अनिता बाळकृष्ण वैरागडे
मागील लेखामध्ये उभे राहून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघितले होते. आता या लेखात बसून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघूया.
पद्मासन
पद्म म्हणजे कमळ. हे आसन करणार्या व्यक्तीच्या शरीराचा आकार कमळासारखा भासतो म्हणून या आसनाला पद्मासन किंवा कमलासन हे नाव दिले आहे. जमिनीवर पाय सरळ समोर ठेवून ताठ बसावे. उजवा पाय जवळ घेऊन त्याचे पाऊल पकडून ते किंचित वर उचलावे आणि डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवावे. डावा पाय वाकवून त्याचे पाऊल थोडे वर उचलून, उजव्या पायावरून ओढून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवावे. तळहात गुडघ्यांवर पालथे किंवा ज्ञानमुद्रेत ठेवावेत. पाठीचा कणा ताठ ठेवून दृष्टी नासाग्री (नाकाच्या शेंड्याकडे) ठेवावी किंवा डोळे मिटावेत. श्वसन नैसर्गिकरित्या चालू असावे.
फायदे – ध्यानस्थ बसण्यासाठी अत्यंत उपयोगी आसन आहे. मानसिक शांती आणि स्थिरता यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पद्मासन नियमितपणे केल्यास गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास होत नाही.
वज्रासन
या आसनात बसून योगमुद्रा, ब्रह्ममुद्रा, शशांकासन, समर्पणासन, सुप्त वज्रासन ही आसने तसेच प्राणायाम, ध्यान, ओंकारजप इत्यादी साधना करता येते. त्यामुळे हे आसन महत्त्वपूर्ण आहे. वज्रासन करताना प्रथम गुडघ्यावर बसून पायाचे तळवे मागच्या बाजूला वरच्या दिशेने ठेवावेत. पाठ ताठ असावी. श्वासाची क्रिया हळूहळू सुरू ठेवा. हात गुडघ्यांवर ताठ ठेवावेत. या आसनात 1 ते 3 मिनिटे किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ बसता येईल.
फायदे – जेवणानंतर इतर आसने करायची नसतात. परंतु, वज्रासन यास अपवाद आहे. जेवल्यानंतरही या आसनात पाच-दहा मिनिटे बसता येऊ शकते, त्यामुळे पचनक्रियेस मदत होते. रक्तभिसरण सुधारते. कटिप्रदेश, ओटीपोट, जननेंद्रियाच्या सभोवतालचा भाग यावर या आसनाचा विशेष परिणाम होतो.
हेही वाचा – Yoga is lifestyle : ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, उत्कटासन…
बद्ध कोनासन
बद्ध कोनासनाचे दोन प्रकार आहेत. आधी आपण पहिला प्रकार बघूया. खाली बसल्यानंतर गुडघे दुमडून दोन्ही पायांचे तळवे समोर एकत्र जोडून ठेवायचे. पायांचे तळवे पोटाजवळ शक्य तितक्या जवळ आणल्यानंतर मांडी, गुडघा आणि पोटरी अशा पायांच्या भागांची हालचाल फुलपाखराच्या पंखांप्रमाणे वर-खाली करावी.
दुसऱ्या पद्धतीत गुडघे दुमडून दोन्ही पायांचे तळवे एकत्र जोडून ठेवायचे. त्यानंतर दोन्ही हात नमस्कारच्या मुद्रेत श्वास घेत वर न्यायचे आणि काही सेकंद थांबून हळूहळू हात खाली आणून जमिनीवर ठेवायचे. डोकं जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा.
फायदे – रक्ताभिसरण सुरळीत होते. पचनक्रिया सुधारते. पाठीचा कणा तसेच कंबरेचे आणि पायाचे स्नायू मजबूत होतात.
हेही वाचा – Yoga is lifestyle : अर्ध हलासन, पूर्ण हलासन, सर्वांगासन