अध्याय पंधरावा
तरी प्रबोधु जंव नोहे । तंव निद्रे काय अंतु आहे । कीं रात्री न सरे तंव न पाहे । तया आरौतें ॥225॥ तैसा जंव पार्था । विवेकु नुधवी माथा । तंव अंतु नाहीं अश्वत्था । भवरूपा या ॥226॥ वाजतें वारें निवांत । जंव न राहे जेथिंचें तेथ । तंव तरंगतां अनंत । म्हणावीचि कीं ॥227॥ म्हणौनि सूर्यु जैं हारपे । तैं मृगजळाभासु लोपे । कां प्रभा जाय दीपें । मालवलेनि ॥228॥ तैसें मूळ अविद्या खाये । तें ज्ञान जैं उभें होये । तैंचि यया अंतु आहे । एऱ्हवीं नाहीं ॥229॥ तेवींचि हा अनादी । ऐसी आथी शाब्दी । तो आळु नोहे नुरोधी । बोल तया ॥230॥ जें संसारवृक्षाचां ठायीं । साचोकार तंव नाहीं । मा नाहीं तया आदि काई । कोण होईल ॥231॥ जो साच जेथूनि उपजे । तयातें आदि हें साजे । आतां नाहींचि तो म्हणिजे । कोठूनियां ॥232॥ म्हणौनि जन्मे ना आहे । तैसिया सांगों कवण माये । यालागीं नाहींपणेंचि होये । अनादि हा ॥233॥ वांझेचिया लेंका । कैंची जन्मपत्रिका । नभीं निळी भूमिका । कें कल्पूं पां ॥234॥ व्योमकुसुमांचा पांडवा । कवणें देंठु तोडावा । म्हणोनि नाहीं ऐसिया भवा । आदि कैंची ॥235॥ जैसें घटाचें नाहींपण । असतचि असे केलेनिवीण । तैसा समूळ वृक्ष जाण । अनादि हा ॥236॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि, मनुष्यत्वचि होय आदि
अर्थ
तर जोपर्यंत जाग येत नाही, तोपर्यंत झोपेला शेवट आहे काय? अथवा रात्र सरली नाही, तोपर्यंत त्याच्या आधी उजाडत नाही. ॥225॥ त्याप्रमाणे अर्जुना, जोपर्यंत विचाराने डोके वर केले नाही, तोपर्यंत या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला शेवट नाही. ॥226॥ जोपर्यंत वाहणारा वारा जागच्या जागी शांत रहात नाही, तोपर्यंत लाटपणा अनंतच म्हटला पाहिजे. ॥227॥ म्हणून सूर्य जेव्हा मावळतो, तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते अथवा दिवा मालविण्याने (दिव्याचा) प्रकाश नाहीसा होतो ॥228॥ त्याप्रमाणे संसारवृक्षास मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे ज्ञान जेव्हा उत्पन्न होईल, तेव्हाच या संसारवृक्षाला शेवट आहे, एऱ्हवी नाही. ॥229॥ त्याप्रमाणे हा संसारवृक्ष आरंभरहित आहे असे जे म्हणतात, ते म्हणणे या संसारवृक्षावर आरोप नाही, तर (एका दृष्टीने) ते म्हणणे या (संसारवृक्षाच्या) अनादित्वास अनुसरून आहे. ॥230॥ कारण की, संसारवृक्ष तर स्वरूपाने खरा नाही. तर मग जो (स्वरूपाने खरा) नाही, त्याला कोणी आरंभ (असेल) काय ? ॥231॥ जो खरोखर जेथून (कोठून तरी) उत्पन्न होतो, त्याला उत्पत्ती आहे, हे म्हणणे शोभते. आता जो स्वरूपेकरून नाहीच, त्य़ाचा आरंभ कोठून म्हणावयाचा? ॥232॥ म्हणून जो उत्पन्न होत नाही व ज्याला अस्तित्व नाही, तशाला कोण (आहे) म्हणून सांगू? एवढ्याकरिता हा संसारवृक्ष नाहीपणानेच अनादि आहे. ॥233॥ वांझेच्या मुलाला जन्मपत्रिका कोठची? आकाशात निळी जमीन कोठे कल्पावयाची? ॥234॥ अर्जुना, आकाशाच्या फुलाचा देठ कोणी तोडावा? म्हणून स्वरूपेकरून जो नाही, अशा संसाराला आरंभ कसला? ॥235॥ ज्याप्रमाणे घटाचा नाहीपणा (प्रागभाव) हा कोणी उत्पन्न केल्याशिवाय आहेच आहे, त्याप्रमाणे हा संपूर्ण संसारवृक्ष अनादि आहे असे समज. ॥236॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आम्हीं सांगितली जे परी, मूळडाळांची उजरी


