सतीश बर्वे
गेल्या आठवड्यातली गोष्ट. अचानक डोंबिवलीला जायचा मणिकांचन योग जुळून आला. ओला कॅब बुक केली. कॅबमध्ये बसल्यावर मी ड्रायव्हरला ओटीपी नंबर दिला आणि प्रवास सुरू झाला. साधारणपणे अशा प्रवासात मी ड्रायव्हरबरोबर थोड्याफार गप्पा मारतो. माझ्या ड्रायव्हरचे नाव होते रमेश यादव. नवी मुंबईचा रहिवासी होता तो. इकडच्या तिकडच्या जुजबी गप्पा झाल्यावर तो स्वतःच बोलायला लागला आणि त्याने त्याची कहाणी मला ऐकवली…
त्याचे वडील माझगाव डॉकमध्ये 42 वर्षे नोकरी करून निवृत्त झालेले. त्याचे बालपण धारावीत गेले होते. तिथल्या वातावरणात हा शिक्षणात मागे पडला आणि व्यसनांच्या आहारी गेला, तब्येत नकळत खराब होत गेली. वडिलांनीच ओळखीने मग त्याला नोकरीला लावले. कालांतराने लग्न करून दिले. वाईट संगतीमुळे आपल्याला जे दिवस अनुभवायला लागले ते आपल्या मुलांना लागू नये म्हणून रमेशने नवी मुंबईमध्ये भाड्याचे घर घेतले आणि तिथेच राहायला लागला. जे काही पैसे घरात येत होते त्यात संसार सुरू झाला. पुढे एक मुलगा आणि एक मुलगी झाली.
सगळे काही नीट सुरू असताना एक दिवस याची एक किडनी निकामी झाली. नशीब हात धुवून त्याच्या मागे लागले होते. वडील निवृत्त केंद्रीय कर्मचारी असल्याने बरेचसे वैद्यकीय उपचार मोफत मिळाले. त्याचे डायलिसिस सुरू झाले. हा निराश झाला. त्या दरम्यान हातातील नोकरी सोडावी लागली. घराजवळील गणपती विसर्जनाच्या तलावाजवळ हताश बसला होता. विसर्जनाच्या मूर्ती बघून याच्या डोळ्यांत पाणी आले… पण त्याच क्षणी पुढील पाच वर्षे घरात गणपती आणण्याचा निश्चय त्याने केला. डायलिसिस जवळपास तीन वर्षे चालले. पण पुढच्याच वर्षी दुर्दैवाने दुसरी किडनी देखील निकामी होण्याची शक्यता निर्माण झाली. त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा राहिला. त्याच्या बायको हिम्मत हरली नाही. तिने आपली एक किडनी दान करून नवऱ्याचे प्राण वाचवले.
आज दोघेही नवरा बायको एका किडनीवर जगत आहेत. या सगळ्या काळात गणपती बाप्पाने मानसिक बळ वाढवले, हे त्याने कृतज्ञापूर्वक सांगितले मला. पुढे तब्येत थोडी सुधारल्यावर याने पैसे उभे केले आणि गाडी विकत घेऊन ती ओला, उबरला लावून व्यवसाय सुरू केला. तेव्हापासून त्याच्या खाण्यापिण्याकडे बायकोचे व्यवस्थित लक्ष असते. सकाळी घरातून न्याहारी करून हा निघतो. सोबत पोळी-भाजीचा डबा असतो. बायको चार-पाच बाटल्यांमध्ये उकळून गार केलेले पाणी भरून देते. दिवसाचे कमीतकमी 14-15 तास हा गाडी चालवतो. बाहेरचे काहीही खायचे नाही, अशी सक्त ताकीद बायकोने त्याला दिली आहे. दर चार तासांनी एक अशा दिवसातून सहा गोळ्या त्याला आयुष्यभर खायच्या आहेत. सगळा खर्च वजा जाता रोजचे 1000-15000 दरम्यान पैसे सुटतात.
हेही वाचा – Lifestyle : आयुष्य एक वाहता प्रवाह
कधी कधी शरीर साथ देत नाही. जीव थकतो. पण दोन मुलांकडे बघून याचा जीव तुटतो. मोठा मुलगा यंदा दहावीची परीक्षा 87% मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाला. धाकटी मुलगी आठवीत गेली आहे. दोन्ही मुले गुणी आहेत. वडील किती कष्ट करतात याची पुरेपूर जाणीव दोघांनाही आहे. मुलांचा कसलाही हट्ट नसतो. वडील जे कौतुकाने देतील, त्यावर दोन्ही मुले समाधानी आहेत.
जेमतेम 40 वर्षांचा रमेश यादव. पण जगण्यासाठी त्याची चालली धडपड ऐकून क्षणभर मी सुद्धा हादरलो. थोडेसे उपदेशात्मक विचार त्याला ऐकवून त्याची जगण्याची धडपड कशा रीतीने सुसह्य होईल यासंदर्भात चार गोष्टी त्याला सुचवल्या. सुदैवाने त्याला त्या पटल्या देखील! त्याबद्दल त्याने माझे आभार देखील मानले.
ऐरोली टोल नाक्याजवळ त्याचे बोलणे संपले. एव्हाना माझे डोके सुन्न झाले होते. मी खिडकीतून बाहेर बघायला सुरुवात केली. तेवढ्यात मी कुठवर पोहोचल्याचा फोन आला. मी उत्तर दिले आणि परत ज्या कार्यक्रमासाठी निघालो होतो, त्याच्या विचारात गढून गेलो.
रमेश यादवच्या बायकोच्या रूपात मला खरोखरच भेटली होती, कलियुगातील सावित्री. जिने स्वतःची एक किडनी नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी दान केली आणि त्या दिवसांपासून डोळ्यांत तेल घालून ती सावित्री आपल्या नवऱ्याची काळजी घेत आहे.
हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…
माझ्या उतरण्याच्या ठिकाणी गाडी थांबली. का कोण जाणे, पण माझ्याबरोबर रमेश देखील गाडीतून खाली उतरला. माझ्याजवळ येऊन त्याने पाया पडून माझा आशीर्वाद घेतला. त्याच्या या अशा कृतीने मी आश्चर्यचकित झालो. मी त्याच्या पाठीवर थोपटून ‘आयुष्यमान भव:, सदा सुखी, निरोगी आणि यशस्वी भव:’ असा आशीर्वाद दिला. हे सगळे घडत असतानाच त्याला नवीन भाडं मिळाले आणि मी फोटोसाठी त्याला विनंती करायच्या आतच तो गाडी सुरू करून निघून गेला. त्याच्यासोबत फोटो काढायला मिळाला नाही, ही चुटपुट मात्र मनाला लागली. ती तशीच बाजूला ठेऊन मी त्या टोलेजंग इमारतीच्या तळ मजल्याच्या चार पायऱ्या चढून लिफ्टपाशी पोहोचलो…
(सत्य घटनेवर आधारित)