प्रदीप केळूस्कर
कोल्हापूर ते सावंतवाडी एसटी बावड्याहून सुटली आणि घाटमार्गे कोकणात जायला मार्गस्थ झाली. नवीन एक-दोन प्रवासी होते, त्यांना वसंत कंडक्टरने तिकिटे दिली, पैसे बॅगेत ठेवले… एवढ्यात त्याचा मोबाइल वाजला, त्याने पाहिलं त्याची बायको वसुधा बोलत होती…
वसुधा, “अहो, अजितचो मघाशी फोन इल्लो…”
वसंतला आश्यर्य वाटले. गेल्या तीन वर्षांत स्वतःहून कधीही फोन न करणाऱ्या आपल्या मुलाने… अजितने फोन कसा काय केला?
वसंत, “काय म्हणा होतो? आणि फोन करुची बुद्धी कशी झाली तेका?”
वसुधा, “अहो, आनंदाची बातमी सांगून फोन केल्यानं, तुमी आजोबां व्हतालात?”
वसंत, “काय?”
वसुधा, “होय हो, ताच सांगून फोन केल्यानं आणि माका अमेरिकेक बोलावता…”
वसंतला खूप बरं वाटलं, कधी तरी आपल्या मुलाला आपली चूक कळेल आणि तो आई-बाबाला फोन करेल, याची त्याला आशा होतीच! तसेच झाले, मुलाने फोन करून आनंदाची बातमी सांगितली.
तो पुन्हा फोनवर बोलणार एवढ्यात रेंज गेली आणि त्याचे बोलणे अर्धवट राहिले. त्याने मोबाइल खिशात ठेवला आणि तो बाहेर पाहू लागला. ऑगस्ट महिना होता, जुलैमध्ये भरपूर पाऊस पडून गेला होता आणि आत्ता पण पावसाची रिमझिम सुरूच होती…
खरंतर, गेली 35 वर्षे आठवड्यात निदान एक वेळ तरी तो या ट्रिपवर असायचा, त्याला नेहेमी हा घाट दिसायचा, पण हा घाट जास्त मस्त वाटू लागला… हिरवी गार झाडं… पाण्याचे लहान मोठे धबधबे… घाटात पसरलेले धुकं… जवळजवळ तीन वर्षांनी आज अजितचा अमेरिकेतून फोन…
गाडी घाटातील वळणावळणाने धावत होती आणि त्याचवेळी वसंताचे विचार धावत होते… त्याला दोन वर्षांचा अजित डोळ्यासमोर आला. गोंडस मुलगा… कुणाकडेही जायचा… सर्वाकडून लाड करून घयायचा… सतत आईच्या पाठीमागे असायचा. आपली कंडक्टरची नोकरीं, कधी मालवण, कधी देवगड, कधी मुंबई… अशी ड्युटी. पण आपण जिथे जायचो तेथून त्याच्यासाठी काहीतरी खाऊ आणायचो.
छोटया अजितला दशावतारी नाटक दाखवायला सायकलवरून न्यायचो. जत्रेत फुगे, खेळणी घेऊन दयायचो. पण आपली असली ड्युटी, त्यामुळे त्याला शाळेत सोडायला क्वचितच जात होतो. पण आपले वडील अण्णा त्याला शाळेत सोडायचे आणि आणायचे. कधी कधी वसुधा त्याला शाळेत सोडायची.
अजित पहिल्यापासून हुशार, कधीही पहिला-दुसरा नंबर सोडला नाही. दहावी-बारावीत चांगले मार्क्स मिळविले त्याने! मग बारावीनंतर त्याला रत्नागिरीच्या इंजिनीरिंग कॉलेजमध्ये घातले, चार वर्षे पहिल्या वर्गात पास झाला. किती आनंद झाला आपल्याला… मी दहावी नापास! त्याची आई पण आठवी पास झालेली!! पण ही नोकरी करून मुलाला शिकविलं. आपल्या डेपोत सर्वांना आपलं कौतुक… “वसंतान झिलाक शिकवल्यानं, आपण त्रास काढल्यानं… पण झिलाक काय कमी करूंक नाय.”
