ॲड. कृष्णा पाटील
सौरभला जॉब मिळून 3 वर्षे झाली. तो अमेरिकेत जाऊन आता 10 वर्षे झालेली. पहिल्यांदा शिक्षणासाठी नंतर जॉबसाठी… न्यूयॉर्कमध्ये तो आता चांगलाच रमला होता. बाबांचा अधूनमधून फोन येतो, “दोन ठिकाणी स्थळं बघून ठेवली आहेत. तू कधी येणार आहेस? एकतर लवकर येत नाहीस अन् आलास तर आठवड्यात परत जातोस…” बाबांचं हे नेहमीचंच होतं. पण त्यांचंही चुकीच नव्हतं. पोरगं अमेरिकेला… मोठ्या पॅकेजचा जॉब… मग त्याच तोलामोलाचं स्थळ हवं. त्यांची अपेक्षा रास्तच होती!
सौरभ विचारांच्या तंद्रीत होता. सोबत वर्गमित्र आणि जॉब पार्टनर सॅम्युअल. सायंकाळचे 6 वाजलेले… बाहेर बर्फ पडत होता… हवेत गारवा होता… दोघेही चालत चालत व्हॅन कोर्टलँडच्या टर्मिनलजवळ आले. आर्किड गार्डनच्या बाकावर थोडा वेळ बसले. थंडीमुळे बोलताही येत नव्हतं. मग सौरभ उठतो… सरळ रूमवर जातो.
असं रोजच चालू होतं. जॉबवरून गार्डन. नंतर रूम. कधी पोटॅटो व्हेजस खायचं, कधी पेस्ट्रीज खाऊन झोपायचं तर, कधी फक्त सँडविच… सौरभ विचार करतो, “लवकरच मॅरेज होईल. दोघेही न्यूयॉकला येऊ. त्यावेळी ही जिंदगी संपून नवीन सुरू झालेली असेल. सौरभ स्वप्न रंगवत झोपी जातो…”
सौरभचे वडील बबनराव जुने मॅट्रिक. बबनराव पाटलांना दोन मुलं. एक सौरभ न्यूयॉर्कमध्ये जॉब करतो आणि दुसरा गौरज बेंगलोरला आयटीमध्ये आहे. चार एकर द्राक्षबाग, सहा एकर ऊस, दोन ट्रॅक्टर… या सगळ्याच्या जोरावर आज दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिलं. सौरभ MBA झाला. गौरज M.Sc phy. आता एकच काळजी. तोलामोलाच स्थळ मिळालं पाहिजे.
तशी दोन स्थळे बघितली. म्हणूनच बबनरावानी सौरभला फोन केला… “लवकर ये. येताना वेळ काढून ये.”
सौरभने रजेचं ॲप्लिकेशन जॉन्सन सरांना दिले. एक महिना रजा मागितली. जॉन्सन सरांनी वीस दिवसांची रजा मंजूर केली.
बॅग आवरून सौरभ 59 सबवे स्टेशनवरून रेलने साऊथवेस्ट एअरलाइनकडे आला. ‘विमान प्रवाशांनी सिक्युरिटी चेकसाठी विंडो नं. 16कडे प्रस्थान करावं…’ अनाऊंसमेंट झाली. पाठोपाठ इंडिकेटरवर सिक्युरिटी चेकची अक्षरे झळकली. सौरभने सॅम्युअल आणि पॉलला शेकहँड केला. ते हसत म्हणाले, “don’t come alone!” सौरभने त्यांचा निरोप घेतला.
हेही वाचा – मायाळू आणि उबदार… आज्जी!
यावेळी मॅरेज फिक्स होणारच! बाबांनी दोन स्थळ बघितली आहेत. एकतरी फायनल होईलच… सौरभला गावाकडची आठवण आली. हायस्कूल… बिघ्याचा मळा… ट्रॅक्टरवरची गाणी… शेतातल्या खोपीमधली पार्टी… विहिरीच्या माचाडावरची उडी… ओढ्यावरचे मोर, लांडोर आणि… जीवनात येणार सहचारिणी. सौरभच्या अंगावर रोमांच आले. विमानात असल्याचं तो विसरून गेला होता!
गौरज आणि एक मित्र सौरभला न्यायला आलेले. मुंबई विमानतळावर येऊन वाट पाहात बसलेले. सायंकाळी 4.30 वाजता सौरभ विमानातून उतरला. इनोव्हातून घरी येताना तिघांच्याही गप्पांना ऊत आलेला. “उद्या सर्वजण कर्जतला जाणार आहोत. यावेळी मात्र सुट्टी नाही… कारण बाबांनी खूपच मनावर घेतलंय. मुलगीपण शिकलेली आहे. B.Sc. आहे. दिसायला सुंदर आहे…” गौरजकडून समजलं.
