अनिता बाळकृष्ण वैरागडे
माझ्या मागील लेखात प्राणायामचे प्रकार आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे बघितले होते. आता या लेखामध्ये आसन, विशेषत: पोटावर तसेच पाठीवर झोपून करायची आसने पाहणार आहोत. ही आसने शरीराला विश्रांती देतात आणि आपल्या अंतर्गत अवयवांना सशक्त बनवतात.
भुजंगासन
पोटावर झोपून दोन्ही हात छातीच्या बाजूला ठेवावे. नंतर दीर्घ श्वास घेऊन छाती वर उचलावी लागते. काही क्षण थांबून श्वास सोडत छाती पुन्हा जमिनीवर टेकवायची असते.
याचे फायदे – पाठीचा कणा मजबूत होतो. लवचिकता वाढते आणि फुफ्फुसे मजबूत होतात.
धनुरासन
नावावरूनच लक्षात येते की, हे धनुष्याच्या आकाराशी संबंधित हे आसन आहे. पोटावर झोपायचे. पाय मागून वर उचलल्यावर छाती वर उचलून हाताने पायाच्या टाचा धरायच्या. दीर्घ श्वास घेऊन आणि काही वेळ थांबून तो सोडावा. तसेच हाताची पकड सोडून हळूवारपणे पाय जमिनीवर ठेवायचे.
याचे फायदे – रक्तभिसरण वाढते. पचनक्रिया सुधारते. मांसपेशी मजबूत होतात.
हेही वाचा – Yoga is lifestyle : प्राणायाम हाच योग विद्येचा आत्मा
पवन मुक्तासन
पाठीवर झोपून दोन्ही गुडघे छातीकडे न्यावेत आणि ते हाताने धरावेत. नंतर आपले डोके गुडघ्याला लावावेत. दीर्घ श्वास घेऊन ते काही सेकंद धरून राहावेत आणि नंतर श्वास सोडत जमिनीवर पाय ठेवावे.
याचे फायदे – गॅसेससाठी खूप उपयोगी आहे आणि पचनक्रिया सुधारते.
सुप्तबद्ध कोणासन
पायाचे तळवे एकत्र करून गुडघे बाजूला घेत सैल सोडावे. श्वासोच्छवास हळूहळू घेत काही काळ स्थिर राहायचं. गर्भवती महिलांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगाचे आसन आहे.
सेतुबंधासन
पाठीवर झोपून कंबरेचा भाग वरती उचलून पायांच्या टाचांना दोन्ही हात लावायचे. कंबर वर उचलताना दीर्घ श्वास घ्यायचा आणि नंतर श्वास सोडत ती जमिनीवर ठेवायची. याचे फायदे – थायरॉइडसाठी अत्यंत उपयोगी आहे.
हेही वाचा – योग म्हणजे परिपूर्णतेची जननी
अशाप्रकारे नियमित आसने केल्यास पचनशक्ती सुधारते. पाठीचा त्रास (पाठदुखी) असेल त्यांना अत्यंत उपयोगी आहे. थकवा नाहीसा होतो आणि दिवसभर आपल्याला ऊर्जा मिळते. दररोज योग, प्राणायाम, आसने करत रहा.