मनोज जोशी
दोनच दिवसांपूर्वी अर्धांगिनी आराधनाबरोबर सुपर मार्केटमध्ये गेलो होतो. तिनं नेहमीप्रमाणे सुरुवातीला धान्य आणि स्वयंपाकघरातील इतर सामग्री घेण्याकडे मोर्चा वळवला. मी पाठोपाठ ट्रॉली घेऊन होतोच… एक-एक वस्तू ट्रॉलीत पडत होत्या… ही खरेदी झाल्यानंतर आम्ही पॅक्ड फूडच्या सेक्शनमध्ये गेलो. अर्थात, मलाच जास्त खादडीची सवय असल्याने फटाफट एकापाठोपाठ एक पॅकेट्स ट्रॉलीत घेत चाललो होतो. त्यानंतर सेक्शन आला तो सरबतांचा! त्या सेक्शनमध्ये एवढे फ्लेवर्स आणि विविध आकाराच्या आकर्षक बाटल्या होत्या की, सर्वच घेण्याचा मोह झाला. पण काही निवडक फ्लेवरची सरबतं घेऊन बिलिंग काऊंटरवर गेलो.
वास्तविक, चहा आणि सरबत हा माझा फेव्हरिट विषय म्हणा, विक पॉइंट म्हणा किंवा अन्य काहीही म्हणा…. पण घरात चहा (इन्स्टंन्ट चहा सुद्धा) आणि विविध प्रकारची सरबते असतातच! 2020मध्ये ‘ईटीव्ही भारत’साठी हैदराबादला गेलो होतो. तिथे आंबा, लिंबू, पेरू, संत्रा या फ्लेव्हर्सची सरबते घेऊन ठेवली होती. अलीकडे बाजारात सरबताची पावडर उपलब्ध आहे. गार पाण्यात ती मिक्स केली की, सरबत तयार! घरी कोणी पाहुणे मंडळी आली की, सरबत तयार करायला वेळ लागत नाही.
यावरून पूर्वीचे दिवस आठवले. 80च्या दशकात ‘रसना’ घराघरात पोहोचले होते. विशेषत:, मध्यमवर्गीयांमध्ये ते लोकप्रिय झाले होते. रसना सरबत केवळ उन्हाळ्याच्या सुट्टीतच तयार होत असे. दुपारचं जेवण वगैरे आटोपल्यानंतरचा तो एक खास कार्यक्रम असायचा. एक बॉक्स मिळायचं, त्यात एक पाऊच आणि एक इसेन्सची छोटी बाटली असायची. साखरमिश्रित पाणी तयार करून त्यात या दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या. त्यावेळी रसनाच्या त्या 5 रुपयांच्या बॉक्समध्ये 32 ग्लास सरबत तयार होत असे. त्यावेळी सरबतासाठी खास मोठ्या बाटल्याही बाजूला काढल्या जात होत्या. त्या धुवून, स्वच्छ करून त्यात हे रंगीबेरंगी सरबत ठेवले जायचे. कोणी आले की, पाहुण्यांच्या संख्येनुसार एकतर भांड्यात किंवा ग्लासामध्ये ते तयार केले जायचे. भांड्यात तयार केले जाणार असेल तर, गणपतीबरोबर उंदराची पूजा, याप्रमाणे आम्हालाही ते मिळायचे. गंमत म्हणजे, हे सरबत फ्रीजमधल्या गार पाण्यातून दिले पाहिजे, असेही नव्हते. माठातलं गार पाणीही चालायचं. गिरगावात बालपण गेलं. त्यावेळी घरात फ्रीजही नव्हता. त्यामुळे गल्लीत कोणाकडे फ्रीज असेल तर, त्यांच्याकडून बर्फ आणला आणि ते तुकडे सरबतात घातले की, स्वर्गीय सुख! कधी कधी आई झोपली असल्याचं पाहून दुपारी गुपचूप सरबत पिण्याचाही कार्यक्रम होत असे.
हेही वाचा – ‘पाकीजा’च्या अजरामर गीतांना वादाची किनार
आता ती मजा राहिली नाही. घरी तयार प्री-मिक्स पावडर आणली जाते, त्यामुळे मनाला वाटेल तेव्हा सरबत पिता येतं. कोल्डड्रिंक प्यायचं असले तरी, काही नाहीतर केवळ 20 रुपयांची नोट दिली की, कोणताही ब्रॅण्ड उपलब्ध. (याचं श्रेय कोका कोलाला द्यायला लागेल. दोन लिटरची पेट बाटली आणि छोटी बाटली, त्यानेच बाजारात आणली. आमीर खानची ‘ठंडा मतलब कोका कोला…’ ही जाहिरात आठवत असेलच.)
अशा प्रकारे भूतकाळात गेल्यावर प्रसिद्ध लेखक व. पु. काळे आठवतात. ते म्हणतात, “एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं की, आपण गाभुळलेली चिंच बऱ्याच वर्षांत खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासून चटके द्यावेत, असं आता वाटत नाही… कारण परिस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशीतला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहिलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला ‘बाळपणीचा काळ सुखाचा’ स्वत:बरोबर कधी नेला ते कळलंच नाही…”
हेही वाचा – थिंक पॉझिटिव्ह