दुसऱ्या दिवशी सर्वजण कर्जतला गेले. जाधवांच्या घरी अगोदरच निरोप दिलेला होता. मुलाकडून 15 माणसे येत आहेत म्हणून सांगितले होते.
ओटी भरणाचा कार्यक्रम घेतला नाही. दोन्ही घराणी सुशिक्षित. जुन्या प्रथांना बगल दिली होती. साधेपणाने बघण्याचा कार्यक्रम झाला. सौरभलाही या गोष्टी पसंत नव्हत्या. कार्यक्रम पार पडला. मुलाला मुलगी पसंत पडली. मुलीला मुलगा पसंत पडला.
एवढ्यात बबनरावचे जुने पाहुणे आले. ते मूळचे धनगावचे. पण आता कर्जतला स्थायिक झालेले.. “नमस्कार! निदान आम्हाला सांगायचं तरी कर्जतला येणार आहात म्हणून!”
“अहो, सौरभला जास्त दिवस रजा मिळाली नाही. सगळी गडबड. त्यात विसरलो. पण बरं झालं तुम्ही योगायोगानं मोक्याच्या क्षणी आलात…” बबनराव म्हणाले.
सौरभ आणि राजश्री आतल्या खोलीत गप्पा मारत होते. बरोबर मित्र-मैत्रिणी होत्या. त्यांचा गलका बाहेर ऐकायला येत होता. बाहेर सरबत झाला, पोहे झाले. बैठक बसली. अर्धा एक तास झाला…
हेही वाचा – दुसरा दु:खी, आपण सुखी!
धनगावचे पाहुणे आणि बबनराव घराबाहेर गेले. 5-10 मिनिटे कुजबुज झाली. ते परत आले. पुन्हा एकदा चहा झाला. दोन दिवसांत निरोप देतो म्हणून बैठक संपली.
आठ दिवस होऊन गेले. बाबांनी निरोप दिला नव्हता.
सौरभ अस्वस्थ झालेला. तो गौरजला विचारत होता, “काय झालं निरोपाचं?”
गौरज म्हणाला, “मीच तुला विचारणार होतो…”
दोन-तीन दिवस तसेच गेले. बाबांनी सौरभला बोलवून घेतलं अन् म्हणाले, “उद्या बलारपूरला जायचं आहे. राजाराम मानेचा निरोप आहे. मी कुंडली बघून येतो.”
सौरभ म्हणाला, “पण कर्जतचं काय झालं?”
बाबा म्हणाले, “संध्याकाळी बोलू…”
सौरभला आता संतापच यायला लागलेला. कशामुळे लग्न ठरत नव्हतं, हे कळायला मार्गच नव्हता. 3 वर्षे हा खेळ सुरू आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या असूनही लग्न ठरत नव्हतं. आतापर्यंत 15-20 स्थळं पहिली. कधी इकडून तर, कधी त्यांच्याकडून नकार!
हिंगनघाटच्या वसपेठमधल्या देशमुखांनी नकार देण्याचं कारण काय? आज संध्याकाळी सगळं खुलेपणाने विचारू. रात्री आईने जेवायला हाक मारली. सर्वजण जेवायला बसले… आई, सौरभ, गौरज, बाबा, आज्जी…
गौरजनेच विषय काढला… “कर्जतच्या स्थळाचं काय झालं बाबा?”
“हे बघा, ते स्थळ डावलण्यासारखं नाही. मुलगी सुशिक्षित आहे. देखणी आहे. पण त्यांचा आणि आपला पदर जुळत नाही…”
सौरभने विचारलं, “पदर म्हणजे काय?”
बाबा म्हणाले, “ते तुला आताच नाही समजायचं. तुझ्या पोरांच्या लग्नावेळी समजेल. अरे, लग्न ही काय खायची गोष्ट आहे का? सगळ्या आयुष्याचा प्रश्न असतो. आता हे बघ…” असं म्हणते त्यांनी एक कागद सौरभच्या हातात दिला आणि म्हणाले, “खामगावच्या स्थळाचीपण कुंडली जमत नाही. आपण 96 कुळी आहोत. एकदा बट्टा लागला की लागला! मग एवढं ऐश्वर्य मिळवून काय उपयोग?”
