सायली कान्हेरे
गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. घावन घाटलं हा पदार्थ कोकणात गौरीच्या नैवेद्यासाठी करतात. मेहनतीने बनविलेला हा पदार्थ खूप रुचकर असतो.
घावन
साहित्य
- काकडी – 1
- कणिक – 2 वाट्या
- तांदूळ पीठ – 1/2 वाटी
- साखर किंवा गूळ – 1/4 वाटी
- मीठ – चवीनुसार
- तेल
पुरवठा संख्या : 2 जणांसाठी
तयारीसाठी लागणारा वेळ :
- काकडी सोलून किसण्यासाठी 10 मिनिटे.
- शिजवण्यासाठी 10 मिनिटे
- एकूण कालावधी – 20 मिनिटे.
कृती
- काकडी सोलून, किसून घ्यावी.
- त्यात गूळ /साखर, मीठ घालून मंद आचेवर किस शिजवून घ्यावा.
- किस शिजल्यावर गॅस बंद करावा आणि तांदळाचे पीठ घालून ते एकजीव करून झाकण ठेऊन द्यावे.
- गार झाल्यावर त्यात कणिक घालून फार पातळ होणार नाही, इतके पाणी घालून भिजवावे. (डोसा पिठाइतपत पातळ ठेवावे)
- मग तवा तापवून त्यावर तेल सोडावे आणि घावनाचे पीठ या तव्यावर घालून त्यावर लगेच झाकण ठेवावे. यामुळे घावनाला भेगा पडत नाहीत. एक बाजू 10 ते 12 सेकंदात भाजून झाली की घावन उलटवून दुसरी बाजूही साधारणपणे तेवढ्याच सेकंदांसाठी भाजून मग घावन खाली काढावे.
घाटलं
साहित्य
- तांदूळ पीठ – 1/2 वाटी
- गूळ – 1 वाटी
- ओला नारळ – 1 वाटी
- खसखस – 4 चमचे
- वेलची पुड – 1 चमचा
- पाणी – 6 वाट्या
- मीठ – चवीनुसार
तयारीसाठी लागणारा वेळ :
- नारळ खोवण्यासाठीच 10 मिनिटे
- खसखस भाजण्यासाठी 10 मिनिटे
- एकूण – 20 मिनिटे
हेही वाचा – Recipe : राजेळी केळ्यांचे उंबर अन् कढी गोळे
कृती
- प्रथम खसखस मंद आचेवर छान भाजून घ्या. गार झाली की मिक्सरमधून फिरवून पावडर करून घ्या.
- मग गॅसवर पाणी उकळत ठेवावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे.
- पाण्याला उकळी आली गॅस मंद करून त्यात खवलेला ओला नारळ आणि गूळ घालावा.
- परत एक उकळी आली की, तांदळाचे पीठ पाण्यात कालवून त्याला लावावं.
- या मिश्रणात तांदूळ पिठी छान मिक्स झाली पाहिजे. त्यात पिठीच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी. छान एकजीव असा रस झाला पाहिजे. पिठी लावल्याने घाटलं दाटसर व्हायला मदत होते. खूपच दाटसर वाटलं तर थोडं गरम पाणी घालून घाटलं पातळ करू शकता.
- आता त्यात खसखशीची पावडर आणि वेलची पूड घालावी.
टीप
- वाढताना घावन ताटात तर, वाटीमधे घाटलं वाढावं
- घावन घाटल्यात बुडवून खावे.
- काही ठिकाणी घावन करताना तांदळाच्या पिठीत मीठ घालून नीर डोशासारखं पातळ पिठ भिजवून त्या पिठाची घावने करतात
- काही घरी घाटलं करताना खवलेल्या नारळाचे दूध काढून त्यात गूळ घालतात. नंतर बाकीची कृती केली जाते.
हेही वाचा – Recipe : झटपट स्वादिष्ट कॉर्न पुलाव
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.