अध्याय पंधरावा
पाठीं हतियेरां आपणयां । निदिध्यासें एक जालिया । पुढां दुजें नुरेल घाया- । पुरतें गा ॥261॥ तें आत्मज्ञानाचें खांडें । अद्वैतप्रभेचेनि वाडें । नेदील उरों कवणेकडे । भववृक्षासी ॥262॥ शरदागमींचा वारा । जैसा केरु फेडी अंबरा । का उदयला रवी आंधारा । घोंटु भरी ॥263॥ नाना उपवढ होतां खेंवो । नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो । स्वप्नप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसें ॥264॥ तेव्हां ऊर्ध्वींचें मूळ । कां अधींचें हन शाखाजाळ । तें कांहींचि न दिसे मृगजळ । चांदिणां जेवीं ॥265॥ ऐसेनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खड्गलता । छेदुनिया भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळातें ॥266॥
ततः पदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः । तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥4॥
मग इदंतेसि वाळलें । जें मीपणेंवीण डाहारलें । तें रूप पाहिजे आपलें । आपणचि ॥267॥ परि दर्पणाचेनि आधारें । एकचि करून दुसरें । मुख पाहाती गव्हारें । तैसें नको हो ॥268॥ हें पाहाणें ऐसें असे वीरा । जैसा न मोडलिया विहिरा । मग आपलिया उगमीं झरा । भरोनि ठाके ॥269॥ नातरी आटलिया अंभ । निजबिंबीं प्रतिबिंब । नेहटे कां नभीं नभ । घटाभावीं ॥270॥ ना ना इंधनांशु सरलेया । वन्हि परते जेवीं आपणपयां । तैसें आपेंआप धनंजया । न्याहाळणें जें गा ॥271॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : देखतां आहे आवडें, घेऊं जाइजे तरी नातुडे
अर्थ
नंतर (ज्ञानरूपी) हत्यार व आपण निजध्यासाने एक झाल्यावर (आपण ज्ञानरूप झाल्यावर) अर्जुना, आपल्यापुढे घाव मारण्यापरते दुसरे (हत्यार) उरणार नाही. ॥261॥ ती आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार आपल्या अद्वैतप्रकाशाच्या आधिक्याने संसारवृक्षाला कोणीकडेही उरू देणार नाही. ॥262॥ शरद् ऋतूच्या आरंभीचा वारा, जसा आकाशातील ढगरूपी कचरा नाहीसा करतो, अथवा उगवलेला सूर्य जसा अंधाराचा घोट भरतो, ॥263॥ अथवा जागे होताक्षणीच स्वप्नांच्या गर्दीचा ठावठिकाणा उरत नाही. त्याप्रमाणे आत्मानुभवरूपी धारेचा प्रहार करील (म्हणजे संसारवृक्षाचा ठावठिकाणा उरू देणार नाही). ॥264॥ तेव्हा या संसारवृक्षाचा वरचा भाग अथवा वरचे मूळ अथवा शाखांचा खालचा विस्तार, हे जसे चांदण्यात मृगजळ दिसत नाही, तसे काही एक दिसणार नाही. ॥265॥ अर्जुना, अशा रीतीने आत्मज्ञानरूपी तलवारीच्या पात्याने, वर मूळ आहे असा जो संसारवृक्ष, तो छेदून (म्हणजे आत्मविचाराने त्याचा निरास करून) ॥266॥
नंतर त्या (आपल्या) रूपास पाहावे की, ज्या ठिकाणी गेलें असता पुन्हा (परत) येत नाहीत. ज्यापासून ही अनादि विश्वपरंपरा (नसतीच) वाढली, अशा त्या आद्य पुरुषासच (आत्मस्वरूपात ज्ञानाच्या अंगाने) शरण जावें ॥4॥
मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होते, त्यासंबंधाने इदंभाव (हे-तेपणा) स्फुरतो, त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो व (इदंच्या सापेक्ष आपल्यासंबंधाने अहंभाव (मीपणा) असतो. आत्मस्वरूप एकरस असल्याकारणाने तेथे भिन्न प्रतीति नाही, म्हणून तेथे इदंस्फुरण नाही आणि इदंस्फुरण नाही म्हणून) अहंस्फुरणही जेथे नसते, असे जे अहंइदंवृत्तिशून्य, प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप, ते आपले स्वरूप आपणच पहावे. ॥267॥ परंतु समोर आरसा घेऊन जसे अज्ञानी लोक एका मुखाची दोन मुखे करून (म्हणजे बिंब व प्रतिबिंब अशा तर्हेने) आपणच आपल्याला पहातात. तसे हे आत्मस्वरूपाला (दृश्य-द्रष्टा करून) पहाणे नको. ॥268॥ अर्जुना, हे आपल्या आत्मस्वरूपाचे पाहणे असे आहे की, विहीर खणण्यापूर्वी झरा जसा आपल्या उगमाच्या ठिकाणी (पाण्याने) भरलेला असतोच, (तो जरी दृश्य झाला नाही, तरी तो आपल्या स्वरूपाने आहेच). ॥269॥ अथवा पाणी आटल्यावर प्रतिबिंब जसे आपल्या बिंबाच्या ठिकाणी मिळते, अथवा घट फुटल्यावर जसे घटाकाश महाकाशाच्या ठिकाणी मिळते, ॥270॥ अथवा अग्नीतील जळणारी लाकडे नि:शेष संपल्यावर अग्नि जसा मूळ स्वरूपात येऊन मिळातो, त्याचप्रमाणे अर्जुना, जे आपण आपल्याला सहज पहाणे आहे ॥271॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तरावया मृगजळाची गंगा, डोणीलागीं धांवतां दांगा-


