दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 22 जुलै 2025; वार : मंगळवार
भारतीय सौर : 31 आषाढ शके 1947; तिथि : द्वादशी 07:05, तृयोदशी 28:39; नक्षत्र : मृगशीर्ष 19:24
योग : ध्रुव 15:32; करण : गरज 17:51
सूर्य : कर्क; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:18
पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
भौमप्रदोष
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – सहकारी आणि वरिष्ठांच्या पूर्ण सहकार्यामुळे कार्यालयीन काम फत्ते होईल. तसेच, पूर्वीच्या प्रकल्पात मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही, धन संचय करणे कठीण होण्याची शकते. मात्र कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज फेडू शकाल.
वृषभ – आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. थोरामोठ्यांच्या मार्गदर्शन घेऊन बचतीचा पर्याय निवडा, अन्यथा येत्या काळात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुले घेणार नाहीत, याची काळजी घ्या.
मिथुन – उर्जेमुळे आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काम करावेसे वाटेल आणि तुम्ही ते कराल. अकारण खर्च वाढू शकतो. बचतीबाबत जीवनसाथी किंवा आई-वडिलांशी चर्चा करा. ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील.
कर्क – बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामच्या ठिकाणी चांगल्या गोष्टी घडतील. कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी सल्ला देऊ शकतो, तो फायदेशीर ठरेल. कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क होऊ शकेल.
सिंह – मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. मनातील काही दुविधांमुळे एकाग्र होऊ शकणार नाही. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होतील. मनमोकळे आणि निडर विचार म्हणजे तुमचा इगो आहे, असे वाटून मित्र दुखावला जाईल. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा.
कन्या – नेहमीपेक्षा उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल, अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. वैयक्तिक प्रश्न मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, आवडीचे वाचन करून ताणतणावाशी सामना करू शकाल. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडून साहाय्य आणि प्रेम मिळेल.
हेही वाचा – अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा
तुळ – इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि पर्याप्त धनप्राप्ती होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्यासारखे वाटेल, परिणामी निर्णय घेणे जड जाईल.
वृश्चिक – आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्यातील मूल जागे होईल आणि एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. खर्चावर नियंत्रण ठेवून बचतीकडे लक्ष द्यावे. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल.
धनु – कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ बसते. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे, अन्यथा गोष्टी आणखी अवघड होतात. अनाठायी खर्च करण्याचे टाळावे, अन्यथा गरजेच्या वेळी पैशांची कमतरता होऊ शकते. कार्य-क्षेत्रात कुणाशी फारशी जवळीक ठेऊ नका, बदनामी होऊ शकते.
मकर – नवीन गोष्टी शिकण्याकडे असलेला कल उल्लेखनीय ठरेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. प्रभावी तसेच महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क वाढविण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल.
कुंभ – स्पर्धेमुळे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल. व्यापारातील नफा चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. घरातील उत्साहाचे वातावरण मनावरील दडपण कमी करेल. एखादी योजना आखण्याआधी जोडीदाराचे मत विचारात घेतले नाही तर विपरित प्रतिक्रिया मिळू शकेल.
मीन – दिवस व्यग्र असला तरी आरोग्य चांगले राहील. नियमित कष्टांचे आज चांगले चीज होईल. अचानक खर्च वाढू शकतो. जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होऊ शकते. पण दिवसाच्या शेवटी सगळे काही व्यवस्थित होईल.
हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!
दिनविशेष
श्रीराम शंकर अभ्यंकर
भारतीय-अमेरिकन गणिती. बीजगणित आणि बैजिक भूमिती या क्षेत्रांत मूलगामी संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले श्रीराम शंकर अभ्यंकर यांचा जन्म 22 जुलै 1930 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला. श्रीराम अभ्यंकर यांचे इंटरपर्यंतचे शिक्षण ग्वाल्हेरमध्ये झाले. भौतिकशास्त्रातील पदवी घेण्याकरिता त्यांनी मुंबईतील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये (आताच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये) प्रवेश घेतला. पुढील शिक्षण भौतिकशास्त्रात घेण्याऐवजी गणितात घ्यावे, असा निर्णय त्यांनी टीआयएफआरमधील गणिती दामोदर धर्मानंद कोसंबी आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील गणित विभाग प्रमुख पेसी मसानी यांच्याशी झालेल्या विचारविनिमयानंतर घेतला. 1952मध्ये त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठाची गणितातील एम.ए. पदवी वर्षभरातच मिळविली, तर पीएच्.डी. पदवी गणितज्ञ ऑस्कर झरिस्की यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांत मिळविली (1955). त्यांनी लोकल युनिफॉर्मायझेशन ऑन अल्जिब्राइक सर्फेसेस ओव्हर मॉड्युलर ग्राउंड्ज फील्ड्स हा प्रबंध लिहिला. काही वर्षे जगभर भ्रमंती केल्यानंतर ते अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात 1963मध्ये प्राध्यापक पदावर रुजू झाले. त्यानंतर 1967पासून शेवटपर्यंत मार्शल डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स या पदावर राहिले. विश्वाची रचना लांबी, रुंदी आणि उंची अशी त्रिमितीची असल्याचे बराच काळ मानले जात होते. अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या संशोधनानंतर विश्वाला वेळेचे चौथे परिमाण कालाचे असल्याचा स्वीकार झाला. याहीपुढे जाऊन जॉन नॅश यांनी विश्वाची रचना केवळ चारच नाही तर अनेक मितींची असल्याचा सिद्धांत मांडला. या अनेक मितींना समीकरणात बांधून उपयोजित पातळीवर नेण्याचे काम अभ्यंकरांनी केले. नॅश यांच्या संशोधनात नसलेली परंतु अभ्यंकर यांच्या संशोधनात असलेली कल्पना म्हणजे संविशेषता. आज त्यांच्या या संशोधनाचा उपयोग भौतिकी, अभियांत्रिकी, संगणकक्षेत्र, आनुवंशिकी यांसारख्या विविध शाखांमध्ये होत आहे. अभ्यंकर यांनी सुमारे 200 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय गणितविषयक शोधनियतकालिकांतून प्रकाशित केले. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. 2 नोव्हेंबर 2012 रोजी वेस्ट लाफिएट (इंडियाना राज्य, अमेरिका) येथे अभ्यंकर यांचे निधन झाले.