रविंद्र परांजपे
मागील तीन लेखात आपण आरोग्य हीच खरी धनसंपदा होय आणि निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा तसेच वेळ काढण्याची नितांत गरज आहे, हे ध्यानात घेतले. या लेखात आपण ‘निरामय आरोग्यासाठी पैशाचा यथायोग्य विनियोग आवश्यक’ या मुद्द्याविषयी जाणून घेणार आहोत.
वास्तविक आपण सर्व जण अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तसेच शिक्षण, मनोरंजन आणि इतर अनेक बाबींवर पैसे खर्च करत असतो. परंतु याबरोबरच आपण आरोग्य या जीवनावश्यक बाबीवर खर्च करत नाही. या विधानाला काही अपवाद असतील, पण ते तुलनेने कमी आढळतील. शिवाय, आरोग्यावरील खर्च एकूण खर्चाच्या तुलनेत देखील नक्कीच कमी प्रमाणात दिसून येतो. हे वाचल्यावर आपल्याला जरा विचित्र वाटेलही कारण आपण सर्वजण आरोग्यावर भरपूर पैसा खर्च करतो, अशी आपली समजूत असते. वरकरणी हे खरं असेलही, परंतु येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेणे आवश्यक आहे… आणि ती म्हणजे आपण जो खर्च करतो, तो आजारपणावर असतो! म्हणजेच थोडक्यात अनारोग्यावर असतो…
कोणालाही असं नक्कीच वाटेल की, आजारपणावर केलेला खर्च हा आरोग्य चांगले होण्यासाठीच तर आहे. परंतु आपण जर या मुद्द्यावर बारकाईने विचार केला तर, असे ध्यानात येईल की, आपण आरोग्य बिघडल्यावर पैसा खर्च करत असतो, परंतु आरोग्य बिघडू नये याकडे आपण फारसे लक्ष देत नाही आणि त्यासाठी विशेष खर्चही करत नाही… आणि हाच या लेखाचा विषय आहे.
हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची…
आजारपणाच्या संकेतांकडे दुर्लक्ष
आपण सर्व जण जन्मतः आणि बालपणात सशक्त तसेच सुदृढ असतो. परंतु जसे आपण मोठे होऊ लागतो, तसे आपण नानाविध अपथ्ये अथवा कुपथ्ये करू लागतो… आणि यामुळेच आपल्या आजारपणास आरंभ होतो. वास्तविक, कोणीही व्यक्ती एकाएकी आजारी पडत नाही. आपले शरीर-मन आपल्याला आजारपणाची पूर्व-सूचना देत असते. आपण अशा पूर्व-संकेतांकडे कळत नकळत सोईस्कररीत्या दुर्लक्ष करत असतो.
आजारपणावर अमाप खर्च
दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तू तसेच सोयी अधिकाधिक महाग होत आहेत, हे आपण नेहेमीच अनुभव असतो. यास औषधे आणि रुग्णालयातील उपचार अजिबातच अपवाद नाहीत. हा खर्च कित्येकदा अवाढव्य असतो आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. म्हणून यावर ठोस उपाय काढणे खरोखरच गरजेचे झाले आहे.
आरोग्यासाठी वाजवी खर्च
आपण आजारी पडलो नाहीतर आजारपणावर खर्च करण्याची गरज उरणार नाही. पण हे कसं शक्य आहे, असं वाटणं स्वाभाविक आहे. आपण आजारी पडायचे नाही, असे नक्कीच ठरवू शकतो आणि त्यासाठी आवश्यक प्रयत्न देखील करू शकतो. आता आपण निरामय आरोग्यासाठी काय करू शकतो, ते थोडक्यात जाणून घेऊया.
निरामय आरोग्यासाठी काय करता येईल?
आपले आरोग्य अनेक घटकांवर अवलंबून असते. आपण त्यातील निवडक उपयुक्त उपायांचा विचार करणार आहोत.
- आरोग्यदायी आहार-विहार
आहार हे उपयुक्त औषध आहे, हे सर्वमान्य आहे. म्हणून आपण जर सकस आणि सात्त्विक आहार सेवन केला तर, असा आहार आपल्याला स्वस्थ आरोग्य प्रदान करेल. आरोग्यदायी आहारासाठी आवर्जून खर्च करावा.
विहार म्हणजे आपली दैनंदिनी. रोजचे व्यवहार ठरवताना आणि करताना आरोग्यासाठी आवर्जून वेळ राखून ठेवावा.
- नियमित योगाभ्यास अथवा व्यायाम
आहाराबरोबर योगाभ्यास किंवा व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार आणि उद्देशानुसार प्रकृतीला यथायोग्य योगाभ्यास अथवा व्यायाम अवश्य करावा. महत्त्वाचे म्हणजे, काय करायचे ठरल्यानंतर त्यात सातत्य मात्र हमखास ठेवावे.
हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी वेळ काढावाच लागेल!
स्वतःबद्दल सांगायचे झाल्यास मी यथाशक्ती नियमित योगाभ्यास आणि यथायोग्य आहार-विहार यांना प्राधान्य दिले आहे.
अगोदर सांगितल्यानुसार आरोग्यदायक घटकांची लांबलचक यादी सहज करता येईल. आपण येथे दोन अतिशय महत्त्वाचे घटक नमूद केले आहेत. या दोनही घटकांवर वाजवी खर्च केल्यास आजारपण टाळणे शक्य होऊ शकेल… आणि यदाकदाचित आपण आजारी पडलो तरी त्यातून लवकर बरे होऊन बाहेर पडू. आपल्याला आजारपणावर खर्चही करावा लागेल, पण तो आरोग्याची पूर्व-काळजी घेतल्याने नक्कीच कमी असेल.
तात्पर्य : आरोग्यासाठी पुरेसा वेळ आणि वाजवी खर्च केल्यास निरामय आरोग्यप्राप्ती सुकर आहे. साहजिकच, आजारपणावर होणाऱ्या खर्चाला नक्कीच कात्री लागेल आणि त्यातून होणाऱ्या बचतीचा परत आरोग्यासाठीच विनियोग करता येईल.
क्रमशः
(लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते “निरामय आरोग्य संकल्पना” यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना संपर्क करावा.)
मोबाइल – 9850856774