दत्तात्रय पांडुरंग मानुगडे
ग्रामीण भागामध्ये शाळा कमी शिकलेल्या मुलांची अवस्था मी डोळ्यांनी पाहत होतो. ही मुले सुद्धा रोजगाराचा काहीतरी मार्ग शोधत होते. पण काहींची स्वप्नंच वेगळी होती. त्यापैकीच नंदू, दिलीप, शिवा, एकनाथ! गावामध्ये या चार मुलांना शेती कामाला कोणी शेतकरी सांगत नव्हते. कारण ही मुले चांडाळ चौकडी आहे, हे गावातील लोकांच्या लक्षात आलं होतं. या मुलांचं असं होतं की, ‘थोडे काम करणे आणि टाइमपास जास्त करणे.’ घरातील ज्वारी विकून विड्या ओढणे, नशा करणे आणि गावभर फिरणे हाच यांचा मुख्य उद्योग होता. सकाळ झाली की, घरात चहा पिऊन लक्ष्मीच्या देवळाच्या कट्ट्यावर ही चौकडी येऊन बसत होती.
दोन महिन्यांपूर्वी ही चार मुले आणि चार गावच्या वीस ते पंचवीस मुलांनी जमून देवी लक्ष्मीला सोडलेला बोकड कापून त्याचे मांस विकले होते, म्हणून त्यांच्यावर केस झाली होती. आमच्या गावच्या आमदारांनी या मुलांना पोलीस स्टेशनमधून सोडवून आणले होते.
आता यांच्या मनामध्ये काय घोळत आहे, हे जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या मागावर होतो. एकेदिवशी नंदू लक्ष्मीच्या देवळाजवळ पेपर घेऊन आला आणि पेपर वाचून दाखवत असताना एक बातमी ऐकताच दिलीपने कान टवकारले. अवघड शब्द आला की, नंदू मधेच थांबत होता. मी झाडाजवळ उभा होतो, मला पाहून दिलीप म्हणाला…
‘ए… इकडे ये”
“का?” मी विचारलं.
“जरा पेपर वाचून दाखव की… या पेपरमध्ये अवघड शब्द भयंकर आहेत,” नंदू म्हणाला. मी त्याच्याजवळ गेलो आणि पेपर वाचू लागलो. पेपरमध्ये एक बातमी आली होती. ती बातमी सांगलीच्या पाटील डॉक्टरांची होती. एका श्रीमंत बाईला किडनी हवी आहे आणि किडनी देणाऱ्याला रोख इनाम देण्यात येणार होते. त्यासाठीचा पत्ताही देण्यात आला होता.
हेही वाचा – मीरासाहेब दर्ग्याचे आजोबा…
बातमी वाचून मी घरी निघून गेलो… बातमी ऐकून दिलीप म्हणाला, “बातमी आपल्या फायद्याची आहे…”
“ती कशी काय?” नंदू म्हणाला.
“आपल्याला एक किडनी असली तरीसुद्धा चालते, दुसरी किडनी देऊन टाकू. पेपरमधील पत्यावर आपण सांगलीमध्ये शोध घेऊ. यातच आपला फायदा आहे…,” दिलीप म्हणाला.
“म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय?” एकनाथने विचारलं.
“तुझ्या एवढेसुद्धा लक्षात येत नाही का? आमच्या तालमीत येऊन तू काय शिकलास? लेका तुला अजून आमच्याकडून भयंकर शिकायचे आहे,” शिवा म्हणाला.
“पण, इसकाटून सांगितल्याशिवाय आम्हाला कसं समजणार?” नंदूचा प्रश्न.
“श्रीमंताच्या एका बाईला किडनी हवी आहे, आपल्या चौघांपैकी एकाची तरी किडनी म्हातारीला सूट होईल, अशी मला खात्री वाटते. पैसा आपोआप चालत यायला लागला आहे, आता काही आपणाला कमी पडणार नाही…” दिलीप म्हणाला.
“हे सारे ठीक आहे, पण तो दवाखाना शोधायचा कसा? सांगलीमध्ये घराला घरे लागून आहेत…” शिवाने शंका उपस्थित केली.
“सांगली काय मुंबई आहे? डॉक्टरचा पत्ता या वर्तमानपत्रात छापून आला आहे. पण एक अडचण आहे…” दिलीप बोलता बोलता थांबला.
“कसली अडचण” – शिवा.
“सांगलीला जायचे म्हटले तर, खर्च आला…” दिलीप म्हणाला.
“मी तर रेल्वेत फुकट बसणार नाही. मला एकदा तिकीट काढले नाही पकडले होते, पोलिसाकडून मायंदळ मार खावा लागला होता आणि मला रेल्वेतून नांद्रे स्टेशनला उतरवलं, त्यामुळे माझी फार पंचाईत झाली. नांद्रेपासून मी चालत गावाकडे आलो… पैसे असतील तर मी तुमच्या बरोबर येतो,” नंदूची जुनी जखम ठसठसली.
