वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा । तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्त्तत्र न मुह्यति ॥13॥
आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक । हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥108॥ एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि न नाशे । एकेकासवें ॥109॥ तैसीं चैतन्याचां ठायीं । इयें शरीरांतरे होती जाती पाहीं । ऐसें जाणे जया नाहीं । व्यामोहदुःख ॥110॥
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥14॥
एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियांआधीनपण । तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥111॥ इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती । ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥112॥ जयां विषायांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं । तेथ दुःख आणि कांहीं । सुखहि दिसे ॥113॥ देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ द्वेषाद्वेष उपजति । श्रवणद्वारें ॥114॥ मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥115॥ भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरूप देख । जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥116॥ सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु । जो घ्राणसंगे विषादु – । तोषु देता ॥117॥ तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु । म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥118॥ देखें इंद्रियांआधीन होईजे । तें शीतोष्णांते पाविजे । आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें ॥119॥ या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं । ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥120॥ हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें । कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥121॥ देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं । हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥122॥
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ । समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥15॥
हेही वाचा – Dnyaneshwari : … जयापरी पार्थु । भ्रांति सांडी
अर्थ
जीवाला ज्याप्रमाणे या देहामध्ये बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य असतात, त्याचप्रमाणे (एक देह जाऊन त्याला) दुसऱ्या देहाची प्राप्ती होत असते (आणि) असे असल्यामुळे जो, आत्मा नित्य असल्याचे जाणतो, त्याला (जन्ममरणाची) भ्रांती उत्पन्न होत नाही. ॥13॥
आणखी असे पहा की, शरीर तर एकच आहे, पण वयपरत्वे त्यास अनेक दशा प्राप्त होतात, हा प्रत्यक्ष पुरावा तू पाहा. ॥108॥ याच्या ठिकाणी पहिल्याने बालपण दिसते, मग तारुण्यात ते बालपण नाहीसे होते, पण शरीराच्या एकेक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. ॥109॥ त्याचप्रमाणे हे पहा, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात आणि जातात, असे जो जाणतो त्याला भ्रांतिजन्य दु:ख कधीही होत नाही. ॥110॥
हे अर्जुना, इंद्रियांचे (विषयांशी होणारे) संयोग शीत-उष्ण, सुख-दुःख देणारे आहेत; ते उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहेत; म्हणून हे भारता, त्यांना तू सहन कर. ॥14॥
असे न जाणण्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे. ती इंद्रिये अंत:करणावर आपला पगडा बसवितात, म्हणून त्याला भ्रम होतो. ॥111॥ इंद्रिये विषयांचे सेवन करतात, त्यामुळे सुखदु:खे उत्पन्न होतात. ती (मग) आपल्या संसर्गाने अंत:करण ग्रासून टाकतात. ॥112॥ ज्या (शब्दादि) विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दु:ख प्राप्त होते. ॥113॥ पाहा की, निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल, तसे क्रोध किंवा लोभ अंत:करणात उत्पन्न होतात. ॥114॥ मृदु आणि कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत; ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला आणि दु:खाला कारण होतात. ॥115॥ पाहा, भेसूर आणि सुरेख ही रूप या विषयाची दोन स्वरूपे आहेत; ती नेत्रद्वारे सुखदु:ख उत्पन्न करतात. ॥116॥ सुगंध आणि दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख आणि दु:ख उत्पन्न करतात. ॥117॥ त्याप्रमाणे (कडू आणि गोड असा) दोन प्रकारचा रस आवड आणि नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे. ॥118॥ पाहा, जेव्हा (मनुष्य) इंद्रियांच्या ताब्यात जातो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वत: सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो. ॥119॥ पाहा, या इंद्रियांचा हा स्वभावच असा आहे की, त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड वाटत नाही. ॥120॥ हे विषय आहेत तरी कसे ? मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो; ॥121॥ पाहा, तसे (हे विषय) क्षणभंगुर आहेत. याकरिता धनुर्धरा तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस, ॥122॥
हे पुरुषश्रेष्ठा, हे (विषयसंबंध) ज्या पुरुषाला उपद्रव देत नाहीत आणि (म्हणून) ज्याला सुख आणि दुःख समान आहेत. असा तो धीर पुरुष मोक्षाला योग्य होतो. ॥15॥
क्रमश:
(साभार – शं वा तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिले…