सतीश बर्वे
भाग 1
“आई, अगं एवढं काय निरखून बघतेयस त्या पेंटिंगमध्ये?”
माझा मुलगा सौरभ हॉटेलच्या चेक-इनची औपचारिकता पूर्ण करत असताना मी तिथल्या भिंतीवर बाजूबाजूला एक लावलेली पेंटिंग बघत होते. खरंतर, मला तसं पेंटिंगमधून काही अर्थबोध होत नव्हता. पण तितक्याच माझी नजर एका पेंटिंगच्या खालच्या डाव्या कोपऱ्यात गेली. पेंटरचं तिथे लिहिलेलं नांव मी निरखून बघत असतानाच सौरभने मला प्रश्न विचारला.
“काही नाही रे, एवढं अवाढव्य पेंटिंग ज्याने कोणी काढलंय, त्याचं नाव वाचण्याचा प्रयत्न करत होते…” मी सौरभला म्हणाले.
“आई तू पण अशी निरखून बघत होतीस, जसा काही तुझा कोणी मित्रच आहे तो पेंटर! चल, आता मी बॅगा घेतोय आपल्या दोघांच्या. तू ये सावकाश चालत. मी त्या समोरच्या लिफ्टजवळ उभा राहातो…” असं म्हणून सौरभने बोटाने मला लिफ्ट कुठे आहे, ते दाखवले. सौरभने मघाशी मित्राचा उल्लेख केला आणि क्षणभर मनांत विचार चमकून गेला की, ‘त्या पेंटिंगवर ज्याचं नाव लिहिले आहे, तो आपल्या कॉलेजचा मित्र राजेश तर नसेल ना? कारण शाळेत असताना तो खूप चांगली चित्रं काढायचा. इथे मुक्काम आहे तोवर या गोष्टीचा छडा लावायचा,’ असं मनाशी ठरवत मी लिफ्टपाशी पोहोचले.
मंद संगीत लिफ्टमध्ये सुरू होते. एकेक करत बाराव्या मजल्यावर लिफ्ट थांबली. दरवाजा उघडला. मी आणि सौरभ बाहेर पडलो… सावकाश पावलं टाकत आम्ही आमच्या रुमजवळ आलो. तिथे आमच्या स्वागताला फ्लोअर अटेंडट आधीच हजर होता. त्याने रूम उघडली. आत येऊन त्याने आधी दोन्ही पडदे उघडले आणि तो सौरभला म्हणाला, “सर, तुम्ही बुकिंग करताना विनंती केली होती तशीच ही रूम आहे, ज्याच्या विंडोमधून समोरचा समुद्र दिसतो…”
आम्हाला अभिवादन करून रूम अटेंडंट निघून गेला. समोर पसरलेला अथांग समुद्र बघून मन हरखून गेले. “आई, हा समुद्र दिसावा हा तुझा आग्रह होता, तो मी पूर्ण केला आहे,” सौरभ मला म्हणाला.
माझे इतर नेहमीचे हट्ट देखील पूर्ण कर, असं म्हणणं माझ्या मनात खरं म्हणजे आलं होतं; पण आल्या आल्या सौरभचा मूड खराब होऊ नये म्हणून मग मी गप्प बसले. पण सौरभ परत अमेरिकेला जायच्या आधी सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा प्रयत्न करायचा, एवढं मात्र मी मनाशी नक्की केलं होतं.
हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…
“आई तू फ्रेश होऊन आराम कर थोडा वेळ. तोवर मी लॅपटॉप उघडून माझे मेल्स चेक करतो…”
“म्हणजे, या ट्रीपमध्ये सुद्धा आपल्या दोघांत या तुझ्या लॅपटॉपची लुडबुड आहेच म्हणायची! आता हे मशीन आहे म्हणजे मोबाइल देखील खणखणणार सतत…” माझा नाराजीचा सूर.
“आई या सोयी उपलब्ध आहेत म्हणून तर हवी तेव्हा रजा घेऊन मी तुला भेटायला येऊ शकतो. मी तिथे अमेरिकेत नसलो तरी, माझ्या सहकाऱ्यांचं काम अडत नाही. आजच्या जगात हेच महत्त्वाचे आहे!” सौरभचे हे नेहमीचंच बोलणं ऐकायची मला आता सवय झाली आहे. जरा कुठे लेकासोबत निवांतपणे जगायचं ठरवलं तरी, या यंत्रांची सततची लुडबुड सुरू असते.
सौरभचे उत्तर ऐकून मी नेहमीप्रमाणे मान उडवली आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये शिरले.
