माधवी जोशी माहुलकर
दिवाळीत केले जाणारे फराळाचे पदार्थ हे घरीच केलेले असावेत, नाही का? कमीत कमी चिवडा, चकली आणि बेसनाचे लाडू तरी घरी करावेत! नोकरी करणाऱ्या स्त्रियांना कामाच्या व्यापामुळे हे पदार्थ करायला वेळ नसतो, परंतु वेळ मिळाला तर हे तीन पदार्थ वर्षातून एकदा घरी करावेत. तसंही आजकाल चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळे यासारखे पदार्थ वर्षभर दुकानांमध्ये उपलब्ध असतात. परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळीत हे पदार्थ घरी करण्याचा अनुभव आणि मजा काही वेगळीच आहे. यामध्ये सातत्य आहे आणि आपण स्वतः केलेल्या उत्कृष्ट पाककृतीचे समाधान आहे! गृहिणीने केलेल्या चकली, लाडू यांचे तोंड भरून कौतुक जेव्हा तिच्या घरातील लोक करतात तेव्हा, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान अवर्णनीय असते… ते लगेच तिच्या चेहऱ्यावर दिसून येते. आपण केलेल्या कामाचे कौतुक होतं तेव्हा, ते काम सार्थकी लागल्याचा आनंद केवळ तिचा तिलाच माहीत असतो. तो तिला स्वतःच्या शब्दांत सांगण्याची गरज वाटत नाही. तिच्यासोबत मुलांनाही हे पदार्थ करताना मजा वाटते.
बेसनाचे लाडू करताना किती संयम लागतो, मध्यम, मंद आचेवर जवळ जवळ पाऊण तास बेसन भाजणे, त्याचं परफेक्ट टेक्श्चर आणि रंग येणे, तूप आणि पिठीसाखरेचा तंतोतंत मेळ जमून येणे हे सर्व कौशल्यच आहे, असं मला वाटतं. हा पदार्थ करताना थोडंफार जरी दुर्लक्ष झाले तर, पदार्थ फसलाच समजा, चकली करतानाही तशीच एकाग्रता लागते. एकूण एक चकलीचा आकार परफेक्ट गोलाकार येणे, चकलीची भाजणी चांगल्या प्रकारे जमणे म्हणजे चकली खुसखुशीत आणि खमंग होईल, हे पाहणे फार गरजेचे असतं. प्रमाणबद्ध भाजणी असेल तर चकली मस्त काटे असलेली सुंदरच होते.
रव्याचा लाडू करताना एक तारी पाकाचं गणित कधी कधी जमतं नाही म्हणून आपण तो लाडू करण्याच्या वाटेलाच फारशा जात नाही. तसे न करता वारंवार प्रयत्न केला तर, प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीप्रमाणे केव्हातरी आपल्या प्रयत्नांना यश हे येईलचं नाही का? पूर्वी आपल्या आई, आजी ही मंडळी रवा, बेसनाचे पाकातले लाडू, पिठीचे लाडू, मऊ चकल्या, भाजणीच्या काटेदार चकल्या पायलीने किंवा किलोच्या मापाने करत असत. त्यांच्याकडून देखील हे पदार्थ करत असताना कधी ना कधी तरी चुका झाल्याच असतीलच! परंतु या मंडळींनी त्या गोष्टींचा कधी बाऊ न करता त्यावर सातत्याने प्रयोग करून काहीतरी उपाय शोधून त्या पदार्थांमधे वेळोवेळी सुधारणा करत ते चविष्ट बनवलेच असतील नाही का? म्हणून त्यांचा हा चवदार वारसा पिढी दर पीढी असाच पुढे प्रवाहीत राहिला आणि त्यामुळेच आजही घरोघरी सुगरणी आहेत.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात
हे प्रकार किंवा पाकक्रिया अनेक गृहीणींच्या मेहनतीचा परिपाक आहे, असं मला वाटतं. मी असं नाही म्हणत की, सर्वांनीच हे पदार्थ घरी करायला हवेत किंवा तसा आग्रहही मी धरत नाही. परंतु जर आपल्याला हे पदार्थ चांगले येत असतील, आत्मविश्वास असेल आणि आपल्याकडे वेळ असेल तर कमीत कमी वर्षातुन एकदा दिवाळीत तरी हे पदार्थ नक्की करावेत. काही पिढीजात गोष्टी आणि वारसा पुढे न्यायला आपण गृहिणी खूप महत्त्वाची कामगिरी बजावत असतो, असं मला वाटतं.
हेही वाचा – Recipe : उपवासासाठी भगरचे पॅटीस अन् इडली
या दिवाळीच्या फराळाच्या उद्योगाने अनेक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली आहेत. काहीं उद्योजकांनी आपल्या घरगुती चवीचा, गुणवत्तेचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा आपल्या या खाद्यपदार्थांच्या उद्योगांमधे जसाच्या तसा आणून आपले पदार्थ नावारुपास आणले आहेत. त्यांचे जितके कौतुक करावे, तितके कमीच आहे. या उद्योजकांच्या घरातील स्त्रियांची या बाबतीत असलेली सक्षमता आणि नैपुण्य नक्कीच वाखाणण्यासारखं आहे. काळाची गरज ओळखून आणि मार्केटमध्ये नवीन काय आणता येईल, हे त्यांनी बरोबर ओळखले आणि मोठमोठ्या शहरांमधे आपले दिवाळी फराळाचे उद्योगधंदे वाढवले. आजमितीला परिस्थिती अशी आहे की, फक्त दिवाळीची नवलाई म्हणून वर्षभरात एकदाच केले जाणारे पदार्थ आता बाराही महिने सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे कोणाला दिवाळी आली की, फारशी काळजी करण्याचे कारणच उरलेलं नाही. काही घरांमधे तर पंडित किंवा आचारी बोलावून घेतात आणि किलोच्या मापाने त्याच्याकडून सर्व फराळाचे करवून घेतात.
काळ खरचं बदलला आहे. वेळेच्या अभावी सोयीनुसार हे फराळाचे जिन्नस तयार करणे समजू शकतो, परंतु हे करताना आपण खूप साऱ्या गोष्टी करावयाची मजा विसरतो आहे. त्यातील कलात्मकता, एकाग्रता, व्यग्रता, काटकसरीचे गणित, मापानुसार पदार्थ करणे या सर्व गोष्टी हळूहळू विस्मरणात जायला लागतात. कोणतीही आयती आणि हातात सहज मिळणारी बाब आपल्याला आळशी बनवते, असं मला वाटतं. मी इतकचं सांगेन की, प्रत्येक घरात किमान एक तरी सुगरण आणि अष्टावधानी स्त्री असावी म्हणजे पुढील पिढी कुटुंबवत्सल, संस्कार आणि आधुनिकतेचा तसेच परंपरेचा मेळ साधून आपल्या सणावारांच्या प्रथा आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न करेल, बरोबर आहे ना?


