वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे । मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥331॥ पार्था आणिकही एक । जरी नाशिले रागद्वेष । तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाही ॥332॥ जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरीं जगातें स्पर्शतु । तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिंचेनि ॥333॥ तैसा इंद्रियार्थी उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न । जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥334॥ तरी विषयांतुही कांही । आपणपेंवाचुनि नाहीं । मग विषय कवण कायी । बाधितील कवणा ॥335॥ जरी उदकें उदकीं बुडीजे । कां अग्नि आगी पोळिजे । तरी विषयसंगे आप्लविजे । परिपूर्ण तो ॥336॥ ऐसा आपणचि केवळ । होऊनि असे निखळ । तयाचि प्रज्ञा अचळ । निभ्रांत मानीं ॥337॥
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते । प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥65॥
देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥338॥ जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु । तया क्षुधेतृष्णेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥339॥ तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे । तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ॥340॥ जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणे कंपु । तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥341॥
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना । न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ॥66॥
ये युक्तीचि कडसणी । नाहीं जयाचां अंतःकरणीं । तो आकळिला जाण गुणीं । विषयादिकीं ॥342॥ तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा । आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥343॥ निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखें मना । तरी शांति केवी अर्जुना । आपु होय ॥344॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसी वरिवरि पालवी खुडिजे, आणि मुळीं उदक घालिजे
अर्थ
म्हणून (अर्जुना) हे सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाकावे, मग रागद्वेष आपोआप नष्ट होतील. ॥331॥ अर्जुना, आणखी एक गोष्ट (ऐक), रागद्वेषांचा (एकदा) नाश झाल्यावर (मग) इंद्रिये विषयात जरी (कदाचित) रममाण झाली तरी (ते विषय) बाधक होत नाहीत. ॥332॥ ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हातांनी स्पर्श करतो, पण त्या संगदोषाने तो लिप्त होतो काय? ॥333॥ त्याप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त, आत्मानंदात तल्लीन आणि कामक्रोधरहित झालेला असतो ॥334॥ आणि विषयातही (ज्याला) आत्मस्वरूपावाचून दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कसले काय? आणि कसली कोणाला बाधा करणार? ॥335॥ जर पाणी पाण्यात बुडेल, किंवा अग्नी आगीने पोळेल तर (मात्र) तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संगतीने लिप्त होईल. ॥336॥ असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन रहातो, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तू नि:संशय मान. ॥337॥
चित्त प्रसन्न झाले असता, त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. चित्त प्रसन्न असणाऱ्या बुद्धी (प्ररमात्मास्वरूपी) लवकर स्थिर होते. ॥65॥
पाहा, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते, तेथे कोणत्याही संसार-दु:खाचा प्रवेश होत नाही. ॥338॥ ज्याप्रमाणे अमृताचा झराच ज्याच्या पोटात उत्पन्न होतो त्याला तहानभुकेची भीती कधी नसते. ॥339॥ त्याप्रमाणे अंत:करण प्रसन्न झाले तर, मग दु:ख कसले आणि कुठले? त्यावेळी परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते. ॥340॥ ज्याप्रमाणे निवार्याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. ॥341॥
योगयुक्त नसलेल्या पुरुषाची बुद्धी (स्थिर) नसते आणि त्याला (स्थिरतेची) इच्छाही नसते. ज्याला (स्थिरतेची) इच्छा नाही, त्याला शांती नाही आणि शांतीरहिताला सुख कुठले? ॥66॥
योगयुक्त होऊन रहाण्याचा हा विचार ज्याच्या अंत:करणात नाही, त्याला (शब्दादि) विषय (आपल्या) पाशांनी जखडून टाकतात. ॥342॥ अर्जुना, त्याची बुद्धी स्थिर तर, केव्हाच होत नाही आणि तशी बुद्धीस्थिरतेची उत्कट इच्छाही त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. ॥343॥ आणि पाहा, निश्चलत्वाची नुसती कल्पनाही जर त्याच्या मनाला शिवत नाही तर अर्जुना, त्याला शांतीचा लाभ कसा होणार? ॥344॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जेथ कामु उपजला, तेथ क्रोधु आधींचि आला…