भाग – 9
मुलं घरी परतली, पण आता कोणाच्याही डोक्यातून हा विषय निघून जाणारा नव्हता… दुसरीकडे मात्र डॉक्टर देवदत्त वेगळ्याच विचारात होते. त्यांनी शाल्मलीचे डिटेल्स समोर ठेऊन तिची कुंडली मांडली… ती पाहून ते आश्चर्यचकित झाले… हे योग आधी कुठे तरी पाहिल्याचे त्यांच्या लक्षात आले… नक्की याचीच कमाल आहे… म्हणून ती त्या शक्तीसमोर उभी ठाकली आणि तिच्याच मुळे ते दोघे वाचले! नुसते वाचले नाहीत तर, तेथून ती मोहोरही घेऊन आले…
एका वेगळ्याच सत्याप्रत डॉक्टर देवदत्त येऊन ठेपले होते; पण त्याची त्यांनाच स्पष्टपणे उकल होत नव्हती… त्या विचारातच ते झोपी गेले…
‘देवदत्त… देवदत्त…’ कोणाची हाक ऐकू आली… डोळे किलकिले करून डॉक्टरांनी पाहिलं… एक तेजस्वी स्त्री समोर उभी होती… जणू कोणी देवता असावी!
“देवदत्त… चंदन नगरला तुझ्या मदतीची गरज आहे. सामान्य माणसं विनाकारण भीतीखाली जीवन जगत आहेत. त्यांची काही चूक नसताना होरपळतंय त्यांचं जीवन… तुझा चंदन नगरवर अभ्यास आहे… तू आणि तूच आता त्यांना वाचवू शकतोस, तशी साथही तुला आता उपलब्ध झाली आहे… घाबरू नकोस मी आहेच मदतीला… शाल्मलीच्या माध्यमाने मी मदत करेन तुला… तू आता पुढे हो… खूप मोठा काळ लोटलाय आता आणि तरीही माणसं अजूनही भीतीच्या सावटाखाली आयुष्य जगत आहेत… वाचवशील ना त्यांना? हो, तूच वाचवणार… तेच तुझं भविष्य आहे…” असं म्हणून ती स्त्री लुप्त झाली…
देवदत्त यांनी स्वतःला तपासलं… सगळं काही नॉर्मल होतं… त्या स्त्रीला पाहून त्यांना भीतीही वाटली नाही… उलट आपल्या कामात यशच मिळणार, असा आत्मविश्वास त्यांना जाणवत होता… पण एक प्रश्न अनुत्तरितच होता… कोण होती ती स्त्री? आणि आज मला असं दर्शन कसं दिलं? प्रश्न आणि फक्त प्रश्न…
ब्राह्म मुहूर्त होता… ते तसेच उठले आणि आपल्या स्टडी रूममध्ये गेले… डोक्यात विचारांची चक्रं जोरजोरात फिरत होती… डॉक्टरांचे हात आणि नजर आता पुस्तकं आणि त्यांच्या नोंदींवरून फिरत होती…
आज का कोणास ठाऊक श्लोक आणि शौनकला शांत झोप लागली… शाल्मली मात्र आपल्या स्वप्नात हरवली होती… रोजचाच राजवाडा त्या पाच मूर्ती आणि त्या स्त्रीचं दर्शन… तिचं बोलणं तिने ऐकलं होतं… तिची झोपच उडाली होती… वही-पेन घेऊन स्वप्नात जे काही तिला सांगितलं गेलं, तिनं जसंच्या तसं लिहून काढायचा प्रयत्न केला आणि कधी एकदा सकाळ होतेय, या विचारातच ती पुन्हा झोपी गेली…
जशी जाग आली तशी शाल्मली धावतच विश्वासरावांकडे गेली… रात्रीच्या स्वप्नाबद्दल तिने सर्व बाबांच्या कानावर घातलं. वेळ पाहता विश्वासरावांनी कॉल करून डॉक्टर देवदत्त यांना याची माहिती दिली… त्यांनीही शाल्मलीला ताबडतोब बोलावून घेतलं…
हेही वाचा – देवदत्त यांचे ऐकून शौनक, शाल्मली अन् श्लोक स्तंभितच झाले…
शाल्मली आणि विश्वासराव डॉक्टरांकडे हजर झाले… आज आपल्याला स्वप्नात पुन्हा त्या पाच मूर्ती दिसल्या, पण त्यानंतर पहिल्यांदाच त्या राजवाड्यात पाहिलेल्या फोटोमधल्या तेजस्वी स्त्री आल्या होत्या… त्या म्हणाल्या, ‘मी स्वतः सोबतीस असताना तुम्हाला कोणतंही भय बाळगायचं कारण नाही… खूप काळ लोटला तरी ती आहे तशीच आहे… निर्दोष माणसांना अजूनही त्रास देतेय… संपूर्ण चंदन नगर आज भीतीच्या छायेखाली आहे… आणि यातून त्यांना बाहेर काढायला डॉक्टर देवदत्त यांना तुझ्या साथीची गरज आहे. मी तेथे आहेच, पण मला ती मदत तुझ्यामार्फत करणं सोपं होईल… आज माझं अस्तित्व जगासाठी संपलं आहे… त्या दुष्ट स्त्रीला संपवण्यासाठी ज्या योगांची गरज आहे, ते तुझ्याकडे आहेत म्हणून तूच स्वतःहून मदतीला तयार हो… घाबरू नको तुला काहीही होणार नाही! पण तुझ्यामुळे चंदन नगरची निर्दोष जनता भयमुक्त होईल… निश्चिन्त आयुष्य जगेल…’
शाल्मलीने सगळा वृत्तांत कथन केला. डॉक्टरांनी तिला त्या तेजस्वी स्त्रीचं वर्णन करायला सांगितलं… ते वर्णन डॉक्टरांना दिसलेल्या स्त्रीशी तंतोतंत जुळत होतं…!