नाटेगावच्या देसायांचं स्थळ चांगल होतं. पण तेही आपल्यापेक्षा खालचे आहेत. पुसदच्या पाटलांचं स्थळ एक नंबर. पण ते रयताव पाटील होते. पणुंब्रेच्या मोरेंचं पण स्थळ चांगलं होतं, पण ते तर मूळचे कुठल्याातरी वाडीचे होते.
वसपेठचं जवळ जवळ फायनल झालं असतं. पण त्यांच्याकडून निरोप आला… ते आपल्याला त्यांच्या बरोबरीचे मानत नाहीत. खेडच्या कन्सेच पण चांगलं होतं. पण कुंडलीत गुणच जुळेनात. चार ठिकाणी पत्रिका काढली. निंबाळकरांचं स्थळही चांगलं होतं. पण एवढ्यात कळलं की, त्यांच्या मुलाला केलेली मुलगी कमीतली आहे. तसंच कामतेच्या इंगळेंच्या बाबतीत. त्यांच्या मुलीची चुलती कुठल्यातरी वाडीची आहे…”
सौरभ मधेच म्हणाला, “शिक्षण आणि कर्तृत्वाला काही महत्त्व आहे की नाही?”
बाबा म्हणाले, “आहे की… पण त्यापेक्षा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत!”
सौरभ म्हणाला, “आपला मराठा एकच समाज ना बाबा?”
“हो, पण त्यातपण पोटप्रकार आहेत. तेच म्हणलं तुला, हे समजायला बरीच वर्षे जावी लागतील…”
सौरभची रजा संपली. लग्न ठरलंच नाही… ठरण्याची आशाही नव्हती. उदास होऊन साडेबाराच्या फ्लाइटने सौरभ न्यूयॉर्कला रवाना झाला.
जॉबवर लक्ष लागेना. ऑफिस सुटल्यावर तो डॅकीन डोमच्या कॅफे हाऊसमध्ये आला. सोबत सॅम्युअल होता. पॉल आणि जेन मागून आले. त्यांना उत्सुकता होती. “काय झालं?”
“No any progress…” सौरभने फक्त मान हलवली. सगळ्यांचा mood off झाला.
सूर्य बुडाला होता. गार वारा सुटला होता. कावीळ झाल्यागत वातावरण झालेलं. पहिल्यांदाच त्याने सिगार मागवली. सौरभला आठवलं, भारतातून निघताना आजी म्हणाली होती, “आपले संस्कार विसरू नकोस. आपली संस्कृती विसरू नकोस.” सौरभने कधी मद्याला हात लावला नाही. कधी सिगारेट ओढली नाही. पॉल आणि सॅम्युअल ड्रिंकसाठी आग्रह करत, कधी सिगारेटसाठी आग्रह होत असे. पण सौरभने या गोष्टींना हातही लावला नाही. एवढंच काय तर, ऑफिसमधली रोडा इंटरेस्ट दाखवत होती, पण तिला स्पष्ट सांगितलं… “I am not interested in you. मी माझ्या समाजातील मुलीशीच लग्न करणार आहे. माझ्या घरचे तसे संस्कार आहेत.”
पण आज 3 वर्ष झाली… दर चार महिन्यांनी भारतात जातोय, पण मोकळ्या हातांनीच परत येतोय. यावेळी तर बाबांनी जे सांगितलं, ते धक्कादायकच आहे सगळं. याच गोष्टी महत्त्वाच्या असतील तर, शिक्षणाचा उपयोग काय? कर्तृत्व कशावर मोजायचं? आयुष्याच्या इतिकर्तव्याचं मूल्यमापन काय? एकाच समाजात एवढी भेदाभेद? ही कसली मानसिकता? कधी बदलणार आपला समाज?
त्याच्या डोळ्यापुढं अंधारी आली. क्षणभर वाटलं इथंच रोडाबरोबर लग्न करावं. मॅनहॅटमध्ये फ्लॅट आहेच. तिथंच संसार थाटावा. पण लगेच आजीची आठवण आली, आई-बाबांची आली. त्यांचे संस्कार… बाबांचं ऊर फाटेस्तोवर आपल्यासाठी पळणं… त्याने आणखी एक सिगार मागवली. डोळे तांबरलेले. चेहरा तर्रर झालेला. पॉलला म्हणाला, “यार, सॅम्युअलला बोलावं. आपण पार्क व्हेंडमध्ये जाऊया. आज मी ड्रिंक घेणार आहे.” पॉल आणि जेन सौरभकडे विस्फारलेल्या नजरेने बघतच राहिले…!!!!


