वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः । कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥15॥
मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशियाचि जाणोनि मातें । कर्मे केलीं समस्तें । धर्नुधरा ॥82॥ परी तें बीजें जैसीं दग्धलीं । नुगवतीचि पेरलीं । तैशीं कर्मेंचि परि तयां जाहली । मोक्षहेतु ॥83॥ एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना । आपुलिये चाडे सज्ञाना । योग्य नोहे ॥84॥
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः । तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥16॥
कर्म म्हणिजे तें कवण । अथवा अकर्मा काय लक्षण । ऐसें विचारितां विचक्षण । गुंफोनि ठेले ॥85॥ जैसें कां कुडें नाणें । खर्याचेनि सारखेपणें । डोळ्यांचेहि देखणें । संशयी घाली ॥86॥ तैसे नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिंवसिजत आहाति कर्में । जे दुजी सृष्टि मनोधर्में । करूं शकती ॥87॥ वाचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी । म्हणोनि आतां तेचि परियेसीं । सांगेन तुज ॥88॥
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः । अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥17॥
तरी कर्म म्हणिजे स्वभावें । जेणें विश्वाकारु संभवे । ते सम्यक आधीं जाणावें । लागे एथ ॥89॥ मग वर्णाश्रमासि उचित । जें विशेष कर्म विहित । तेंही वोळखावें निश्चित । उपयोगेंसीं ॥90॥ पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरूपें । येतुलेनि येथ कांही न गुंफे । आपैसेंचि ॥91॥
हेही वाचा – Dnyaneshwari : माझे अजत्वें जन्मणें, अक्रियताचि कर्म करणें…
अर्थ
अशा प्रकारे मला जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी कर्म केले, म्हणून पूर्वीच्यांनी (जनकादिकांनी) परंपरागत केलेले कर्मच तूही कर. ॥15॥
अर्जुना, पूर्वी जे मुमुक्षू होऊन गेले, त्यांनी मी असाच आहे, हे जाणून सर्व कर्मांचे आचरण केले. ॥82॥ परंतु भाजलेले बी जरी पेरले तरी उगवत नाही, त्याप्रमाणे त्यांची ती कर्मे खरी, पण त्यांना कर्मबंधनातून सोडविण्याला तीच कारण झाली. ॥83॥ याबाबतीत अर्जुना, आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. हा कर्माकर्माचा विचार जाणत्या पुरुषालादेखील आपल्या बुद्धीने करता येईल, असा नाही. ॥84॥
कर्म कोणते आणि अकर्म कोणते, या विषयासंबंधाने शहाण्या पुरुषांनाही भ्रम पडतो. जे जाणल्याने तू अशुभ अशा संसारापासून मुक्त होशील, ते कर्म मी तुला सांगतो. ॥16॥
कर्म कशाला म्हणावे, अथवा अकर्माचे लक्षण काय याचा विचार करता करता चिकित्सकही घोटाळ्यात पडतात. ॥85॥ ज्याप्रमाणे खोटे नाणे हुबेहूब खर्यासारखेच दिसत असल्यामुळे परीक्षकांच्याही नजरेला संशयात घालते ॥86॥ त्याप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य अंगी असलेले (पुरुषदेखील), आम्ही नैष्कर्म्य स्थितीस पोहोचलेलो आहोत, या भ्रमामुळे कर्माच्या पाशात सापडतात. ॥87॥ याबाबतीत चांगले चांगले दूरदर्शी देखील मूढ बनतात. तेथे बिचार्या मूर्खांची काय कथा ? म्हणून आता तीच गोष्ट (कर्माकर्मविवेक) तुला सांगतो, ऐक. ॥88॥
कर्म (सामान्य – भूतभावोद्भवकर) म्हणजे काय, हे जाणले पाहिजे. विकर्म (विशेष कर्म, विहित कर्म) म्हणजे काय, हेही जाणले पाहिजे. त्याचप्रमाणे अकर्मही (निषिद्ध कर्म) जाणले पाहिजे. (कारण) कर्माची गती (व्याप्ती) गहन आहे. ॥17॥
तर ज्याच्या योगाने स्वभावत: (आपोआप) हे विश्व आकाराला येते, त्याला कर्म म्हणतात; या ठिकाणी त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिल्याने करून घेतले पाहिजे. ॥89॥ मग वर्ण आणि आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून (वेदात) सांगितले आहे, त्याची देखील त्याच्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. ॥90॥ त्यानंतर ज्याला निषिद्ध (कर्म) म्हणतात, त्याचेही स्वरूप ओळखणे जरूरी आहे. या ठिकाणी एवढे झाले म्हणजे (मनुष्य) मग सहजच कर्म करीत असला तरी, त्यात गुंतत नाही (कर्माने बद्ध होत नाही.) ॥91॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एथ कर्मचि फळसूचक, मनुष्यलोकीं…