“पैशाची तू काळजी करू नको, मी करतो व्यवस्था,” एकनाथने शब्द दिला.
तो मधेच उठून पाटलाच्या वाड्यावर गेला आणि मामा आजारी असल्याची सबब सांगत, पाटलीण बाईकडून शंभर रुपये दोन दिवसांकरिता उधार घेतले.
“आपली किडनी पास झाली तर रोख रक्कम मिळणार आहे. आपले दारिद्र्य आता नक्की जाणार असे दिसू लागले आहे. आता आपण गावात सायकलीवरून फिरायचे नाही, चौघेजण पेट्रोलवर चालणारी गाडी खरेदी करू अगोदर. गावठी दारू बिल्कुल प्यायची नाही, आता इंग्लिशच! पैसे मिळाल्याबरोबर आपल्या गाडीवरूनच औदुंबरला देवाच्या दर्शनाला जाऊ. एखादा चांगला उद्योग काढू. गावात अगोदरच आपणाला चांडाळ चौकडी आली, असे म्हणतात… चांडाळ चौकडी हा शब्द मला कायमचा खोडून काढायचा आहे, दिलीपने स्वप्न बघण्यास सुरुवात केली.
“अगदी बरोबर आहे मलाही काही वेळा तसेच वाटते आपण बेकार म्हणून किती दिवस काढायचे. देवाला आपली दया आली आहे”, असे म्हणत एकनाथने री ओढली.
माणसाची आशा फार वाईट असते… कष्ट न करता पैसे मिळणारायत, ही अभिलाषा मनात धरून हे चौघेजण घराबाहेर पडले होते. फायदा होणार म्हणून वर्तमानपत्राच्या बातमीवर विश्वास ठेवून दिलीप, शिवा, एकनाथ आणि नंदू सायंकाळी पाच वाजता पुणे-मिरज पॅसेंजरने तिकीट काढून सांगलीला पोहोचले. त्यादिवशी पॅसेंजर फार लेट होती, त्यामुळे या चौघांनी स्टेशनवरच मुक्काम केला.
गाडी लेट आल्यामुळे आम्हाला येथे मुक्काम करावा लागला… हे पाहा आमच्याकडे रेल्वे तिकीट आहे! आम्ही फुकट प्रवास केला नाही आणि करतही नाही, असे रेल्वे पोलिसांना सांगून या चौघांनी वेळ मारून नेली. सकाळी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली. तिकीट काऊंटरवर झुंबड उडाली होती. प्रवाशांचा आवाज ऐकून हे चौघे जण जागे झाले. ते मेन एसटी स्टँडवर जाऊन पोहोचले. तिथे फ्रेश होऊन सर्वांनी नाश्ता केला आणि पत्ता विचारीत विचारीत हे चौकातील सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत पोहोचले. हॉस्पिटल पाहून सर्वांच्या जीवात जीव आला.
रिसेप्शन काऊंटरवर बसलेल्या मॅडमजवळ दिलीप गेला आणि वर्तमानपत्रातली बातमी तिच्यासमोर ठेवली… तिने त्याला दुजोरा दिला.
“पण आम्हाला पैसे रोख मिळणार ना?” एकनाथला शंका.
“का नाही? तुम्ही तर देवासारखे धावून आला आहात! रोख पैसे मिळतीलच, त्याची काळजी करू नका. आज ऑपरेशन करून त्या बाईला किडनी बसवायला हवी. डॉक्टर दहा वाजता येतील आणि तुमच्या काही टेस्ट होतील. रिपोर्ट बरोबर आला की तुमचे पेमेंट स्वत: डॉक्टर देतील…” मॅडम म्हणाल्या.
हे ऐकून चौघांना फार आनंद झाला. डॉक्टर दहा वाजता येणार आहेत म्हटल्यावर ते चौघेजण चहा प्यायला गेले. आपले नशीब जोरदार आहे, चांगला पैसा मिळणार, या विचारानेच ते सुखावले.
डॉक्टर बरोब्बर दहा वाजता आले. हे चौघे जण डॉक्टर केबिनबाहेर एका बाकड्यावर बसले होते. तोपर्यंत मॅडमनी चौघांचे केस पेपर केबिनमध्ये दिले आणि बाहेर येऊन म्हणाल्या, “आता तुम्हा चौघांची किडनी डॉक्टर चेक करणार आहेत. बेल वाजली की, एकेकाने आत जायचे आहे…”
पहिली बेल वाजल्यावर दिलीप डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. काही वेळातच दिलीप बाहेर आला. नंतर नंदू, एकनाथ आणि शिवा हे एकापाठोपाठ एक गेले. बाहेर आल्यावर चौघेजण आपापसात बोलू लागले… “आपल्या चौघांच्या किडन्या बरोबर आहेत म्हणूनच डॉक्टर आपल्याला काही बोलले नाहीत.”
