शीला जोशी
साहित्य
वडीच्या अळूची पाने – 10
बेसन –1 वाटी
तांदळाची पिठी – पाव वाटी
चिंचेचा कोळ – 4 चमचे
गूळ – चवीनुसार
हळद – अर्धा चमचा
तिखट – चवीनुसार
मीठ – चवीनुसार
तेल – तळण्यासाठी, फोडणीसाठी
नारळ – 1 मोठा
फोडणीचे साहित्य
वडीचा मसाला
धणे – 50 ग्रॅम
जिरे – 50 ग्रॅम
काळीमिरी पावडर – अर्धा टी-स्पून
दालचिनी पावडर – पाव टी-स्पून
लवंग – 4 नग
पुरवठा संख्या (Servings) : 4 जणांसाठी
तयारीस लागणारा वेळ : अर्धा तास
शिजवण्याचा वेळ : अळूवडीचा उंडा वाफवण्यासाठी 15 ते 20 मिनिटे
- अळूवडी तळण्यासाठी 10 मिनिटे
- नारळाच्या दुधात अळूवडी शिजवण्यासाठी 10 मिनिटे
- एकूण वेळ: 40 मिनिटे
हेही वाचा – Recipe : श्रावण स्पेशल… फराळी मिसळ
कृती
- अळूची पाने स्वच्छ धुवून, पुसून त्याची देठे काढून घ्या. पानांच्या मागील जाड शिराही जितक्या काढता येतील तितक्या काढून घ्या. राहिलेल्या शिरा लाटण्याने लाटून चपट्या करून घ्या. अशी सर्व पाने तयार करा.
- वडीच्या मसाल्यातील सर्व साहित्य किंचित भाजून मिक्सरवर पावडर करून घ्या.
- बेसन, तांदूळ पिठी, वर तयार केलेल्या मसाल्यातील दोन मोठे चमचे मसाला, हळद, तिखट, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडं घट्ट भिजवून घ्या.
- अळूचे एक पान घेऊन शिरा काढलेल्या भागाला भिजवलेलं बेसन पिठ नीट लावा. त्यावर दुसरे पान ठेवून त्यालाही पिठ लावा. त्यावर तिसरे पान ठेवा, पिठ लावा. मग या पानांची आधी खालची बाजू दुमडून घ्या. मग दोन्ही बाजू दुमडून घट्ट अशी गुंडाळी करत उंडा तयार करा.
- उरलेल्या पानांनाही बेसनाचे मिश्रण लावून उंडे तयार करून घ्या.
- हे उंडे तेल लावलेल्या ताटलीत ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी वाफवून घ्या.
- उंडे वाफवून होईपर्यंत एक नारळ फोडून खोबऱ्याचे तुकडे करून त्याचे दोनदा दूध काढून घ्या.
- वाफवलेले उंडे पूर्ण गार झाले की, त्याच्या वड्या कापून तेलात तळून घ्या. या वड्या गार झाल्यावर त्याचे लहान लहान तुकडे करा.
- आता दुसऱ्या कढईत फोडणीसाठी तेल घ्या. तेल तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की, हिंग घालून तळलेल्या अळूवडीचे तुकडे घाला. नंतर त्यात नारळाचे काढलेले दूध घालून एक वाफ येईपर्यंत नीट शिजवून घ्या. गरज पडल्यास यात चवीनुसार मीठ घाला.
- एक वाफ आल्यावर गॅस बंद करा. नारळाच्या दुधातील अळूवडी खाण्यासाठी तयार आहे.
हेही वाचा – Recipe : फणसाची भाजी अन् कांदा भजी
टीप
- ही वडी न तळता उंडे वाफवून गार झाल्यावर तुकडे करून मग फोडणीला टाकले आणि वरून नारळाचे दूध घालून वाफ दिली तरी चालते.
- ही वेगळ्या चवीची वडी एकदा नक्की खाऊन बघा.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.