दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 30 जुलै 2025; वार : बुधवार
भारतीय सौर : 08 श्रावण शके 1947; तिथि : षष्ठी 26:41; नक्षत्र : हस्त 21:51
योग : सिद्ध 27:39; करण : कौलव 13:39
सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:15
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
श्रीयाळ षष्ठी
कल्की जयंती
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन पद्धतीने काम सुरू करावे लागेल. काही मेष जातकांसाठी आजचा दिवस अस्वस्थेचा असू शकतो, यामागचे नेमके कारण लक्षात येणार नाही. एखादा कायदेशीर वाद सुरू असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. नवीन जागा घ्यायची असेल तर त्या दृष्टीने सुरू असणाऱ्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल.
वृषभ – कार्यक्षेत्रात चांगले निकाल बघायला मिळतील, शिवाय नफा कमावण्याच्या नवीन संधीही मिळू शकतील. आर्थिक बाबतीतही वेळ अनुकूल असेल. दुपारपर्यंत एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. कुटुंबातील सदस्यांसोबतही आनंददायी वेळ घालवाल, रात्री एखाद्या शुभ कार्याला उपस्थित राहण्याचा योग आहे.
मिथुन – व्यवसाय आणि नोकरीच्या संदर्भात दिवस चांगला आहे. घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजना यांचा सकारात्मक परिणाम बघायला मिळेल. आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर, आता त्यातून मुक्तता होईल. नोकरीत कामाचा भार वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तणाव निर्माण होईल. मात्र वादांपासून दूर रहा.
कर्क – दिवस फारसा चांगला जाणार नाही. कामाच्या ठिकाणी सकाळी प्रतिकूल परिस्थिती उद्भवू शकते. अशावेळी घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळणे. यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच, आज आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
सिंह – इतर दिवसांच्या तुलनेत आजचा दिवस थोडा चांगला जाईल. व्यवसायातील कामाची परिस्थिती हळूहळू सुधारेल. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान आणखी मजबूत होईल. मात्र, प्रतिस्पर्ध्यांकडून तुमच्याविरुद्ध रणनीती आखली जाऊ शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
कन्या – कामाच्या ठिकाणी सभोवतालच्या योग्य आणि अयोग्य सहकाऱ्यांचा शोध घ्यावा लागेल. अन्यथा, काही लोक तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात, तुमच्या पाठीमागे आक्षेपार्ह टिप्पणी करू शकतात. अशा परिस्थितीत योग्य लोकांसोबत राहणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसायाच्या संदर्भात मित्रांशीही संवाद साधू शकता.
हेही वाचा – Nakshatra : श्रवण, धनिष्ठा आणि शततारका
तुळ – एखाद्या व्यवसायाशी किंवा व्यापाराशी संबंधित प्रस्ताव, योजना किंवा कागदपत्र तयार करत असाल, तर ते दिवसभरात पूर्ण करणे चांगले. दुपारनंतरचा काळ महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सर्वोत्तम काळ असणार आहे. याचा भविष्यात चांगला फायदा होईल. एखाद्या परीक्षेसाठी किंवा स्पर्धेसाठी देखील तयार असणे आवश्यक आहे.
वृश्चिक – कार्यक्षेत्रात कोणतेच काम मनाप्रमाणे होणार नाही, काही काळ प्रतिकूल परिस्थितीचा देखील सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे मन थोडे उदास राहील. कोणत्याही व्यक्तीवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे टाळा, अन्यथा फसवणूक होऊ शकते. व्यवसायाच्या बाबतीत दिवस संमिश्र असेल..
धनु – गेल्या काही दिवसांपासून छोट्या छोट्या कामांमध्ये अडथळा निर्माण होत असेल किंवा अनेक दिवसांपासून एखादे काम अर्ध्यावर येऊन अडकले असेल, तर परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. कामे हळूहळू मार्गी लागू शकतात. पण एखाद्या अनावश्यक गोष्टीबद्दल अस्वस्थता निर्माण होईल. दुपारी कामांमुळे धावपळ होईल मात्र त्यातून फायदाच मिळेल.
