आराधना जोशी
दसरा झाल्यावर वेध लागतात ते, दिवाळीचे. हळूहळू घराघरातून फराळाचा घमघमाट यायला सुरुवात होते. या दिवाळी फराळात झटपट होणारी, न फसणारी आणि चवीला अतिशय सुंदर लागणारी 7 कप बर्फी कशी करायची, ते आपण बघूया.
पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी
विशेष आहार माहिती : शाकाहारी
साहित्य
(ज्या वाटीने बेसन मोजून घ्याल त्याच वाटीने इतर साहित्यही मोजून घ्यावे. म्हणजे प्रमाण बरोबर येईल.)
- बेसन – 1 वाटी
- ताजा नारळ किस – 1 वाटी
- तूप – 1 वाटी
- दूध – 1 वाटी
- साखर – 2 वाटी
- काजू, बदाम पावडर – 1 वाटी
- वेलची पावडर – 1 टीस्पून
हेही वाचा – Recipe : इन्स्टंट बन डोसा
कृती
- जाड बुडाच्या कढईत बेसन मंद आचेवर भाजायला ठेवावे. बेसनाचा रंग बदलू देऊ नका.
- बेसनाचा मंद सुगंध यायला लागला की, त्यात तूप आणि वेलची पावडर वगळून इतर साहित्य एकेक करून घाला आणि व्यवस्थित ढवळून घ्या. गॅस मंद आचेवरच ठेवा.
- आता यात हळूहळू 1 वाटीभर तूप थोडे थोडे घालत मिश्रण मिक्स करायला सुरुवात करा. यात असलेल्या साखरेमुळे मिश्रण एकदम पातळ व्हायला लागते.
- हे मिश्रण मंद गॅसवर सतत ढवळत रहा.
- साधारणपणे 10 ते 12 मिनिटांनी मिश्रणाचा छान गोळा व्हायला सुरुवात होते. यावेळी वेलची पावडर घाला.
- गोळा एकत्रित झाला की गॅस बंद करा.
- तूप लावून ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये या मिश्रणाचा गोळा घेऊन तो चांगला पसरवून घ्या. वरून बदामाचे काप, आवडत असल्यास चांदीचा वर्ख लावा.
- गरज पडली तर लाटण्याने मिश्रण लाटून पसरवा.
- मिश्रण थोडे गार झाले की, त्याच्या वड्या कापा.
- वड्या पूर्ण गार झाल्या की, मगच डब्यात भरा.
- या वड्या बाहेर रूम टेम्प्रेचरवर साधारणपणे तीन दिवस आणि फ्रीजमध्ये आठ दिवस छान रहातात.
तयारीस लागणारा वेळ – 5 मिनिटे
बर्फीसाठी साहित्य भाजण्याचा वेळ – अंदाजे 25 मिनीटे
बर्फीचे मिश्रण गार होण्यासाठी – अंदाजे 1 तास
एकंदर वेळ – 1 तास 30 मिनिटे
हेही वाचा – Recipe : मिक्स हर्ब राईस आणि चीज स्पिनॅच सॉस
टीप
- पारंपरिकपणे या बर्फीसाठी 3 वाट्या साखर वापरली जाते. मात्र अशी बर्फी खायला खूपच गोड होते. त्यामुळे 2 वाट्या साखर पुरेशी आहे. हे प्रमाणही जास्त वाटत असेल तर दीड वाटी साखर आणि अर्धा वाटी काजू-बदाम पावडर असेही साहित्य वापरता येईल.
- या बर्फीत तुम्ही ओल्या नारळाऐवजी डेसिकेटेड कोकोनट पावडरही वापरू शकता. डेसिकेटेड कोकोनट वापरला तर बर्फी लवकर तयार होते. शिवाय तिचे शेल्फ लाइफही वाढते.
- यात बदाम-काजू पावडर ऐवजी 1 वाटी रवाही वापरू शकता किंवा 1 वाटी खवा घातला तरी बर्फीला वेगळा स्वाद येतो.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


