‘प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी’ या मालिकेतील मागील लेखात आपण विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या शाळेतील तसेच विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेशी संबंधित काही महत्त्वाचे निवडक मुद्दे जाणून घेतले. या लेखात आपण ‘निरामय आरोग्यासाठी विद्यार्थ्यांची सुरक्षितता’ याविषयी माहिती खालील मुद्द्यांच्या माध्यमातून घेणार आहोत.
- शाळेचे प्रवेशद्वार भक्कम तसेच टिकावू असावे. त्याचा कडी-कोयंडा सुस्थितीत असावा.
- शाळा भरल्यावर सुरक्षिततेच्या दृष्टिने प्रवेशद्वाराला कुलुप घालावे, जेणेकरून शाळेत बाहेरून कोणी आत प्रवेश करणार नाही, तसेच कोणीही विद्यार्थी शाळा सुरू असताना बाहेर जाऊ शकणार नाही.
- वर्गातील दिवा, पंखा यांची बटणे मुलांच्या सहजी हाताला लागणार नाहीत, अशा उंचीवर असावीत. मुलांना बटनांशी खेळायला आवडते, म्हणून ही काळजी घेणे आवश्यक आहे.
- डब्याच्या पिशव्या ठेवण्यासाठी वर्गात भिंतींवर खिळ्यांची सोय केली असल्यास खिळे मुलांच्या उंचीपेक्षा अधिक वर असावेत. मुलं वर्गात पळापळ करतात, दंगामस्तीत काही वेळा ढकला-ढकली करतात. अशा वेळी मुलांना इजा होऊ नये, म्हणून ही काळजी अवश्य घ्यावी.
हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : शाळा तसेच मुलांची स्वच्छता
- वर्गात टोकदार वस्तू, उदाहरणार्थ कात्री, स्क्रू-ड्रायव्हर इत्यादी मुलांच्या हाताला येणार नाहीत, याची काळजी जरूर घ्यावी.
- मुलांना खडू तोंडात घालण्याची तसेच डस्टरशी खेळताना एकमेकांना इजा करण्याची शक्यता असते, म्हणून खडू आणि डस्टर मुलांच्या हाताला येणार नाहीत, ही काळजी घेणे गरजेचे आहे.
- पाटीवर लिहिण्यासाठी वापरायच्या पेन्सिली लांब असाव्यात, कारण मुलं पेन्सिलीचे छोटे तुकडे नाकात घालण्याची दाट शक्यता असते.
- बालशाळेत डबा खाणे, हा अभ्यासाचा एक भाग असतो. डबा खाल्ल्यावर सेविका वर्गाची स्वच्छता करतात, त्यावेळेस शिक्षिकेने मुलांबरोबर वर्गाबाहेर थांबून मुलं दंगामस्ती करणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. हे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने महत्त्वाचे आहे.
- मुलांना शी-शूसाठी नेताना मुले ढकला-ढकली करणार नाहीत, याबाबत सेविकेने / शिक्षिकेने दक्षता घ्यावी.
- स्वच्छतागृहात मुलं पाय घसरून पडणार नाहीत, याबाबत योग्य खबरदारी घ्यावी.
- शाळेत मुलांसाठी पटांगण असल्यास काही मुद्द्यांकडे विशेष लक्ष द्यावे. जसे – मुलांची खेळणी सुस्थितीत असणे, त्यांचे स्टॅन्ड भक्कम असावेत, घसरगुंडीची उंची योग्य असावी, पटांगणावर मुलांच्या पायाला काही टोकदार लागून दुखापत होणार नाही… इत्यादी.
- मुलांसाठी ने-आण करण्याच्या बस / वाहन यात महिला मदतनीस / सुरक्षारक्षक असणे नितांत आवश्यक आहे.
हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : माहितीपत्रकातील मुद्दे
विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी त्यांच्या स्वच्छतेबरोबर सुरक्षितता देखील अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सेविका, शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका या सर्वांचीच असते आणि म्हणूनच सर्वांनी कायमच अतिशय दक्ष व जागरूक राहणे आवश्यक आहे.
क्रमश:


