अध्याय पंधरावा
एऱ्हवीं दोरीचिया उरगा । डांगा मेळवितां पैं गा । तो वावोचि भारु गा । केला होय ॥251॥ तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागीं धांवतां दांगा- । माजीं वोहळें बुडिजे पैं गा । साच जेवीं ॥252॥ तेवीं नाथिलिया संसारा । उपायी जाचतया वीरा । आपणपें लोपे वारा । विकोपीं जाय ॥253॥ म्हणोनि स्वप्नींचेया भया । ओखद चेवोचि धनंजया । तेवीं अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खइग ॥254॥ परि तेचि लीला परजवे । तैसें वैराग्याचें नीच नवें । अभंगबळ होआवें । बुद्धीसी गा ॥255॥ उठलेनि वैराग्यें जेणें । हा त्रिवर्गु ऐसा सांडणें । जैसें वमुनियां सुणें । आतांचि गेलें ॥256॥ हा ठायवरी पांडवा । पदार्थजातीं आघवा । विटवी तो होआवा । वैराग्य लाठु ॥257॥ मग देहाहंतेचें दळें । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यग्बुद्धी करतळें । हातवसावें ॥258॥ निसिलें विवेकसाहणें । जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें । मग पुरतेनि बोधें उटणें । एकलेंचि ॥259॥ परि निश्चयाचें मुष्टिबळ । पाहावें एकदोनी वेळ । मग तुळावें अति चोखाळ । मननवेरी ॥260॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ
अर्थ
सहज विचार करून पाहिले तर, दोरीवर भासणार्या सर्पाला मारण्याकरिता लांब काठ्या गोळा केल्या तर त्याचे व्यर्थच ओझे गोळा केल्यासारखे होते. ॥251॥ मृगजळाची नदी उतरून जाण्याकरिता नावेसाठी कोणी रानोमाळ धावत असता, त्याने खर्या ओढ्यात सापडून जसे बुडावे, ॥252॥ अर्जुना, त्याप्रमाणे खोट्या संसाराचा नाश करण्याच्या उपायांमध्ये खटपट करणाराला साधनांचे जिवापाड श्रम होऊन, तो आपण स्वत: मरतो. ॥253॥ म्हणून अर्जुना, स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच जसे औषध आहे, त्याप्रमाणे अज्ञानरूपी मूळ असलेल्या याला (या संसारवृक्षाला) नाश करण्यास समर्थ एक ज्ञानखड्गच आहे. ॥254॥ परंतु अरे, तेच ज्ञानरूपी खड्ग सहज फिरविता येईल, तसे वैराग्याचे न खचणारे सामर्थ्य बुद्धीला नित्य नवे पाहिजे. ॥255॥ ज्या वैराग्याचा उठाव झाला असता, ह्या त्रिवर्गाचा (स्वर्ग, मृत्यू,पाताळ यांचा) असा त्याग होतो की, जसे काही कुत्रे आताच ओकून गेले आहे. ॥256॥ अर्जुना, येथपर्यंत सर्व पदार्थमात्रसंबंधाने वीट उत्पन्न करील, असे हे दांडगे वैराग्य पाहिजे. ॥257॥ मग त्या ज्ञानखड्गावरील देहाभिमानरूपी म्यान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीत ते धरावे ॥258॥ ते ज्ञानरूपी खड्ग विवेकरूपी सहाणेवर पाजळलेले असावे व ‘मी ब्रह्म आहे’ अशा बोधाची त्यास तीक्ष्ण अशी धार असावी व मग ते एकट्या पूर्णबोधाने घासावे. ॥259॥ परंतु (मी ब्रह्म आहे अशा) निश्चयरूपी मुठीचे बळ एकदोन वेळ पाहून (आणि मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय झाला आहे असे वाटले की) मग ते अति शुद्ध मननापर्यंत तोलून धरावे (म्हणजे अद्वैतबोधाचे अति शुद्ध असे चिंतन करावे.) ॥260॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : देखतां आहे आवडें, घेऊं जाइजे तरी नातुडे


