वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली
अध्याय दुसरा
अन्तवन्व इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः । अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत ॥18॥
आणि शरीरजात हे आघवें । हें नाशवंत स्वभावें । म्हणोनि तुवा झुंजावें । पंडुकुमरा ॥136॥
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् । उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥19॥
तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि या शरीरातें । मी मारिता हे मरते । म्हणत आहासी ॥137॥ तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥138॥
न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता न भूयः । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥20॥ वेदाविनाशिनं नित्यं य एनमजव्ययम् । कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥21॥
जैसें स्वप्नामाजिं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे । मग चेऊनियां पाहिजे । तंव कांही नाहीं ॥139॥ तैसी हे जाण माया । तूं भ्रमत आहासी वायां । शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगी न रुपे ॥140॥ कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला । परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥141॥ ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे ।
तो भंगलिया आपैसें । स्वरूपचि ॥142॥ तैसें शरीराचां लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं । म्हणऊनि तूं हें नारोपीं । भ्रांति बापा ॥143॥
हेही वाचा – Dnyaneshwari : इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती
अर्थ
नित्य, अविनाशी आणि अगम्य अशा आत्म्याचे हे देह (स्वभावत:) विनाशी म्हटलेले आहेत; म्हणून हे अर्जुना, तू युद्ध कर. ॥18॥
आणि शरीर म्हणून जेवढे आहे, तेवढे सगळे स्वभावत: नाशवंत आहे; म्हणून अर्जुना तू लढावेस, हे योग्य आहे. ॥136॥
हा (आत्मा) मारणारा आहे असे जो समजतो आणि मरणारा आहे, असे जो समजतो, त्या दोघांनाही (खरे) कळत नाही. हा कोणाला मारीत नाही, (किंवा कोणाकडून) मारला जात नाही. ॥19॥
तू देहाचा अभिमान धरून या शरीराकडेच दृष्टी देऊन मी (अर्जुन) मारणारा आणि हे (कौरव) मरणारे, असे म्हणत आहेस. ॥137॥ तरी अर्जुना, तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्वत: विचार करून पाहशील तर तू मारणारा नाहीस आणि हे मारले जातील, असेही नाहीत. ॥138॥
हा (आत्मा) कधी जन्म पावत नाही अथवा कधी मृत्यू पावत नाही. हा (एकदा) होऊन पुन्हा होणारा नाही, असेही नाही. हा जन्मरहित, नित्य, क्षयरहित आणि अनादि आहे. शरीराचा नाश झाला असता याचा नाश होत नाही. ॥20॥ हे पार्था, या आत्म्याला जो नाशरहित, नित्य, जन्मरहित आणि क्षयरहित असा जाणतो, तो पुरुष मारणार तरी कसा? आणि कोणाला मारण्यास प्रवृत्त तरी करणार कसा? ॥21॥
ज्याप्रमाणे जे स्वप्नात पाहावे, ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते; पण मग जागे होऊन पाहावे, तो काही एक नसते. ॥139॥ त्याप्रमाणे ही (केवळ) माया आहे असे समज. तू व्यर्थ (हिच्या) भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे (मनुष्याच्या) सावलीला शस्त्राने मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत नाही, ॥140॥ किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो ॥141॥ किंवा ज्याप्रमाणे आकाश हे मठात मठाच्या आकाराचे झालेले असते पण तो मठ मोडल्यावर ते आकाश सहजच आपल्या मूळरूपाने रहाते ॥142॥ त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ स्वरूपाचा मुळीच नाश होत नाही. म्हणून बाबा, तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस. ॥143॥
(क्रमश:)
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : आतां अर्जुना आणिक कांही एक सांगेन मी आइक…