वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे । प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥29॥
मग अपाग्नीचां मुखीं । प्राणद्रव्यें देखीं । हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥145॥ एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ॥146॥
अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति । सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥30॥
एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें । प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती ॥147॥ ऐसे मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ । जिहीं यज्ञद्वारा मनोमळ । क्षाळण केले ॥148॥ जया अविद्याजात जाळितां । जें उरलें निजस्वभावता । जेथ अग्नि आणि होता । उरेचिना ॥149॥ जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचें विधान सरे । मागुतें जेथूनि वोसरे । क्रियाजात ॥150॥ विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे । जें द्वैतदोषसंगें । सिंपेचिना ॥151॥
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् । नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥31॥
ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट । तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रे ॥152॥ ऐसे शेषामृते धाले । कीं अमर्त्यभावा आले । म्हणोनि ब्रह्म ते जहाले । अनायासे ॥153॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जो चिंतीना देहभरण, तो महायोगी जाण दैवयोगें…
अर्थ
(कोणी) अपानवायूचे ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात. (म्हणजे पूरक नावाचा प्राणायाम करतात.) (कोणी) प्राणवायूचे ठिकाणी अपानवायूचे हवन करतात, (म्हणजे, रेचक नावाचा प्राणायाम करतात.) प्राणायामाचे ठिकाणी तत्पर असणारे प्राणवायू आणि अपानवायू यांच्या गतींना रोध करतात. (म्हणजे कुंभक नावाचा प्राणायाम करतात.) ॥29॥
मग कोणी अभ्यासाने अपानरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात. पाहा. ॥145॥ कित्येक अपानवायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात, दुसरे किती एक प्राण आणि अपान या दोहोंचा विरोध करतात, त्यांना अर्जुना, ‘प्राणायामी’ म्हणतात. ॥146॥
दुसरे कोणी मिताहारी झालेले प्राणांचे वायूंच्या ठिकाणी हवन करतात. (म्हणजे, प्राणापानादी सर्व वायूंना स्वाधीन ठेवतात) हे सर्व यज्ञवेत्ते. (याज्ञिक) या निरनिराळ्या यज्ञांनी ज्यांची पातके नष्ट झाली (असे जाणावेत). ॥30॥
किती एक (वज्रासनाच्या) मूळबंधाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने, प्राणाचे प्राणांच्या ठिकाणी हवन करतात. (प्राणानेच प्राणाचा लय करतात). ॥147॥ याप्रमाणे हे सगळे यज्ञकर्ते मोक्षाची इच्छा करणारे असतात, त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुऊन टाकलेले असतात. ॥148॥ त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे (स्वरूप) सहजच बाकी शिल्लक राहते, जेथे (ज्या स्वरूपज्ञानाच्या ठिकाणी) अग्नी आणि यज्ञकर्ता हा भेद उरतच नाही. ॥149॥ जेथे यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुऱ्या होतात आणि यज्ञक्रिया संपते तसेच जेथून क्रिया मात्र मागे परतून नाहीशा होतात ॥150॥ जेथे विचाराचा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही, जे द्वैतदोषाचे संपर्काने लिप्त होत नाही ॥151॥
(या) यज्ञाचे अवशिष्ट जे अमृतरुपी फल (ब्रह्म) ते भोगणारे शाश्वत ब्रह्मपदाला प्राप्त होतात. हे कुरुश्रेष्ठा, (या द्वादश यज्ञांपैकी एक देखील) यज्ञ न करणाराला हा मनुष्यलोक देखील प्राप्त होत नाही. (म्हणजे ऐहिक सुखही त्यास प्राप्त होत नाही. मग) परलोक (परलोकातील उत्तम गती) कोठून मिळणार? ॥31॥
असे जे अनादिसिद्ध आणि शुद्ध तसेच ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते, ते ज्ञानरूपी ब्रह्म ब्रह्मनिष्ठ (पुरुष) ‘मी ब्रह्म आहे’ या मंत्राद्वारे सेवन करतात. ॥152॥ याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीस प्राप्त होतात, म्हणून ते सहजच ब्रह्मत्व पावतात. ॥153॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एक द्रव्ययज्ञु म्हणिपती, एक तपसामग्रिया निपजती…