हेही वाचा – एका संपाची कहाणी
हे ऐकल्यानंतर शरीरावर दोन मूठ मास चढायचे. अण्णांना खूप बरे वाटले… आपला नातू इंजिनीअर झाला म्हणून! वसुधा तर हवेत होती, त्यात तिच्या बहिणीची मुले फारशी शिकली नव्हती… म्हणून जास्त.
सुदैवाने, अजित कॅम्पसमधून सिलेक्ट झाला… दोन वर्षं पुणे आणि मग अमेरिकेत पोहोचला. मुंबई विमानतळावर आपण आणि त्याची आई गेलो होतो पहिल्यांदाच त्याला निरोप द्यायला. आपण विमानतळ कुठे पाहिला होता? आपल्या नशिबात बॉम्बे सेंट्रल एसटी स्टॅण्ड नाहीतर परेल एसटी डेपो! पण आपल्या झिलाने विमानातून फिरणे, हे त्याला विशेष वाटतं होते.
कोल्हापूर-सावंतवाडी एसटी आता कणकवलीच्या जवळ आली होती. कणकवलीत काही प्रवासी उतरले काही चढले. त्याने बुकिंग संपवले आणि वसुधाला फोन करून सात वाजेपर्यंत घरी पोहोचतो, आंघोळीला पाणी गरम करून ठेव, असा निरोप दिला.
नवऱ्याचा फोन आला म्हणून वसुधा दोरी घेऊन विहिरीवर गेली आणि दोन कळशा पाणी काढून मडक्यात ओतले. परसातील माडाच्या झावळ्या गोळा केल्या आणि मडक्याखाली घालून आग पेटवली. त्याच मडक्यासमोर बसून ती आठवू लागली.
अजित अमेरिकेला गेला तेव्हा आपल्याला वाईट वाटले, कारण आता वर्ष-दोन वर्षं तो दिसणार नव्हता, पण आपल्या माहेरी आणि घरी कोण परदेशात गेला नव्हता, म्हणून त्याचा अभिमान पण वाटला. अजित अमेरिकेत गेला आणि त्याचा पगार वाढला. पण आपला नवरा त्याच्याकडून एक रुपया पण मागत नव्हता… त्याचे म्हणणे, ‘मला पगार मिळतो, तो पुरेसा आहे.’
मग अजितला मुली सांगून यायला लागल्या. पण त्याने त्याच्या रत्नागिरीमधील वर्गमैत्रिणीबरोबर लग्न ठरवलं. आम्ही दोघांनी संमती दिली, पण सासरे अण्णा म्हणत होते, “सांभाळून राहा…” कारण, ही शहरातील मुलगी आहे आणि पैसेवाल्याची आहे. तिचे आईवडील बँकेतील ऑफिसर, रत्नागिरीजवळ आंब्याच्या बागा आणि ही एकच मुलगी.
पण अण्णाच्या विरोधात जाऊन त्त्यांचे लग्न झाले आणि सुवर्णा या घरची सून म्हणून आली. घरात सून म्हणून आली नुसतेच म्हणायचे, कारण ती घरात कधी टिकलीच नाही. अमेरिकेत जायच्या आधी नोकरीनिमित्त पुण्याला आणि सुट्टीत माहेरी. त्याच्या लग्नानंतर सहा महिन्यांनी अण्णा गेले तेव्हा सुद्धा तिच्या आईवडिलासोबत अर्धा तास थांबून गेली. मग तिचा पासपोर्ट, व्हिसाचं काम झालं आणि ती गेले पाच वर्षे अमेरिकेत.
एसटीने कुडाळ सोडलं तसं वसंताने बुकिंग बंद केलं, आता गाडी सावंतवाडीपर्यत कुठे थांबणार नव्हती, म्हणून तो डोळे मिटून बसला…
सुवर्णा अमेरिकेत पोहोचली आणि अजितचे फोन येणे कमी कमी होते गेलं… नंतर जवळजवळ बंदच झाले. मग आपल्याला राहवत नव्हते म्हणून मी व्हॉट्सएपवर मेसेज पाठवायचो… चार मेसेज गेले की, त्याचा एक मेसेज.. तोपण ‘आम्ही खुशाल आहोत’ एवढाच! त्याची आई चिडायची, पण आपण तिला गप्प बसवायचो.