मकर – व्यवसाय किंवा नोकरीसंदर्भात काही नवीन माहिती मिळू शकते, ज्यामुळे बौद्धिक क्षमता देखील वाढेल. कामाच्या ठिकाणी अशा एखाद्या व्यक्तीशी संवाद होईल किंवा भेट होईल, ज्याचा तुम्हाला भविष्यात मोठा फायदा मिळू शकतो. प्रियजनांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ – कामाच्या ठिकाणी सर्व महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करावी लागतील, ज्यामुळे थोडी धावपळ करावी लागू शकते. नोकरदार जातकांचाही व्यग्र दिवस राहील. त्याचवेळी, जवळच्या काही व्यक्ती चिंतेचे कारण बनू शकतात. अशा परिस्थितीत खूप धीर धरावा लागेल. वैयक्तिक जीवनातही काही योग्य निर्णय घ्यावे लागतील.
मीन – कामाच्या ठिकाणी एकाचवेळी बरीच कामे करावी लागू शकतात, ज्यामुळे दिवसभर ताण आणि व्यग्रता जाणवेल. ही कामे सकाळच्या वेळात पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. कारण दुपारनंतर वेळ फारशी अनुकूल नाही. कामात अडथळे येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मानसिक तणावही वाढेल.
हेही वाचा – Nakshatra Gatha : मूळ नक्षत्रासह पूर्वाषाढा अन् उत्तराषाढा
दिनविशेष
प्रसिद्ध शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे
टीम अवांतर
उत्तम गळा, चौफेर नजर, रसीला स्वभाव यासारख्या कारणामुळे ज्यांच्या गायनाने रसिकांना आकृष्ट करून घेतले होते, ते म्हणजे प्रसिद्ध शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे. त्यांचा जन्म 2 मे 1920 रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे संगीताची आवड असणाऱ्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील बाळकृष्णबुवा हे तबलावादक तर आजोबा गोविंदराव हे गायक होते. पुढे वडिलांच्या निधनानंतर आई त्यांना घेऊन नागपूरला आली. संगीताच्या प्रारंभिक शिक्षणासाठी वयाच्या सातव्या वर्षी ते ग्वाल्हेर घराण्याचे गायक शंकरराव सप्रे यांच्या श्रीराम संगीत विद्यालयात दाखल झाले. गाणे शिकता शिकता ते तबलाही वाजवायला शिकले. पुढे 1931 साली कोल्हापूर सिनेटोनच्या कालिया मर्दन या चित्रपटात त्यांनी कृष्णाची भूमिका केली, जी खूप गाजली. कोल्हापूरच्या वास्तव्यात त्यांना उस्ताद अल्लादिया खाँ, भूर्जी खाँ, घम्मन खाँ, शंकरराव सरनाईक, गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या संगीतातील दिग्गजांचा सहवास लाभला. 1938 साली ते मॅट्रिक झाले. वसंतरावांचे नाट्यप्रेम आणि आवाज पाहून दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांना काही नाट्यगीते स्वत: शिकविली. पुढे ते लाहोरला गेले. तिथे त्यांनी असद अली खाँ (पतियाळा घराणे) यांच्या मारवा रागाची तालीम घेतली. याशिवाय सुरेशबाबू माने (किराणा घराणे), अमानत अली खाँ (भेंडीबाजार घराणे), कुमार गंधर्व (ग्वाल्हेर घराणे) आणि रामकृष्णबुवा वझे (ग्वाल्हेर घराणे) अशा संगीत दिग्गजांकडून ते अनेक घराण्याची गायकी शिकले आणि यामधून स्वत:ची अशी वेगळी शैली त्यांनी निर्माण केली. “माझे घराणे माझ्यापासूनच सुरू होते…” असे ते सार्थ अभिमानाने म्हणत असत. संगीतामधील नवनवीन गोष्टींचा ध्यास घेऊन त्या आत्मसात करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. रागदारी संगीताबरोबरीनेच ते ठुमरी, गझल, टप्पा, भजन, अभंग, चित्रपटगीते, लावणी असे विविध संगीतप्रकार मनापासून गात. संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका देखील त्यांनी गायन आणि बहारदार अभिनयाने गाजविल्या. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकामधील खाँसाहेब ही व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनयाने प्रसिद्ध झाली. 1962 साली त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य (डॉक्टरेट) ही पदवी मिळविली. 1983 साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. 30 जुलै 1983 रोजी वसंतरावांचे निधन झाले. सध्या त्यांच्या गायकीचा वारसा त्यांचा नातू प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे पुढे चालवत आहे.