वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
तूं योगयुक्त होउनी । फळाचा संग सांडुनी । मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥267॥ परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे । तरी विशेषें तेथ तोषावें । हेही नको ॥268॥ कां निमित्तें कोणें ऐकें । तें सिद्धी न वचतां ठाके । तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥269॥ आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें । परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥270॥ देखें जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे । तरी परीपूर्ण सहजें । जहालें जाणे ॥271॥ देखें संतासंतीं कर्मीं । हें जें सरिसेपण मनोधर्मीं । तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥272॥
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय । बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥49॥ बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥50॥
अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाण योगाचें । जेथ मना आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥273॥ तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडें पार्था । दिसे हा अरुता । कर्मभागु ॥274॥ परि तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे । जें कर्मशेष सहजे । योगस्थिति ॥275॥ म्हणोनि बुद्धियोगु सधरु । तेथे अर्जुना होई स्थिरु । मनें करी अव्हेरु । फळहेतूचा ॥276॥ जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इहीं उभय संबंधी सांडिले । पापपुण्यीं ॥277॥
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः । जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥51॥
ते कर्मी तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । आणि यातायाति लोपती । अर्जुना तयां ॥278॥ मग निरामयभरित । पावती पद अच्युत । ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥279॥
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति । तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥52॥
हेही वाचा – Dnyaneshwari : दैवें अमृतकुंभ जोडला, तो पायें हाणोनि उलंडिला…
अर्थ
अर्जुना, तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफाळाचा अभिलाष टाकून मग मन लावून विहित कर्मे करावीस. ॥267॥ परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले तरी, त्यात विशेष संतोष मानावा, हेही नको. ॥268॥ किंवा काही कारणामुळे ते (आरंभिलेले कर्म) जरी सिद्धीस न जाता (अर्धवट) राहिले, तरीही त्या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नये. ॥269॥ हाती घेतलेले कर्म सिद्धीस गेले तर खरोखर आपले काम, झाले. पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झाले असेच समज. ॥270॥ (कारण असे पहा,) जेवढे म्हणून हातून कर्म होईल, तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पण केले तर, ते सहजच परिपूर्ण झाले, असेच समज. ॥271॥ हे पाहा, पूर्ण आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे, तीच (खरी) योगस्थिती (निष्काम कर्मयोग) आहे. तिचीच ज्ञानी पुरुष प्रशंसा करतात. ॥272॥
हे अर्जुना, (निष्काम) बुद्धियुक्त होऊन केलेल्या कर्मपेक्षा (फलेच्छेने केलेले) कर्म अत्यंत निकृष्ट आहे. तू बुद्धीचा आश्रय कर. फलाचा हेतू मनात ठेवून कर्म करणारे दीन होत. ॥49॥ बुद्धियुक्त पुरुष या लोकीच पुण्य आणि पाप या दोहोंचाही त्याग करतो. म्हणून योगाकरिता प्रयत्न कर. (कारण) योग म्हणजे कर्मातील कौशल्य होय. ॥50॥
अर्जुना, (यशापयशी) चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे, असे समज. या योगात मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असते. (मनाचा संकप आणि बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो). ॥273॥ पार्था, बुद्धियोगाचा (निष्काम कर्मयोगाचा) विचार करून (तुलनेने) पाहता सकाम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो. ॥274॥ परंतु (आरंभी) तेच सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच (पुढे) या निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. कारण असे करता करता सकाम कर्मातून कर्तृत्वमद आणि फलास्वाद टाकून राहिलेले जे शेष कर्म ती सहजच योगस्थिती होय. ॥275॥ म्हणून बुद्धियोग हाच भक्कम पायावर उभारलेला आहे. त्यावरच अर्जुना, तू आपले मन स्थिर कर आणि मनाने फलाशेचा त्याग कर. ॥276॥ जे बुद्धियोगाचा आश्रय करतात, तेच संसारसागराच्या पलिकडे जातात, त्यांचीच पाप आणि पुण्य दोहोंच्याही बंधातून सुटका होते. ॥277॥
बुद्धियोगाचा अवलंब करणारे ज्ञानी लोक कर्मजन्य फलाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात; (आणि) सर्व उपद्रवरहित अशा मोक्षपदाला जातात. ॥51॥
ते (निष्काम कर्मयोगी) कर्मे तर करतात, पण कर्मफलाला (मनानेही) शिवत नाहीत. म्हणून अर्जुना, जन्ममरणाच्या त्यांच्या येरझारा बंद पडतात. ॥278॥ मग अर्जुना, ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक (सर्व उपद्रवरहित म्हणून) ब्रह्मानंदाने ओथंबलेले आणि कधीही न ढळणारे असे पद पावतात. ॥279॥
जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी मालिन्याचे अतिक्रमण करील, तेव्हा तू (पूर्वी) ऐकलेल्या आणि पुढे ऐकण्याच्या (गोष्टीं-) विषयी विरक्त होशील. ॥52॥
क्रमश:
(साभार – शं वा तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा –Dnyaneshwari : म्हणोनि तूं जाण, हे सुखदुःखासीच कारण…