कामिनी व्यवहारे
ओला वाटाणा अर्थात मटारचे अनेक खाद्यपदार्थ आहेत, जे मुलांना आवडतात. आजकाल बाजारात फ्रोझन मटार उपलब्ध असल्याने बाजारातून मटार आणून सोलायचीही गरज पडत नाही. फ्रीझरमधून तो काही काळ बाहेर काढून ठेवायचा आणि नंतर आपल्या रेसिपीसाठी वापरायचा… याच मटारचे आज आपण पॅटीस कसे करायचे ते पाहू.
साहित्य
- उकडलेले बटाटे – 5 ते 6
- ताजा कोवळा मटार – 2 वाट्या
- किसलेले चीज – 1 वाटी
- खवलेला ओला नारळ – 1 वाटी
- चिरलेली कोथिंबीर – 1 वाटी
- किसलेले आले – 1 टेबलस्पून
- हिरवी मिरची पेस्ट
- कॉर्नफ्लोअर – 2 टेबलस्पून
- लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- साखर – चवीनुसार
- फोडणीसाठी तेल – 1 टेबलस्पून तेल
- जिरे – 1 लहान चमचा
- मोहरी – 1 लहान चमचा
- हिंग – चिमुटभर
- हळद – 1 लहान चमचा
- तेल – तळणासाठी
हेही वाचा – Recipe : राजेळी केळ्यांचे उंबर अन् कढी गोळे
कृती
- गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि हळद टाकून फोडणी तयार करावी.
- नंतर त्यात मटार घालून मंद आचेवर चांगले 2 ते 3 मिनिटे परतून घ्यावे.
- मग त्यात ओला नारळ, मीठ, साखर, आले आणि मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस घालून चांगले परतून घ्यावे. मटार जास्त कडक होऊ देऊ नये.
- त्यात किसलेले चीज घालून परत थोडे परतून घ्यावे. नंतर गॅस बंद करावा.
- उकडलेल्या बटाट्यात मीठ आणि कॉर्नफ्लोअर घालून ते मळून घ्यावेत.
- नंतर त्याचे गोळे करून त्याची पारी तयार करावी
- त्यात आपण केलेले मटारचे सारण भरून पारीचे तोंड बंद करून घ्यावे.
- त्याला गोल चपटा आकार देऊन, तेल गरम करून त्यात तळून घ्यावे.
टीप
- टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
- ग्रीन पीज चीज पॅटीसचा वापर करून तुम्ही बर्गरही तयार करू शकता.
हेही वाचा – Recipe : वेगळ्या चवीचे आंबट-गोड पंचामृत
तयारीसाठी लागणारा वेळ – 60 मिनिटे
पुरवठा संख्या – 4 ते 5 जणांसाठी
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.