रविंद्र परांजपे
मागील लेखात आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची आहे, ही प्राथमिक बाब समजून घेतली. मनात आरोग्याची इच्छा असेल तर, मार्ग नक्कीच सापडतो, ही बाब देखील आपण लक्षात घेतली. पण प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसत नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, निरामय आरोग्य प्राप्तीची नुसती इच्छा पुरेशी नाही तर, त्यासाठी आणखीन एक मुलभूत बाब आवश्यक आहे… आणि ती म्हणजे स्वतःसाठी पर्यायाने आरोग्यासाठी वेळ काढणे आणि हाच या लेखाचा विषय आहे.
वेळेची उपलब्धता
आपल्या सर्वांनाच, आपल्यातील प्रत्येकाला एका दिवसाचे 24 तास उपलब्ध आहेत. आता या उपलब्ध वेळेचा विनियोग करण्याचे प्रत्येकाचे गणित वेगवेगळे असते.
हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची…
वेळेचा विनियोग
सर्वसाधारणपणे उपलब्ध वेळेचा विनियोग कसा करायचा? वास्तविक, विनियोग कसा होतो, याबाबत आपण आयुष्यातील विविध टप्प्यांतील काही ठळक आणि महत्त्वाच्या घटना तसेच प्रसंग घेऊन अनुषंगिक उदाहरणे पाहूयात.
- शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यास, परीक्षा तसेच विविध स्पर्धा यांची तयारी यात व्यतीत होतो. शिवाय, आजकाल बहुतांश विद्यार्थ्यांचा एकंदरीतच स्क्रीनटाइम वाढत असल्याचे दिसून येते. यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्य चांगले रहावे, असे वाटत असले तरी त्यासाठी वेळच मिळत नाही.
- नोकरी-व्यवसाय करणारे पुरुष तसेच महिला कामात अशा तर्हेने व्यग्र असतात की, त्यांना स्वतःसाठी वेळ काढण्याचा विचार करायलाही वेळ नसतो. यदाकदाचित, वेळ काढला तरी, तो वेळ टीव्हीवरील विविध मनोरंजनपर कार्यक्रम पाहण्यात तसेच मोबाइलवरील व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्युब आणि तत्सम नानाविध अॅप्स हाताळण्यात जातो. मोबाइलचे व्यसन तर, दिवसेंदिवस आरोग्यास घातक ठरत आहे. परंतु आधुनिक जीवनातील रहाटगाडग्यात स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणे अशक्यप्राय वाटते.
- गृहिणी तर दैनंदिन घरगुती तसेच कौटुंबिक कामात एवढ्या व्यग्र असतात की, दिवसभरात होणाऱ्या शारीरिक हालचालींमुळे आरोग्यासाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज त्यांना वाटत नाही आणि यामुळे त्या आरोग्यासाठी वेळ काढत नाहीत.
- निवृत्तीनंतरच्या काळात ज्येष्ठ पुरुष आणि महिला यांच्याकडे भरपूर वेळ उपलब्ध असतो. परंतु वयाच्या या टप्प्यात व्यक्तींच्या मनात आरोग्याबद्दल वेगवेगळी धारणा असते. काही जणांना वाटत असते की, आयुष्यात कधी गोळी-औषध घेतले नाही, मग आत्ता आरोग्याची काळजी कशाला करायची? काही जणांना उतारवयात आरोग्यासाठी काही करण्याची गरज वाटत नाही. थोडक्यात, वेळ उपलब्ध असून देखील वेळेचा विनियोग आरोग्यासाठी होतोच असे नाही.
वरील विवेचनावरून महत्त्वाची बाब लक्षात येते की, कारण खरे असो अथवा सबब काही असो, आरोग्यासाठी सहसा वेळ काढण्याची गरज वाटत नाही आणि वाटल्यास वेळ काढला जात नाही. वास्तविक, स्वतःच्याच आरोग्यासाठी वेळ नसणे अथवा वेळ न काढता येणे, ही खरोखरच चिंताजनक बाब आहे.
हेही वाचा – आरोग्यम् धनसंपदा…
मागील आणि या लेखावरून एक मुलभूत बाब लक्षात येते की, आरोग्य निरामय ठेवण्यासाठी मनापासून इच्छा तसेच पुरेसा वेळ काढणे नितांत आवश्यक आहे. आपल्याला जीवनात सुखसमृद्धी आणि समाधान हवे असल्यास आरोग्यासाठी पुरेसा वेळ काढायलाच पाहिजे.
क्रमशः
(लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहेत. संकल्पनेतील त्यांची ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही तीन मार्गदर्शनपर माहितीपूर्ण उपयुक्त पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. तसेच, यूट्युब चॅनेलवरील उपलब्ध योगा विडीओ देखील खरोखरच उपयुक्त आहेत. पुस्तकसंच घेतल्यास विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना अवश्य संपर्क करावा.)
मोबाइल – 9850856774