मध्यंतरी कोरोना महामारी आली. आमचे पगार थांबले, तेव्हा वाटत होतं, आपला मुलगा आपली चौकशी करेल, “पैसे पाठवू का?” असे विचारेल कारण त्या दोघांचं घरून काम सुरू होतं आणि पगार सुरू होता. पण त्यानी साधी चौकशी केली नाही!
हेही वाचा – मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध
वसुधा खूप खूप आनंदात होती… कारण, ती आजी होणार होती. तिच्या मनात आलं अण्णांनी सुवर्णाच्या पोटी जन्म घ्यावा, पण मुलगी झाली तर? मी माझ्या सासूला पहिलंच नाही… पण लोक सांगतात, ती अत्यंत मेहेनती आणि सुस्वभावी होती… मग तिने जन्म घेतला तरी चालेल.
आपल्याला अजितने अमेरिकेला बोलावलंय, याचा पण आनंद आहे. कशी असेल अमेरिका? आपण फोटोत पाहातो तेवढं माहीत… तेथील मोठमोठे रस्ते… मोठ्या गाड्या, टोलेजंग बिल्डिंग… तिचे मनोराज्य सुरू झाले. एवढ्यात तिच्या लक्षात आलं, आपल्यकडे चांगले कपडे कुठे आहेत? तिने मनातल्या मनात लिस्ट बनवली… चार परकर, चार साड्या, ब्लाऊज शिवून घयायला हवेत… चांगल्या चप्पल की बूट? तिकडे थंडी फार असते… म्हणजे स्वेटर, शाली!
सुवर्णा गरोदर आहे, म्हणजे डिंकाचे लाडू न्यायला हवेत… कुठे मिळतील डिंकाचे लाडू? सावंतवाडीच्या साधलेंना सांगायला हवे, लाडू बनावून द्यायला.
पहिला विमानप्रवास… आपण एसटी आणि हल्ली दोन वेळा मुंबईला गेलो, तेव्हा कोकणरेल्वे सोडून कधीच कसला प्रवास केला नाही! आपल्याला जमेल का विमानाने जाणे… नवरा सोबत नसणार… आपल्याला धड मराठी बोलता येत नाही, इंग्लिश तर पुढची गोष्ट! आणि ते पासपोर्ट असं काहीतरी असतं त्याचं काय?
वसंता सावंतवाडीत पोहोचला, त्याने गाडीचा हिशेब डेपोमध्ये कॅशियरकडे जमा केला. आता त्याला उद्या सुट्टी. सकाळी बायकोने चांगली बातमी सांगितली, तो खूश झाला. शेवटी मुलाने बातमी सांगितली आणि आईला अमेरिकेला ये म्हणाला, तिकीट पाठवतो म्हणाला… हा दुसरा-तिसरा महिना असणार सुनेला… म्हणजे वसुधाला जायला वेळ आहे अजून… किमान चार महिने! तोपर्यत तिचा पासपोर्ट काढून घयायचा, आता पणजीमध्ये पासपोर्ट मिळतो. आपला पण काढावा का पासपोर्ट? हो, काढावाच, त्याने आपल्याला पण बोलावलं तर!
वसंताने डेपोमध्ये ठेवलेली मोटरसायकल सुरू केली, वाटेत तळ्याजवळ थांबून पेढे घेतले, पुढे जाऊन चंदू भुवनमधून समोसे घेतले आणि तो मळगावच्या दिशेने निघाला.
नवऱ्याची गाडी बघून वसुधा बाहेर आली, तिच्या हातात वसंताने पेढे, समोशाची पिशवी आणि आपली रोजची बॅग दिली अन् तो खळ्यातील नळावर हातपाय धुवायला गेला.
वसुधा, “पाणी गरम आसा, अंघोळच करून घ्यावा, तोपर्यत मासे भाजून घेतंय, म्हणजे जेवूक बसा.”
वसंताने मान डोलावली आणि तो कपडे घेऊन आंघोळ करायला गेला. गरम गरम पाणी डोक्यावर सोडताना त्याला छान वाटत होतं.
