स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत. किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स –
- रोजच्या जेवणात कढीपत्ता अथवा करेपाक नेहमीच वापरला जातो. अशावेळी कढीपत्त्याची चटणी हा एक प्रकार रोज आहारात वापरला तर मधुमेह, रक्तदाब आणि ॲसिडिटी असणाऱ्यांना थोडाफार फायदा होतो.
- कढीपत्त्याची पाने चांगली कोरडी होतील, अशी वाळवावीत, पण तीही सावलीत. पानांच्या प्रमाणात अंदाजाने एक-दोन सुक्या लाल मिरच्या, दोन चमचे धणे, प्रत्येकी एक चमचा जिरे आणि मिरे, थोडासा आंबटपणा येण्यास लिंबाएवढी चिंच किंवा आमसूल घेऊन, तेल किंवा तूप न घेता कढईमध्ये चांगले कोरडे होईपर्यंत परतून घ्यावे. कढीपत्त्याची वाळलेली पाने आणि सर्व मसाला एकत्र करून मिक्सरमध्ये पूड करून घ्यावी. ही पूड रोज सकाळी जेवणामध्ये पहिल्या भाताच्या घासाबरोबर घेतल्यास चांगला फायदा होतो. ही चटणी पाचक, रुचकर आणि रंगतदार लागते. शिवाय, दीर्घकाळ टिकते.
हेही वाचा – Recipe : नारळाच्या रसातील अळूवडी
- चटणी वगैरे करण्यासाठी लसूण खूप लागतो. पण उन्हाळ्यात लसूण वाळतात आणि त्यामुळे सोलण्यास फार त्रास होतो. तेव्हा लसणाच्या पाकळ्या दहा-पंधरा मिनिटे पाण्यात बुडवून ठेवाव्यात आणि नंतर त्या सोलण्यास घ्याव्यात. साले पाण्यातच टाकावी म्हणजे ती सर्वत्र उडत नाही. शिवाय बोटे वारंवार पाण्यात बुडत असल्याने बोटांची आग होत नाही.
- एक किलो धणे, एक लहान जायफळ, दहा ग्रॅम दालचिनी, पाच ग्रॅम वेलची, 50 ग्रॅम काळीमिरी, दहा ग्रॅम जायपत्री, दहा ग्रॅम जिरे घ्यावे. जिरे-जायफळाशिवाय सर्व जिन्नस कमी आचेवर भाजून घ्यावेत आणि नंतर ते कुटावेत. जिरे-जायफळ कुटावे तसेच एक खोबऱ्याची वाटी किसून थोडी भाजून चुरावी. नंतर सर्व मिसळून कुटावे किंवा पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्या आणि भरून ठेवावे. मिरची हानिकारक म्हणून घरात बाळंतीण, आजारी, वृद्ध असेल तर, असा मसाला करावा.
- कोकम सरबत जुने झाले असल्यास त्याच्यात पाणी घालून आणि नारळाचे दूध घालून कोकमाचे सार बनविता येते. त्यात नेहमीप्रमाणे कढीलिंब, मिरची, नारळाचे दूध, हिंग-जिऱ्याची फोडणी घालून सार अगदी ताज्या कोकमाच्या साराप्रमाणे गुलाबी रंगाचे अगदी झटपट तयार होते.
हेही वाचा – पडवळाच्या फुकण्या (भरले पडवळ)
- दोन मोठे पिकलेले टोमॅटो काट्याला टोचून डायरेक्ट गॅसवर क्षणभर भाजून घ्यावेत. त्याचे साल लगेच निघते. नंतर ते कापून बिया काढून टाकाव्यात. अर्धी वाटी घट्ट दही, चवीपुरते मीठ, पाऊण चमचा गरम मसाला, एक चमचाभर लाल तिखट, दोन चमचे साखर, दोन हिरव्या मिरच्या, आल्याचा लहान तुकडा एकत्र करून मिक्सरमधून काढून याची पेस्ट करावी आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यावी. नवरतन कुर्मा, दम आलू, कोफ्ताकरी, मटरपनीर, आलूमटर अशा तऱ्हेच्या भाज्यांसाठी ही ग्रेव्ही वापरावी. उत्कृष्ट चव येते. झटपट तोंडी लावणे तयार होते.