मी फ्रेश होऊन बाहेर आले. या ट्रिपला सौरभच्या हट्टाखातर फक्त ड्रेस आणले होते मी. मुंबईतून निघायच्या आधीच त्याने मला बजावलं होतं की, ‘आई, त्या तुझ्या टिपिकल काकूबाई साड्या बिलकुल घेऊ नकोस हं. तू गोव्यात चालली आहेस, त्यामुळे तुला फक्त ड्रेस न्यायला परवानगी आहे. मी बॅग चेक करणार आहे तुझी. जरा मुक्तपणे आयुष्य जगायला शिक आता. तिकडे अमेरिकेत…’ पुढचं पुराण मी नेहमीच ऐकत आले होते त्यामुळे सौरभचं बोलणं मी मधेच थांबवत म्हणाले होते की, ‘बास झालं तुझं अमेरिका पुराण. इतकी ती अमेरिका तुला आवडते तर, तिथेच का नाही राहात कायमचा?’ मी नेहमीचं ब्रह्मास्त्र सोडलं होतं त्याच्यावर आणि चतुरस्त्र बोलण्याने ते निष्प्रभ ठरवत सौरभ म्हणाला होता की, ‘अमेरिकेत सगळं काही उपलब्ध आहे, पण त्या सगळ्यांच्या मदतीने मी तिथे सुखी आणि आनंदी राहू शकत नाही कारण माझी आई तिथे नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…’ सौरभचे हेच उत्तर आजवर मी कैकदा ऐकलं आहे, पण तरीही तिथे रहायचा अट्टाहास तो सोडत नाही. म्हणून मग मधला मार्ग म्हणून वर्षांतून दोनदा तो सुट्टी घेऊन भारतात येतो. एक सुट्टी आम्ही घरीच घालवतो आणि एका सुट्टीत आम्ही भटकंती करतो. यावेळी म्हणूनच आम्ही गोव्याला आलो आहोत.
हेही वाचा – Lifestyle : आयुष्य एक वाहता प्रवाह
रूमच्या कोपऱ्यात शांतपणे उभा असलेला आरासा जणू माझी वाटच बघत होता. मी त्याच्याजवळ जाऊन माझा चेहरा न्याहाळला. थोडी जास्तच म्हातारी झाल्याचा भास मला झाला. गालावर थोडी पावडर लावली. शशांकने म्हणजे सौरभच्या बाबांनी काही वर्षांपूर्वी वाढदिवसाला दिलेला ड्रेस घातला होता मी आज. शशांक होता तेव्हा हट्ट करून ड्रेस घालायला लावायचा. पण त्याच्या अकाली जाण्याने माझी ड्रेस घालायची इच्छा आणि हौस दोन्हीही संपल्यात जमा होती. त्यानंतर मात्र हौसेने घेतलेले सगळे ड्रेसेस घरातील कपाटाच्या गुहेत निद्रिस्त शिलालेखाप्रमाणे शांतपणे बसले होते गेली काही वर्षे.
माझं लक्षच नव्हतं. सौरभ एकटक माझ्याकडे बघत होता, त्याचा लॅपटॉप अर्धवट बंद करून. मला लाजल्यासारखं झालं. मी डोळे वटारून त्याला म्हणाले, “एवढं काही बघायला नकोय डोळे फाडून. आईच आहे मी तुझी…”
“आईच्या गावात काय दिसते आहेस तू आज. बोले तो एकदम रापचिक. बाबा आज असते तर तुला अशी बघून नक्की मला म्हणाले असते सौऱ्या अरे पाहून ही बाला कलिजा खलास झाला!” असं म्हणून सौरभ हसत सुटला.
त्याचे कान पकडून मी त्याला म्हणाले, “मी एवढी रापचिक का काय ते तू बोललास तशी दिसत असेन तर, तू तशीच एखादी डबल रापचिक शोध ना कोणीतरी तुझ्यासाठी त्या तुझ्या अमेरिकेत”
“कम ऑन आई. इथून नाही तर तिथून तुझ्यातली सासू शांत बसत नाही का गं? चेटकीणीसारखी छळत असते मला मी भारतात आलो की!”
इतक्यात सौरभचा मोबाइल वाजला. कोणाशी तरी बोलून फोन बंद करून तो मला म्हणाला, “आई, चल गाडी आली आहे खाली. आपण निघूया. तुझं आवडीचं देवदर्शन करून घेऊया आज. उद्यापासून मग तू म्हणशील तिथे जाऊ आपण.”
आम्ही दोघे खाली आलो तर हॉटेलच्या आवारात एक गाडी आमची वाट बघत उभी होती. आम्हाला बघताच ड्रायव्हरने मोठ्या अदबीने दरवाजा उघडला. मी आणि सौरभ आत बसलो अन् आमचा प्रवास सुरू झाला मंगेशी आणि शांतादुर्गा देवीच्या दर्शनासाठी.
क्रमशः