घरात वसुधाने सकाळी मीठ लावून ठेवलेले बांगडे तव्यावर तळायला घेतले. त्या तळणाऱ्या बांगड्याचा वास आल्याने वसंताची भूक चाळवली. केव्हा एकदा ताटावर बसतो आणि भात माशाची आमटी आणि तळलेले बांगडे तोंडात घालतो, असं त्याला झालं. आंघोळ करून आणि कपडे घालून वसंता पाटावर बसला. त्याच्यासमोर ताट आणि पाणी ठेवलेले होतेच. वसुधाने गरमगरम भात वाढला आणि त्याचेवर बांगड्याची आमटी ओतली, ताटात तळलेले बांगडे ठेवले.
वसंताने दोन घास तोंडात घेतले आणि सहज विचारावे तसे विचारले, “कितवो महिनो?”
“सातवो.”
“काय? सातवो महिनो?आणि आत्ता आमका कळवता?”
“होय ना, आता माजी किती घाय होतली.. माका कपडे… ब्लाऊज.. बूट.. स्वेटर…”
“एक मिनिट थांब, म्हणजे आमच्या झिलान सातव्या महिन्यात कळविल्यानं की, तेची बायको पोटूशी आसा.. मग आधी म्हणजे दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात तेंका कळला आसात ना… मग तेवा कित्या नाय कळविल्यानं? एकदम सातव्या महिन्यात आणि आई तू ये इकडे म्हणान तो सांगता? आणि तू आणि मी खूश झालाव.. पण तेका आई येऊक व्हयी की मोलकरीण?”
“अहो, काय बोलतात? मोलकरीण काय म्हणतात?”
“मी खोटा नाय बोलणंय, म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यात आपल्या झिलाक आणि सुनेक कळला, की, ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान बाळंतपण येतला, मग आई-बाबाक कळवाक सप्टेंबर कित्या उजाडलो? हेचा कारण म्हणजे सुवर्णाच्या आईक तेंका अमेरिकेक बोलावूचा होता, पण गेल्या महिन्यात तिका म्हणजे सुवर्णाच्या आईक अटॅक इलो आणि तिचा पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये ऑपरेशन झाला, म्हणजे सुवर्णाची आई जाऊ शकणा नाय, तेव्हा सुवर्णाक तुझी आठवण इली…”
“आसात, पण मोलकरीण काय म्हणतात?”
“अगो बाये, अमेरिकेत कामवाली, मोलकरीण कोणाक परवडत नाय, ती गाडी घेऊन येतली आणि डॉलर्स घेऊन जातली. बाळंतीण आसा म्हणजे बाळ बाळंतनिक तेल लावणं, आंघोळ घालणा आसा… तशी मोलकरीण ठेवली तर दोघांचो वर्षाचो पगार संपतलो म्हणून तेनी भारतातून कामवाली मागवली… म्हणजे तू… कमी खर्चात आणि कोणाही पेक्षा प्रेमानं करणारी…”
“तुमचा काय तरी… कसलो हो तर्क?”
“मी कंडक्टर आसय, जरी मी दहावी नापास असलाय तरी पस्तीस वर्षा नोकरीं करून गणित पक्का झाला माझा… गाडीत भरलेल्या लोकांका रोज तोंड देत असताव आमी.. माजा गणित चुकाचा नाय.. तुका वाटता तर सुवर्णाच्या आईक फोन करून खात्री कर… आमका जीं बातमी आज समजली, ती तेंका मार्चमधी म्हाईत असतली…”
“पण माका पण वाटता हो माझ्या नातवंडाक कुशीत घेवचा, तेका आंघोळ घालुचा… तेका तेल लावचा.. तेची पापी घेवचा.. मग मी काय करू? जावं की नको जावं?”
वाचकहो, कथेचा शेवट करण्याआधी मी इथे थांबतो. अजितची आई विचारते आहे की, मुलाने बोलाविले तर, सुनेच्या बाळंतपणाला जावे की नाही? अजितचे बाबा म्हणजे वसंत कंडक्टर म्हणतात, तसे तो आईला नव्हे तर, भारतातून मोलकरीणला बोलवत आहे, म्हणून जाऊ नये.
वाचक हो, तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये लिहा, वाचक म्हणतील त्याप्रमाणे या कथेचा शेवट करूया.
मोबाइल – 9307521152 / 9422381299