माधवी जोशी माहुलकर
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, अकोला, अमरावती, बुलढाणा या विदर्भातील काही जिल्ह्यांमधील आपापल्या निरनिराळ्या खाद्यसंस्कृती आहेत. विदर्भाला लागून ज्या राज्यांच्या सीमारेषा आहेत तेथील लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरीत होऊन विदर्भातील मोठमोठ्या शहरांमध्ये रहायला आले आणि इथलेच होऊन गेलेत. याचमुळे इथे वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींची रेलचेल असावी, असे मला वाटतं. ‘तुरीच्या उसळीतील दिवसे’ हे मी नागपूरला रहायला आल्यानंतर प्रथमच ऐकले. यांचा आकार थोडा खोलगट दिव्यांसारखा आहे म्हणून कदाचित यांना ‘दिवसे’ म्हटलं जात असावं.
उसळीसाठी साहित्य
- अख्खे तुरीचे वाळवलेले दाणे – दोन वाट्या
- मोठा कांदा – 1
- लसूण – 5-6 पाकळ्या
- आले – अर्धा इंच
- टोमॅटो – 1 (आवडत असेल तर)
- हिरव्या मिरच्या – 2
- लाल तिखट – दोन ते अडीच चमचे
- हळद – 1 चमचा
- गरम किंवा गोडा मसाला – 1 चमचा
- कढीपत्ता – 5-6 पाने
- तेल – 1 पळीभर
- हिंग – अर्धा लहान चमचा
- मोहरी – 1 लहान चमचा
- जिरे – 1 लहान चमचा
- मीठ – चवीनुसार
- गूळ – चवीनुसार
दिवस्यांकरिता साहित्य
- कणीक – 2 वाट्या
- मीठ – चवीनुसार
- जिरे – 1 लहान चमचा
- ओवा – 1 लहान चमचा
- तीळ – 1 चमचा
- लाल तिखट – चवीनुसार (आवडत असेल तर)
- हळद – 1 लहान चमचा
पुरवठा संख्या – चार व्यक्तींसाठी
एकूण लागणारा वेळ – सुमारे 45 मिनिटे
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले
कृती
- प्रथम दोन वाट्या तुरीचे दाणे रात्रभर भिजत घालावे.
- दुसऱ्या दिवशी हे तुरीचे दाणे धुवून प्रेशर कुकरमध्या सहा ते सात शिट्ट्या घेऊन वाफवून घ्यावे. (कधी कधी तूर मऊसर शिजत नाही त्याकरिता प्रेशर कुकरच्या जास्त शिट्ट्या करुन घ्याव्या लागतात.)
यादरम्यान दोन वाट्या कणकेमधे चवीनुसार मीठ, ओवा, तीळ आणि जिरे टाकून ते घट्टसर भिजवून वरून तेलाचा हात लावावा. - नंतर पुन्हा एकदा ही कणीक चांगली मळून झाकून बाजूला ठेवावी.
- उसळीकरिता कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
- आता कढईमधे पळीभर तेल टाकून त्यामधे जिरे, मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा हिंग टाकून लगेच कढीपत्ता, दोन हिरव्या मिर्च्यांचे तुकडे टाकावे.
- लगेच कांदा टाकावा आणि तो छान गुलाबीसर परतून झाला की, टोमॅटो टाकून तोही मऊसर होईपर्यंत तेलात परतून घ्यावा.
- नंतर आले, लसणाची पेस्ट करून त्यात टाकावी.
- थोडे परतल्यावर एक चमचा हळद, दोन ते अडीच चमचे लाल तिखट, एक चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला टाकून वरून थोडे पाणी टाकावे.
- आता शिजलेल्या तुरीचे दाणे या मिश्रणात टाकून चांगले ढवळून घ्यावे.
- उसळीचा रस्सा जरा सरबरीतच ठेवावा, त्यानुसारच उसळीत पाणी घालावे.
- रस्सा उकळेपर्यंत कणकेचे दिव्यासारखे खोलगट, परंतु पातळसर आकार करून ते तुरीच्या उसळीत सोडावेत आणि रश्श्यासोबत वाफवून घ्यावेत.
- तुरीच्या उसळीच्या रश्श्यात हे गरमागरम दिवसे कुस्करुन खाताना चवीला अतिशय सुंदर लागतात.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात
टीप
- तुरीच्या उसळीतील दिवसे केले की, जेवणात दुसरा काही प्रकार करायची गरज नसते.
- तोंडी लावायला ग्रीन सलाद, कांदा, लिंबू, लोणचे, दही घेता येते.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जातील.