डॉक्टरांच्या समोर आता सर्व चित्र लख्खपणे उभं राहिलं… “आपल्याला लवकरात लवकर चंदन नगरला जाणं गरजेचं आहे… शाल्मली तू लगेच तुझ्या मित्रांशी बोलून घे… मी आणि विश्वास आमची टीम तयार करतो… काय विश्वास चालेल ना? तुला न विचारताच या कामात तुला ओढून घेतलं मी…” डॉक्टर देवदत्त म्हणाले.
“हो, डॉक्टर का नाही! हा मी माझा सन्मानच समजेन…” विश्वासरावांनीही त्यांना सोबतीचं आश्वासन दिलं.
शाल्मलीने डॉक्टरांशी बोलून श्लोक आणि शौनकला कॉल करून ‘आपल्याला परवाच चंदन नगरला निघावे लागणार आहे,’ हे कळवले. त्यानंतर त्यांची संमती असल्याचेही तिने डॉक्टरांना सांगितले.
“विश्वास आणि शाल्मली, आपण परवा इथून चंदन नगरला जायला निघणार आहोत; पण तुम्ही दोघे आणि त्या दोघांनाही उद्याच इथे बोलावून घ्यायचं मी ठरवलं आहे… जेणेकरून आपण सगळे एकात्रच इथून निघू… उगाच कोणतंही विघ्न नको, ना निघायला उशीर… मागच्या आपल्या भेटीच्या वेळी काय घडलं ते तुम्हाला समजलं असेल… इथे जवळ येऊन या बंगल्यासमोरून 4 ते 5 वेळा जाऊनही याचं नाव त्यांना दिसलं नाही… हा निव्वळ योगायोग असेल असे नाही! …आणि ती दुष्ट शक्ती आपला खेळ कसाही खेळू शकते…”
डॉक्टरांचं बोलणं विश्वासरावांना आणि शाल्मलीला पटलं होत… म्हणून शाल्मलीने श्लोक आणि शौनकला तसं सूचित केलं…
ठरल्याप्रमाणे सगळे डॉक्टरांच्या घरीच जमले… रात्रभर मुक्काम होता, त्यामुळे गप्पांचा फड जमला… मुलांनीही वेगवेगळ्या विषयांवर डॉक्टरांना बोलायला भाग पाडलं आणि त्यांनाही बऱ्याच दिवसांनी अशा वेगवेगळ्या विषयांवर बोलायला मजा आली… गप्पा मारता मारता पुन्हा एकदा चंदन नगरचा विषय निघाला… श्लोक आणि शौनकने तर पाठपुरावाच केला…
“हे बघा मुलांनो चंदन नगरवर आत्ता बोलायचं मी मुद्दाम टाळत होतो… उगाच तुमच्या मनात भीती आणि चिंता निर्माण होऊ नये म्हणून मी हा विषय तूर्तास टाळत होतो… चंदन नगरचं सत्य कळायला काही तासांचा अवधी शिल्लक आहे, असंच मला वाटत होतं… पण तुम्ही ही मोहीम आता अर्धवट सोडून निघणार नाहीत याचं वचन मात्र मला द्यायला हवं, तरच मी त्यावर बोलेन!”
