वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन । नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥22॥
आतां आणिकाचिया गोठी । तुज सांगों काई किरीटी । देखें मीचि इये राहाटी । वर्तत असें ॥160॥ काय सांकडें कांहीं मातें । कीं कवणें एकें आर्तें । आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥161॥ तरी पुरतेपणालागीं । आणिकु दुसरा नाहीं जगीं । ऐसी सामुग्री माझां अंगीं । जाणसी तूं ॥162॥ मृत गुरूपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला । तोही मी उगला । कर्मीं वर्तें ॥163॥
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥23॥
परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा । तयाचि एका उद्देशा – । लागोनियां ॥164॥ जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ । तरी न व्हावें बरळ । म्हणोनियां ॥165॥
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्मं चेदहम् । संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥24॥
आम्ही पूर्णकाम होउनी । जरी आत्मस्थिती राहुनी ॥ तरी प्रजा हे कैसेनि । निस्तरेल ॥166॥ इहीं आमुची वास पाहावी । मग वर्तती परी जाणावी । ते लौकिक स्थिती आवघी । नासिली होईल ॥167॥ म्हणोनि समर्थु जो एथें । आथिला सर्वज्ञते । तेणें सविशेषें कर्मातें । त्यजावें ना ॥168॥
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत । कुर्याद् विद्वांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकलोग्रहम् ॥25॥
देखे फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा । कर्मीं भरु होआवा तैसा । निराशाही ॥169॥ जे पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणऊनियां ॥170॥ मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें । अलौकिक नोहावें । लोकांप्रति ॥171॥
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम् । जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् ॥26॥
हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणोनि ऐकें पांडवा, हा स्वधर्मु कवणे न संडावा…
अर्थ
हे अर्जुना ! या त्रैलोक्यामध्ये मला कर्तव्य असे काही नाही, किंवा प्राप्त न झालेली अशी गोष्ट मला प्राप्त करावयाची राहिलेली नाही, तथापि मी कर्म करीतच आहे. ॥20॥
अर्जुना, आता दुसर्याच्या गोष्टी तुला कशाला सांगू? हे पाहा, मी सुद्धा याच मार्गाने वागतो. ॥160॥ मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो, असे जर म्हणशील, ॥161॥ तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता, माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही. अशा तर्हेचे सामर्थ्य माझा अंगात आहे, हे तुला माहीत आहे. ॥162॥ मी आपल्या गुरूचा मेलेला मुलगा परत आणला, तो माझा पराक्रम तू पाहिला आहेस. असा मी देखील निमूटपणे कर्मे करतो. ॥163॥
जर मी कर्म करण्याविषयी कदाचित निष्काळजी राहीन, तर हे अर्जुना, सर्व लोक माझ्या मार्गालाच अनुसरतील. ॥23॥
परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील, तर सकाम पुरुष केवळ फळाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्मे करतो, तितक्याच दक्षतेने मीही कर्माचरण करतो. पण ते केवळ त्याच एका हेतूने की – ॥164॥ सर्व प्राणीसमूह आमच्याच तंत्राने चालणारा आहे. तेव्हा तो भलतीकडे जाऊ नये म्हणून; ॥165॥
जर मी कर्म करणार नाही, तर हे सर्व लोक नाश पावतील. संकर करण्याला मी निमित्त होईन आणि या लोकांचा (लोकस्थितीचा) नाश करण्यास मी कारण होईन. ॥24॥
आम्ही निरिच्छ होऊन आपल्या स्वरूपस्थितीतच राहिलो तर, ही प्रजा भवसागरातून कशी पार पडेल? ॥166॥ यांनी आमच्या मार्गाकडे पाहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी, असा प्रकार असल्यामुळे (आम्ही कर्म टाकून बसलो तर) ती लोकांची राहाणी सर्वच बिघडेल. ॥167॥ म्हणून या लोकांत जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल, त्याने तर विशेषकरून कर्माचा त्याग करू नये. ॥168॥
हे अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माच्या ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात, त्याप्रमाणे लोकसंग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावे. ॥25॥
पाहा, फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो, तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्मे केली पाहिजेत. ॥169॥ कारण अर्जुना, लोकांची ही वागणुकीची रीत सर्व प्रकारे नेहमी जतन करून ठेवणे योग्य आहे. म्हणून -॥170॥ शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगास सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांमध्ये लोकबाह्य वागू नये. ॥171॥
कर्माच्या ठिकाणी आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांचा (ज्ञानी पुरुषाने) बुद्धिभेद करू नये; अवधानपूर्वक स्वत: कर्म करून ज्ञानी पुरुषाने समाहितचित्त राहून (अज्ञानी लोकांकडून) सर्व कर्मे करवून घ्यावीत. ॥26॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले


