बरेच जण सकाळी फिरायला बाहेर पडतात, त्यावेळी सगळ्यांच्या एका हातात मोबाईल हा असतोच असतो. आधी मोबाईल पर्समध्ये किंवा खिशात असायचा. आता ते पण अंतर जास्त वाटतं म्हणून सगळ्यांचेच मोबाईल आता कायम हातामध्येच असतात.
चालताना अधेमधे थांबून सगळेचजण हात वर करून बघत असतात, मोबाइलमध्ये, नवा काही मेसेज आला आहे का? काही आहे का? आणि लगेच उभं राहून किंवा चालत चालत रिप्लाय पण करत असतात. अशावेळेस आपण रस्त्यावर आहोत, रस्ता क्रॉस करत आहोत, आजूबाजूने वाहने जात आहेत, याची पण त्यांना शुद्ध नसते.
परवाचीच गोष्ट आहे. मी नेहेमीप्रमाणे एकटाच फिरायला बाहेर पडलो. मी फिरायला जाताना मोबाईल कधीच बरोबर नेत नाही. इकडे तिकडे बघत बघत फिरणे मस्त एन्जॉय करत होतो. फूटपाथवर माझ्या बाजूनेच चालणाऱ्या एका आजींची आणि समोरून चालत येणाऱ्या आजोबांची हलकी टक्कर झाली. दोघंही मोबाईलवर होते. दोघांचं ‘सॉरी सॉरी’ झालं, दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि दोघंही आश्चर्यचकित झाले.
हेही वाचा –रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…
आजोबा म्हणाले : अरे, चक्क तुम्ही? मी तुमच्याच मेसेजला उत्तर लिहीत होतो.
आजी म्हणाल्या : आश्चर्यच आहे. अहो, मी तुम्हालाच तुमच्या आवडीचं तलतचं जुनं गाणं “ऐ मेरे दिल कही और चल” पाठवत होते.
कुणाला काही लागलं नाही ना? हे बघायला मी थांबलो होतोच. मी दोघांनाही म्हणालो – इथे बाजूलाच चहाचं छोटं दुकान आहे. तिथे बाक आहेत, त्यावर पाच मिनिटं बसा. आजोबा तुमचा रिप्लाय आमने सामने आजींना सांगा, आणि आजी, “ऐ मेरे दिल कही और चल ” हे गाणं आता पाठवायच्या ऐवजी, ते तुमच्या आवाजात आजोबांना गाऊनच दाखवा. फीमेल आवाजामध्ये पण हे गाणं ऐकायला मजा येते… आणि तुमची हरकत नसेल, तर मी पण गाणं ऐकायला बसतो, कारण माझं पण ते अतिशय आवडतं गाणं आहे. बाजूच्या टपरीवरून मस्त गरम गरम चहा मागवू. मजा येईल. पण यापुढे चालताना “नो मोबाईल” प्लीज.
आम्ही तिघे बाकावर बसलो. आजोबांनी दोन जोक सांगितले. आम्ही तिघंही मनमुराद हसलो. आजोबा खूश झाले. मग आजीचं फीमेल व्हॉइसमध्ये “ए मेरे दिल कही और चल” हे गाणं झालं. आम्ही खूश होऊन टाळ्या वाजवल्या, आजींच्या आवाजाला आणि उत्साहाला दाद दिली.
चालणारी दोन सीनियर सिटिझन कपल्स पण गाणं ऐकायला थांबली होती. त्यांनी पण चिअर्स केले. मी ‘हमे तुमसे प्यार कितना, ये हम नही जानते’ हे गाणं म्हटलं. सगळ्यांनी भरपूर टाळ्या वाजवल्या आणि अजून एक गाणं होऊन जाऊ द्या, असा आग्रह केला. मी दिलीप कुमार यांचं “सुहाना सफर और ये मौसम हंसी” हे गाणं म्हटलं. मी एक ओळ म्हटली की, सगळेजण कोरसमध्ये ती ओळ रीपीट करायचे. अशा रीतीने ग्रुप सॉग सगळ्यांनी एन्जॉय केलं. नंतर जमलेल्यांपैकी दोघांची गाणी झाली… मजा आली.
शेवटी आजोबांतर्फे सगळ्यांना मस्त चहा झाला. चहाच्या दुकानाच्या मालकांनी त्यांच्यातर्फे सगळ्यांना एक एक मारीचे बिस्किट दिले,.. आणि म्हणाले – “ऐसा माहोल यहां पहिली बार हुआ है, इसलिये मेरी तरफ से बिस्किट!”
आजोबा : रोजच नियमितपणे फिरायला जात असतो. पण आजचं फिरणं एकदम वेगळं. मज्जा आली. तब्येत एकदमच खूश झाली
आजी : मला पण फिरताना कधीही आली नव्हती, अशी मजा आज आली आणि हे सगळं जमून कशामुळे आलं!! आज ओळख झालेल्या नवीन मित्रामुळे.
मी : मी फक्त निमित्त होतो. खरी मज्जा आली मोबाईलमुळे आणि टक्कर झाल्यामुळे
आजी – आजोबा एकमेकांना म्हणाले : असेच भेटत जाऊ. पण टक्कर नाही.
हेही वाचा – कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…
जमलेल्या आम्ही सगळ्यांनीच एकमेकांचे हात धरून गोल केला, थोडा वेळ अंग हलवत नाचल्यासारखे हातवारे करत करत –
“यापुढे चालताना नो मोबाईल”
“यापुढे चालताना नो मोबाईल” अशी शपथ घेतली.
एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन झाले… बाय बाय झाले, इथेच पुन्हा भेटू, असे ठरले. माझ्या मॉर्निंग वॉक मित्रमैत्रिणींच्या यादीमध्ये आजी-आजोबा ॲड झाले.
“यापुढे चालताना नो मोबाईल” अशी शपथ जर सगळ्यांनीच घेतली तर मज्जा येईल ना!! त्यामुळे रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना – ‘काही आलं आहे का?’ ‘काही आलं आहे का?’ या विचारातून सुटका होईल. अपघात होणार नाहीत… आणि चालण्याचा, फिरण्याचा खरा आनंद घेता येईल.


