण केवळ दिखाऊपणा करण्यात सर्व शक्ती खर्ची करणारे होते. त्यातही आपल्या पेशाचा उपयोग ‘वर कमाई’साठी करणारे महाभाग या दिखाऊ सहकाऱ्यांमध्ये होते.
मुंबई-ठाणे परिसरात आघाडीचै दैनिक असलेल्या वृत्तपत्रात तयारीचे तसेच दिखाऊ पत्रकार पाहायला मिळाले. त्यावेळी काहींची मानसिकता सरकारी होती. रिटायरमेन्टनंतर आपल्याला पीएफ, ग्रॅच्युएटी किती मिळेल, याची मोजदाद करणारे… त्यात एक इरसाल पत्रकार होता, त्याचा एका विषयात चांगला अभ्यास होता, पण ऑफिसमध्ये एखादा ज्युनिअर भरती झाला की, त्याला आपल्याकडच्या बातम्या सरकवायच्या आणि आपण पुन्हा ‘दुकानदारी’ किंवा दुसऱ्यांना शहाणपणा शिकवायला मोकळे… मी तिथे नुकताच जॉइन झालो होतो, अनायसे त्याच्या तावडीत सापडलो. तो मला बराच सीनिअर होता. पण सुदैवाने वरच्या पदावर बसलेले त्याला ‘ओळखून’ असल्याने फार त्रास झाला नाही.
चॅनलचं युग सुरू झालं होतं आणि त्यात मराठीतही नवीन संधी उपलब्ध झाल्या. म्हणून मग वेगळा अनुभव म्हणून तिथे प्रवेश केला. पण प्रिंट मीडियासारखं फारसं समाधान मिळालं नाही. साधारणपणे अडीच वर्षांनंतर आणखी एका वृत्तपत्रात जॉइन झालो. हे वृत्तपत्र महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे, मुंबई-ठाण्यातील त्या आघाडीच्या वृत्तपत्रात स्वेच्छानिवृत्तीची योजना (VRS – Voluntary Retirement Scheme) लागू करण्यात आली. VRSपेक्षा ती CRS (Compulsory Retirement Scheme) असल्याचे सांगितले जात होते. त्यात तो इरसाल पत्रकारही होता. माझ्या वृत्तपत्राच्या समूह संपादकांकडे गयावया करून माझ्याच ऑफिसमध्ये तो जॉइन झाला… अन् अनायसे तो माझ्या तावडीत सापडला. कारण, मी पान क्रमांक एकचा वरिष्ठ उपसंपादक होतो आणि वृत्तसंपादक ऑफिसमध्ये नसताना संपूर्ण आवृत्तीची जबाबदारी माझ्याकडे असायची.
अशा रीतीने एकमेकांना गमतीने टोले, टोमणे मारत मारत काम करत होतो. एका शनिवारी संध्याकाळी मोठी बातमी आली. एका कार्यालयाच्या सिक्युरिटीने आपल्या बंदुकीच्या जोरावर संपूर्ण स्टाफला ओलिस ठेवले होते. वरिष्ठांनी आपली सुट्टी नाकारल्याचा राग त्याच्या मनात होता. त्यावेळी राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांनी थेट त्या सिक्युरिटीशी संवाद साधून त्याला शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. कर्मधर्म संयोगाने आमच्या वृत्तपत्राचे मालक आणि गृह राज्यमंत्री हे घनिष्ठ मित्र! आमच्या वृत्तसंपादकांची साप्ताहिक सुट्टी होती. त्यांनी मला फोन करून ‘काळजी करू नकोस, मी घरी टीव्ही समोरच बसलोय, तुला अपडेट देत जाईन. त्यानुसार आपण फायनल बातमी तयार करू,’ असं सांगितलं. तर, ऑफिसमध्ये माझ्या सहकारी इरसाल पत्रकाराने सांगितलं की, ‘त्यांची आज सुट्टी आहे, त्यांना त्रास नको देऊया… मी बघतो काय ते!’