“सर या मोहिमेच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तुम्हाला साथ देऊ, हे वचन आहे आमचं…” शौनक आणि श्लोकने आश्वस्त केलं…
“काही एक हजार वर्षांपूर्वी चंदन नगर एक सुजलाम सुफलाम राज्य होतं… पुष्कळ सुबत्ता होती… असं ऐकून वाचून आहे की, तिथे सोन्याचा धूर निघे! तात्पर्य प्रचंड संपत्ती, सोनं, हिरे माणकं या चंदन नगरमध्ये होती. त्यावेळी राजा महेंद्रवर्धन राज्य करीत होता… वाढतं वय पाहता राजा महेंद्रवर्धनने राज्यकारभारातून स्वतःहून संन्यास घेऊन राज्य आपल्या मुलाच्या ताब्यात दिलं… राजा राजवर्धन हाही महाप्रतापी होता… प्रजेवर त्याचा जीव होता… कुमार वयातच तो राज्यपदावर बसल्याने अनेक राज्यांच्या राजांची चंदन नगरशी सोयरीक जोडण्याची इच्छा होती, मात्र अवंतीपुरीच्या राजकन्या संघमित्रा यांनी राजवर्धन यांचं मन जिंकलं होतं… मोठ्या थाटामाटात हा विवाह झाला होता… संघमित्रा आणि राजवर्धन अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे, असं संपूर्ण नगर म्हणत होतं आणि राजपरिवाराला भरभरून आशीर्वाद देत होतं…”
हेही वाचा – देवदत्त यांना माहीत होती चंदन नगरची सत्यकथा!
“पण त्याच वेळेस मात्र कुणाच्या तरी इच्छेचा हिरमोड झाला होता आणि त्यातच आज ना उद्या चंदन नगर ला आपल्या पायाखाली आणण्याची प्रतिज्ञा घेतली गेली… ती व्यक्ती होती अहंकारा… नावाप्रमाणेच प्रचंड अहंकारी, प्रचंड इच्छाशक्ती… मग ती पूर्ण करायला कोणत्याही मार्गाचा अवलंब करायला मागे पुढे न बघणारी… तिची लालसाच होती चंदन नगरची स्वामिनी होण्याची… मात्र राजवर्धनच्या या विवाहामुळे तूर्तास तरी तिच्या इच्छेला खीळ बसली होती…. पण हार मानेल ती अहंकारा कुठली! सरळ मार्गाने राजवर्धन आणि चंदन नगर हाती लागत नाही, हे पाहून तिने गैरमार्गाचा अवलंब चालवला… राजवर्धनवर वशिकरणाचे प्रयोग तिने केले… मात्र संघमित्राच्या काही उत्तम योगामुळे तिचे ते प्रयोग विफल होत गेले… संघमित्रा एक कर्तव्यपरायण, सात्विक, धामिर्क स्त्री होती…”
“अहंकारा सुडाच्या आगीत अजूनच पेटून उठली… मात्र एका गाफील क्षणी घात झाला… शिकारी करता गेलेल्या राजवर्धनच्या नजरेत अहंकारा आली… तिच्या वाशिकरणाचा इथे जय झाला… शिकारीहून परतता परतता राजवर्धन अहंकारालाही आपल्यासोबत घेऊन आला. गांधर्व पद्धतीने विवाह करून तिने राणीपद मिळवलं…”
“तिच्या आगमनाने जणू चंदन नगरला दृष्टच लागली! राजवर्धन सतत नशेत राहू लागला… त्याला नशेत ठेवण्याचं काम अहंकारा व्यवस्थित करत होती… संघमित्रापासूनही तो दुरावू लागला… त्याच्या नशेत असण्याचा फायदा घेत अहंकाराने सर्व राज्यकारभार आपल्या हाती घेतला… सर्व प्रजेवर जुलूम जबरदस्ती सुरू केली… राणी संघमित्राचं सर्वस्व ओरबाडून घेतलं… एका सामान्य स्त्रीचं जीवन जगायला भाग पाडलं… संघमित्रा काही महिन्यांची गरोदर असताना तिच्यावर विषप्रयोग करवला… मृत्यू येण्यापूर्वी तिने अहंकाराला शाप दिला – ‘ज्या संपत्तीचा तू हव्यास करतेस ती तुझी कधीच राहणार नाही… वाळवंट होईल तुझ्या या स्थानाचं… तू अशीच तडफडत राहशील… फक्त पौर्णिमेच्या रात्री काही काळासाठी तू या वाळवंटातून बाहेर पडू शकशील…’”
“अहंकाराच्या नाशाचही भाकीत लिहिलं गेलंय, पण कुठे? याचा संबंध फक्त चंदन नगरमध्येच सापडेल म्हणून आपण तिथे जाऊन शोध घेणं गरजेचं आहे…” इतकं बोलून डॉक्टर थांबले पण त्यांना समोर ती तेजस्वी स्त्री आनंदाने आशीर्वाद देताना दिसत होती…
क्रमशः


