डॉ. किशोर महाबळ
शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेत परीक्षक म्हणून गेल्यावर अनेकदा असे लक्षात आले की, शेकडो विद्यार्थी असलेल्या शाळांतून दरवेळेस तेच तेच विद्यार्थी स्पर्धक म्हणून पाठविले जातात. वक्तृत्व गुण असलेले शाळेतील एक-दोन विद्यार्थी निवडले की, शाळेतील शिक्षकांना समाधान वाटते आणि मग तेच-तेच विद्यार्थी स्पर्धेत पाठविले जातात. वक्तृत्व गुण असलेले विद्यार्थी शोधण्याचा शाळांनी जर नीट प्रयत्न केला तर, प्रत्येक शाळेत अगदी सहजगत्या असंख्य विद्यार्थी सापडतील. शाळेतील प्रत्येक मुला-मुलीला आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली तर, हे असंख्य विद्यार्थी सहजगत्या सापडतील. मात्र, त्यासाठी सर्वांना अशी संधी मिळावी, असा विचार शाळांतील शिक्षकांना करावा लागेल. शाळेतील सर्व मुला-मुलींना संधी मिळेल, अशी व्यवस्थाच आपण निर्माण केलेली नाही; त्यामुळे असंख्य गुणवान विद्यार्थी उपेक्षित राहतात.
गेल्या आठवड्यापासून आपण विद्यार्थ्यांमधील भाषिक गुणवत्तेचा शोध घेत आहोत. काही प्रमाणात सर्वच विद्यार्थ्यांमध्ये भाषिक गुणवत्ता असतेच. ती कमी अधिक प्रमाणात सर्वांमध्ये विकसित होऊ शकते आणि विकसित करता येऊ शकते, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. भाषेचा प्रभावीपणे उपयोग करण्याची ज्यांच्यात क्षमता आहे, ज्यांच्यात ही सुप्त क्षमता विकसित होऊ शकते आणि ज्यांच्यात ही क्षमता एका विशिष्ट टप्प्यापर्यंत विकसित व्हायला हवी, अशा सर्वांसाठी आपण निबंध स्पर्धा घेतली आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या भाषिक बुद्धिमत्तेचा स्तर लक्षात घेण्याचा प्रयत्न आपण मागील आठवड्यात केला.
विद्यार्थ्यांमधील भाषिक गुणवत्ता विविध मार्गांनी शोधता येते. काही विद्यार्थी जास्त लिहित नाहीत, पण वर्गात प्रश्न विचारल्यावर लगेच नेमक्या शब्दांत उत्तर देतात, आपणहून वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतात, भरपूर बोलतात. विविध विषयांवर मत मांडतात, सर्वांसमोर बोलण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीत. या विद्यार्थ्यांमध्ये अशी भाषिक गुणवत्ता कमी अधिक प्रमाणात असतेच. आपले विचार बोलून व्यक्त करण्याची सर्वामध्येच सुप्त क्षमता असतेच. काही जण आपणहून आवडीने ती विकसित करतात, हाच काय तो फरक असतो. सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने आपले विचार मांडता आले पाहिजेत. त्यांच्यात काही प्रमाणात तरी ही गुणवत्ता विकसित केलीच पाहिजे; कारण ती काळाची गरज आहे, हे आपण जाणतोच. सर्वच विद्यार्थी उत्तम वक्ते होणार नाहीत. तेवढी भाषिक गुणवत्ता विकसित होणारही नाही, पण प्रत्येकाला काही प्रमाणात तरी ही गुणवत्ता विकसित करता येतेच आणि ते आपले एक महत्त्वाचे उद्दीष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला नीटपणे आपले विचार व्यक्त करता आलेच पाहिजेत. हे लक्षात घेऊन आपल्याला या आठवड्यात एक उपक्रम घ्यायचा आहे.
आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गासमोर येऊन बोलण्यास प्रवृत्त करायचे आहे. ज्या विषयावर विद्यार्थ्यांना बोलायला आवडेल, अशा कोणत्याही विषयावर कोणत्याही भाषेत एक मिनिट बोलायला आपण प्रोत्साहन द्यायचे आहे. बोलताना कोणी घाबरले, कोणाला पूर्ण वेळ बोलता आले नाही, कोणाला बोलणे सुचले नाही किंवा बोलायचे विसरले गेले तरीही, वर्गातील कोणीही कोणाची टिंगल करणार नाही, एवढाच एक नियम असेल. वर्गशिक्षकाने प्रयत्न केला तर, एका आठवड्यात वर्गातील सर्व विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांची भाषणे सहज आयोजित करता येऊ शकतील. एकाच वर्गाला शिकविणाऱ्या इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत किंवा अन्य भाषेच्या शिक्षकांनी संघटितरित्या प्रयत्न केला तर प्रत्येक वर्गात 10-10 विद्यार्थ्यांना अशी संधी देता येईल आणि अगदी सहजगत्या एकाच आठवड्यात हा उपक्रम आपण पार पाडू शकू. हा उपक्रम भाषा शिक्षणाचा तसेच अभ्यासक्रमाचाच एक महत्त्वाचा भाग असेल.
हेही वाचा – भाषिक बुद्धिमत्तेचा शोध
सर्व भाषणे ऐकताना शिक्षकाने कोण कोण चांगले बोलू शकतात, यांचा शोध घ्यायचा आहे आणि त्या सर्वांची- फक्त एक दोघांचीच- नव्हे यादी करावयाची आहे. असे शाळेतील सर्व वर्गात व्हावे. यातून शाळेच्या प्रत्येक वर्गातील चांगल्या पद्धतीने आपले विचार मांडू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार होईल. अशा सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक झाले तर अन्य विद्यार्थीही वक्तृत्व कला म्हणजे भाषिक गुणवत्ता विकसित करण्याचा प्रयत्न करू लागतील आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल.
या उपक्रमाचे अनेक फायदे होतील. ज्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वांसमोर बोलण्याचे धाडस नसेल त्याला ते मिळविता येईल. ज्यांच्यात असे धाडस असेल त्यांना ते विकसित करता येईल. प्रत्येक वर्गात जर 50 विद्यार्थी असतील तर, प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याला 50 विविध विषयांवरील भाषणे ऐकायला मिळतील. भाषण करण्याच्या विविध पद्धती बघायला मिळतील. कसे बोलावे, या बरोबरच कसे बोलू नये, याचाही अनुभव येईल. हे सगळे वक्तृत्वाच्या विकासासाठी पूरकच ठरेल. असाच उपक्रम आपल्याला वर्षातून दोन-तीनदा घेता आला तर अधिकच उत्तम. आपल्या असंख्य शाळांमध्ये हे कधीच होत नाही. त्यामुळे सुप्त रूपात वक्तृत्व कला असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना आपली कला विकसित करण्याची संधीच मिळत नाही. कारण शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अशी संधी मिळावी, अशी मुळात इच्छाच नसते. थोड्या प्रयत्नाने आपण सर्व विद्यार्थ्यांना अशी संधी देऊ शकतो, याचा विचारच आपण करीत नाही. त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना वक्तृत्वाचा विकास करण्याची संधीच मिळत नाही. या उपक्रमामुळे आपण सर्वाना ही संधी मिळवून देऊ शकू.
हेही वाचा – सर्वच विद्यार्थिनी अन् विद्यार्थी बुद्धीमान असतात…