काही वेळाने दिलीप मॅडम जवळ गेला आणि म्हणाला, “आमची किडनी टेस्ट झाली आहे, आम्हाला रिपोर्ट कधी मिळणार?”
“बरोबर दोन वाजता मिळतील, तोपर्यंत तुमची कामे करून घ्या,” मॅडम म्हणाल्या.
चहा पिऊन चौघेही परत दवाखान्यात आले आणि एका बाकड्यावर बसले, रिपोर्ट कधी येतोय याची वाट पहात होती… या पैशांच्या जीवावर किती तरी स्वप्ने यांनी रंगवली होती. त्यांच्या डोळ्यापुढे नोटांचे बंडल दिसत होते… त्यांना पैशांशिवाय काही सुचत नव्हते. तर दुसरीकडे, हातात पैसै आल्यावर पाटलीण बाईचे शंभर रुपये पैसे देऊन टाकायचे, पण पैसे नाही मिळाले तर गावाकडे कसे जायचे, ही एक काळजी एकनाथच्या मनाला लागून राहिली होती.
हेही वाचा – दिव्यशक्तीचा माणूस
पैसे हाती आल्यावर हॉटेलमध्ये जायचा त्यांचा बेत होता. सकाळी केलेला नाश्ता तोसुद्धा अपुरा पडला. दुपारचे दोन वाजत आले होते. चौघांच्या पोटामध्ये आगीचे लोळ उठले होते. मनात मात्र, आपला रिपोर्ट काय येतोय, याचीच चिंता होती… दुपारचे तीन वाजले आणि डॉक्टर आले. केबिनमध्ये गेल्यावर त्यांनी बेल वाजवली, त्याबरोबर खुर्चीवर बसलेल्या मॅडम डॉक्टरच्या रूममध्ये गेल्या आणि लगेच बाहेर आल्या. म्हणाल्या,
“तुम्ही त्या बाकावर बसा, तुमचा रिपोर्ट डॉक्टरांनी माझ्याजवळ दिला आहे…” हे ऐकून सर्वांना आनंद झाला आणि ते मॅडमने दाखवलेल्या बाकड्यावर बसले.
हे पाहा, तुम्ही आमच्या पेशंटसाठी फार लांबून आला आहात, त्याबद्दल डॉक्टरांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही दुसऱ्यांना मदत करणारी अशी मुले आहात. पण आताच्या कामामध्ये तुम्हा चौघांना अपयश आले आहे…” मॅडम म्हणाल्या.
“म्हणजे मॅडम तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?” दिलीपने विचारलं.
“तुमच्या चौघांच्या किडन्या खराब होऊ लागल्या आहेत, तेव्हा नशेचे सेवन करू नका. नाहीतर, एकेदिवशी आयुष्यातून निघून जाल. तुमच्या किडन्या खराब असल्यामुळे आमच्या पेशंटला चालणार नाहीत, असे रिमार्क डॉक्टरनी तुमच्या केसपेपरवर मारले आहेत…” मॅडम म्हणाल्या.
हे ऐकून चौघेजण उदास झाले, यापूर्वी रंगवलेली मोठी स्वप्ने आता पूर्णपणे धुळीस मिळाली होती. पडलेल्या चेहऱ्याने चौघेजण दवाखान्याच्या बाहेर आले आणि बाजूला जाऊन उभे राहिले… नंदू म्हणाला, “दिलीप आता पुढे काय करायचे? गावाकडे जायचे कसे? आता जवळ आपल्या पैसे नाहीत. तुझे ऐकून कालपासून गाव सोडून तुझ्या मागे आलो काय मिळाले आम्हाला? पैसे मिळण्याऐवजी काळजी वाढलीय. मॅडम सरळ म्हणतात, नशापान करू नका तुमच्या किडन्या थोड्या दिवसात खराब होणार आहेत…”
“पण मग आता जायचे कुठे?” नंदू पुन्हा त्याच प्रश्नावर आला.
जीव मुठीत घेऊन चौघांनी रेल्वे स्टेशन गाठलं. नंदू म्हणाला, “आता तिकीटं कुठून काढायची, आपल्या जवळ पैसे नाहीत!”
“संध्याकाळच्या गाडीला तिकीट चेकर अजिबात नसतो, हे मला माहीत आहे…” दिलीप म्हणाला.
काही वेळातच पॅसेंजर गाडी स्टेशनमध्ये आली… चौघेजण गाडीत बसले. एकनाथ म्हणाला, “आपल्या नशिबातच नाही तर येणार कुठून? उद्यापासून दुसऱ्याच्या बांधावर कामाला जाऊ आणि चार पैसे मिळवू. अशा भानगडी आजपासून बंद करूया…”