सुनील शिरवाडकर
‘बम बम… बम बम…’ असं पुटपुटत ओम या कुशीवरून त्या कुशीवर झाला. त्याच्या आईनं त्यांचं पांघरूण सारखं केलं. झोपेतही ओमचं ‘बम बम भोले…’ सुरूच होतं. आईनं त्याला हलवून जागं केलं… “कसलं स्वप्न पडतंय तुला ओम?”
ओम जागा झाला… थोडा वेळ त्याला काही समजलंच नाही. मग हळूहळू तो स्वप्न आठवू लागला… आपण कुठल्या तरी जत्रेत शंकराच्या वेषात फिरत आहोत… पण पुढचं काही आठवेना! असं वारंवार होऊ लागलं. यावर उपाय काय करावा, हे त्यांना समजेना. बरं ते काही वाईट स्वप्न नव्हतं. त्याच्यामुळे ओमला काही त्रासही होत नव्हता. पण हे स्वप्न काही सुचवत तर नसेल ना?
…तेवढ्यात होळी जवळ आली. मग त्याच्या बाबांना उलगडा झाला. होळीच्या दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये वीरांची मिरवणूक असते. बाबांनी ओमला विचारलं, “ओम… यावर्षी वीरांच्या मिरवणुकीत शंकर होतो का?” ओमच्या लक्षात आलं… त्याला खूपच आनंद झाला. त्याच्या डोळ्यासमोरच आलं… आपण शंकर झालोय आणि होळीभोवती नाचतोय! कधी एकदा होळी येतेय, असं त्याला झालं.
…आणि एकदाची होळी आली. रात्री होळी पेटली… ओमने आणि त्याच्या आई-बाबांनी होळीची पूजा केली. दुसरा दिवस उजाडला… ओमची भुणभुण सुरू झाली…
“अरे, हो हो… मिरवणूक संध्याकाळी आहे. सकाळपासून कुठं शंकर होतोस!”
त्याच्या बाबांनी सगळी चौकशी करून ठेवली होती. शंकराचा एक ड्रेस पण बुक केला होता. दुपारी जेवण झाल्यावर ते आणि ओम जरीवाल्याकडे गेले. त्याच्याकडून ड्रेस, त्यासोबतचं साहित्य… सगळं ताब्यात घेतलं.
हेही वाचा – तरंगिणी… संसारात राहून संन्यस्त जीवन
घरी आल्यावर आईनं ओमला स्वच्छ आंघोळ घातली… “हे बघ, आता तू शंकर होणारेस… शंकर म्हणजे देवांचा देव… नुसता देव नाही.. महादेव… एकदम नीट वागायचं, सोंग असलं तरी काय झालं, तुझ्यात आता महादेवाचा अंश असणार आहे.”
ओमने मान डोलावली. आईनं कौतुकानं त्याच्याकडे पाहिलं. सात-आठ वर्षांचा ओम… गोरापान… कुरळे केस… गोबरे गोबरे गाल… आणि निरागस डोळे… तिने ओमच्या केसातून हात फिरवला. जरीवाल्याकडून आणलेली पिशवी उघडली. एका पुडीत निळा रंग होता. तो तिनं वाटीत घेतला… त्यात पाणी टाकलं.. आणि ओमच्या हातांना, पायांना लावायला सुरुवात केली. ओमला गुदगुल्या व्हायला लागल्या. तो हसू लागला.
“थांब… शांत उभा रहा… आता डोळे मिट… तोंडाला रंग लावायचा आहे आणि मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही.” ओम डोळे मिटून शांत उभा राहिला. निळा रंग सगळीकडे… अगदी तोंडालाही लावून झाला… आईनं त्याला उन्हात उभं केलं. थोड्या वेळाने रंग वाळला. ओमचा आनंद गगनात मावेना. आईनं आता भस्माचे पट्टे ओढायला सुरुवात केली… तेही झालं! मग डोक्यावर जटा बांधल्या. त्यावर एका पिनेने तिने चंदेरी चंद्रकोर लावली. वाघाच्या कातड्याचं डिझाइन असलेलं एक कापड कमरेभोवती गुंडाळलं. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातल्या. पायात तोडे घातले… ओम आता खराखुरा महादेव दिसू लागला… अगदी बाल शंकरच.. त्यानं स्वप्नात पाहिलेला.
“आई… माझा तिसरा डोळा कुठे?”
“अरे हो! तो तर मुख्य नाही का? तो तर राहिलाच.”
हेही वाचा – तीन पिढ्यांची कहाणी…
एक छोटा पुठ्ठ्याच्या डोळा होता तो! तिनं मेणाच्या सहाय्याने ओमच्या कपाळावर उभा लावला. ओम खूश झाला. छोटं डमरू कडकड वाजवत नाचू लागला. आईनं त्याला थांबवलं…
“अरे थांब थांब… इतक्यात नको दमूस! पुष्कळ नाचायचं आहे संध्याकाळी… आणि तो तिसरा डोळा जप. कुठे पडूबिडू देऊ नकोस…”
ओम आता संध्याकाळची वाट पहात बसला. त्याला जास्त हालचाली करता येत नव्हत्या. अवघडून तो एका स्टुलावर बसून राहिला. थोड्या वेळाने पूजा झाली… बाहेर वाजंत्री, ढोलवले आले होतेच…आजूबाजूचे पण वीर तयार झाले… मोरपीस डोक्यावर खोचलेला कृष्ण होता… कुणी शिवाजी महाराज बनलेला… कुणी नेहमीच्या कपड्यात होते… त्यात आपला हा छोटा महादेव सामील झाला!
मिरवणूक निघाली. गल्लोगल्ली पुन्हा होळ्या पेटल्या होत्या… त्या भोवती रांगोळ्या काढल्या होत्या. वीरांच्या स्वागतासाठी लोक वाटच पहात होते. होळी भोवती फेर धरून सगळे नाचू लागले. ओमने ‘बम बम भोले’ची ललकरी दिली. एक पाय पुढे, एक पाय मागे करत बेभान होऊन नाचू लागला…
आईनं त्याला सांगितलं होतं, तिसरा डोळा जप… म्हणून तो सारखं कपाळावर हात लावून चाचपत होता. अचानक त्याच्या लक्षात आलं की, तो डोळा पडायला आलाय! म्हणून, मग त्याने तो डोळा कपाळावरुन काढून हातात ठेवला…
मिरवणूक गंगेवर आली तेव्हा रात्र झाली होती. वाजंत्रीवाले एका बाजूला बसले. विधीवत पूजा झाली. इतक्या दिवसांपासून वाट पाहात असलेली मिरवणूक आता संपली होती. ओमही थकला होता… घामाघुम झाल्यामुळे अंगावरून निळ्या रंगाचे ओघळ येत होते… ‘बम बम भोले’ म्हणून घसाही बसला होता…
पुन्हा मिरवणुकीत नाचत घरी जाण्याचं त्राण त्याच्यात नव्हतं. त्याच्या बाबांनी त्याला कडेवर घेतलं. थकल्या शरीराने सगळे जण निघाले. रात्री उशिराने घरी आले… तेव्हा ओम… म्हणजे आपला छोटा महादेव… हातात तिसरा डोळा घट्ट पकडून बाबांच्या खांद्यावर मान टाकून गाढ झोपला होता… पुन्हा नवीन स्वप्नं पाहण्यासाठी…
मोबाइल – 9423968308