तिचं लाजणं
त्याची बायको आज ऑफिसला साडी नेसून निघाली आणि तो तिच्याकडे पाहातच राहिला… त्याला काहीसे आश्चर्य वाटले…
त्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून तिने लगेच ओळखले आणि म्हणाली,
“अहो, आज साडी डे नाही का?”
त्याला आठवले लग्नानंतर काही महिन्यांनी घरकाम, स्वयंपाक करताना सुटसुटीत म्हणून साडीऐवजी गाऊन आणि बाहेर जाताना, स्कूटर चालवताना सोयीस्कर आणि सुरक्षित म्हणून ड्रेस वापरायला त्यानेच तिला सुचवले होते…
“साडीमध्ये तू अजूनही सुंदर दिसतेस,” तो म्हणाला तसे लाजून ती म्हणाली,
“तुमचे आपले काहीतरीच!”
आणि त्याला एकदम तरुण झाल्यासारखे वाटले.
हेही वाचा – असेही काही तर्काच्या पलीकडचे!
लेकीची माया
त्याची अकरावीत जाणारी मुलगी ‘साडी डे’ म्हणून आज छानपैकी साडी नेसून कॉलेजला जायला निघाली .
“किती मोठी आणि छान दिसते ना ही?” या त्याच्या बायकोच्या वाक्यावर त्याला आनंद झाला नाही. त्याच्या डोक्यात दुसरेच काहीतरी सुरू होते…
चार लोकांच्या नजरेपासून हिला कसे वाचवावे, याची काळजी त्याला वाटू लागली आणि काही वर्षांतच ती आपल्याला सोडून सासरी जाणार… या विरहाचे दुःखही त्याला आजच जाणवू लागले.
हेही वाचा – ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”
तिचं परावलंबित्व
त्याची वयोवृद्ध आई आजारी पडली, तेव्हा तिला सुशृषेसाठी आणि सेवा करण्यासाठी साडीऐवजी गाऊन घालावा, असे त्याच्या बायकोने आणि ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांनी सुचवले. त्याच्याही मनाला पटले. पण…
कितीतरी वर्षं साडी नेसणारी आई ती…. साडीऐवजी दुसरे काहीतरी नेसावे लागले म्हणून आई त्याच्या कुशीत हमसून हमसून रडली. तो तिची समजूत घालत राहिला… कारण त्याला माहीत होते, हे अश्रू साडी न नेसण्याचे होते आणि भविष्यकाळातील परावलंबित्वाचेही…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
https://whatsapp.com/channel/0029VbAtufJ65yDINAO9Ad2H
या लिंकला क्लिक करून WhatsApp Channel जॉइन करा.