हेही वाचा – Unethical values of journalism : सरकारी घरे, पत्रकारांपुढील मोहक मायाजाल
आता सीनिअर पत्रकार म्हटल्यावर मीही जरासा निश्चिंत झालो. त्यावेळी मोबाइलसाठी इनकमिंग आणि आऊटगोइंगसाठी चार्जेस लागायचे. अशा परिस्थितीत माझ्या त्या सहकारी इरसाल पत्रकाराने लॅण्डलाइनवरून फोन लावला आणि समोरच्याला प्रश्न केला, “आता तिथे काय परिस्थिती आहे?” आम्ही सर्व ऐकत होतो. आपल्या जुन्या सहकाऱ्याला त्याने फोन लावला असेल, असे मी समजलो. त्याने माहिती घेऊन फोन ठेवल्यावर आम्ही सर्वजण त्यांच्याकडे अपेक्षेने बघत होतो. फोन ठेवल्यावर त्याने सांगितलं, “मी आत्ता गृह राज्यमंत्र्यांशीच बोललो, त्यांनी अमुक अमुक सांगितलं…” आम्ही गारच झालो.
साधारणपण पाऊणतासाने पुन्हा तेच… फोन कानाशी लावून “आता काय परिस्थिती आहे?”… तिथे ड्युटीवर एक रिपोर्टर होता. आम्ही आधी महानगर सायंदैनिकात एकत्र काम केलेलं. तो उठून माझ्याकडे आला आणि म्हणाला, “या XXX ला काही अक्कल नाही. हे उद्या सर्व आपल्या अंगाशी येणाराय. मी ऑफिसमध्ये असताना फिल्डवर का गेलो नाही, इथून सुरुवात होईल आणि थेट गृह राज्यमंत्र्यांना हा फोन लावतोय, यावरून हे प्रकरण आपल्यावरच शेकेल. त्यामुळे मी फिल्डवर जातोय. तिथून मी तुला अपडेट देत जाईन… आणि परिस्थिती निवळल्यास फोनवरूनच तुला पूर्ण बातमी देईन. मी आता निघतो…” मी त्याला ‘जा’ म्हणालो… पण त्या ज्येष्ठ पत्रकाराचं हेच सुरू होतं, “आता काय परिस्थिती आहे.”
हेही वाचा – Unethical values of journalism : बँक अधिकारी अन् ‘वजनदार दलाल’ पत्रकार!
रात्री उशिरा परिस्थिती निवळली. त्या सिक्युरिटीने शरणागती पत्करली आणि ओलिसांची सुखरूप सुटका झाली… आणि मला दुसऱ्या दिवसाची चिंता लागून राहिली…
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला समजलं, वृत्तपत्राच्या मालकांचा चर्चगेटला आलिशान फ्लॅट आहे. तिथे त्यांनी आमच्या मंत्रालय प्रतिनिधीला सकाळीच बोलावून घेतलं होतं आणि आपला रिपोर्टर स्पॉटवर का नव्हता, उशिराने का गेला, याचा खुलासा विचारला. त्यातही त्यांचा राग त्या इरसाल पत्रकारावर जास्त होता. त्यांनी विचारलं, “थेट राज्यमंत्र्यालाच ‘’आता काय परिस्थिती आहे?” असा प्रश्न विचारणारा तो कोण आहे? तो राज्यमंत्री काय आपल्यासाठी रिपोर्टिंगला गेला होता का? उलट, ते आपल्या पेपरचा रिपोर्टर कुठे दिसतोय का, हे शोधत होते!” त्या मंत्रालय रिपोर्टरने, “तो पत्रकार सीनिअर आहे. अमुक एका दैनिकातून आला आहे…” वगैरे सांगून मालकाला कसंबसं शांत केलं, असं समजलं.
नंतर त्या पत्रकाराने आणखी एका ठिकाणी वशिला लावून मुंबई विद्यापीठाच्या एका उपक्रमावर आपली वर्णी लावून घेतली. मी त्या पेपरमध्ये आणखी पाच-सहा वर्षं काम केलं आणि नंतर बाहेर पडलो…


