“तू येशील ना गं?”
“कशाला गं?”
“अगं, डान्स प्रॅक्टिस करायला! म्हणजे लग्नात संगीतचा प्रोग्राम आहे. माझ्या जवळच्यांचं लग्न आहे. अगदी गर्भश्रीमंत लोक! रिसॉर्ट बुक झालाय, कोरिओग्राफर ठरलेला आहे. आठ दिवस रोज डान्सचा सराव… तू येच गं!”
आणि हा प्रवास सुरू होतो — साधेपणाच्या गाभाऱ्यातून थेट दिखाव्याच्या दिव्यांखाली!
पहिले लग्न म्हणजे देवासमोर दोन कुटुंबांचं नातं… आता लग्न म्हणजे ‘इव्हेंट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट’!
पूर्वी लग्नघर असायचं, आताशा रिसॉर्ट असतं.
पहिले हळदीला आजी वाटून घेतलेली हळद वापरली जायची, आता डेकोरेशनसकट ‘हळदी सेरेमनी असते’ – विशेष पोशाख, विशेष दागिने, आणि विशेष फोटोग्राफर!
हेही वाचा – फोटो आणि परंपरा… काळाच्या आरशातले क्षण
संगीत कार्यक्रमाला आता गाणं-नाच हे आपल्या आनंदासाठी नाही, तर इंस्टाग्राम रीलसाठी!!
पावलापावलावर विचार होतो – “हे फोटोत कसं दिसेल?”
एकसारखे लहंगे, एकसारखे रंग, एकसारखे हावभाव – सगळं ‘क्लिक’साठी…
मुलींच्या केसातला मोगऱ्याचा गजरा आता ‘ब्रायडल मेकअप आर्टिस्ट’ च्या हातात गेलाय.
घामाच्या वासानं मिसळलेली आपुलकी नाही, आता परफ्युम स्प्रे आणि पोझेस आहेत.
रिसेप्शनचं वर्णन तर वेगळंच –
नवरा-नवरीचं सिनेमॅटिक एंट्री, त्यांच्यामागे धावणारे फोटोग्राफर… डोक्यावर फुलांची सजावट… आणि मेन्यू कार्डात ‘पास्ता’, ‘शेझवान’पासून ज्वारीच्या भाकरीपर्यंत…
पाहुण्यांसाठी ई-रिक्षा, आरामदायक खोल्या… “सोपं लग्न पाहिलंय का कधी असं?” असं विचारायला लावणारा थाटमाट.
माझ्या मनात एकच प्रश्न गडद होतो —
“हे सगळं कुणासाठी?”
कधी नवरा-नवरीच्या चेहऱ्यावर तणाव दिसतो, कारण प्रत्येक डान्स स्टेप आठवायचीय… कधी वडिलांच्या कपाळावर आठ्या असतात – कारण “बजेट थोडं ओलांडलंय!”
कधी आई मागे बसून पाणी पिते – मेकअप खराब होऊ नये म्हणून…
0000
खरं सांगू? आता लग्न म्हणजे प्रेमाचा, नात्याचा, आपुलकीचा नाही – तर पैशाचा आणि दिखाव्याचा विषय झालाय. कोणाचा ड्रेस महागडा, कोणाचं डेकोरेशन भारी, कोणाचं इव्हेंट बेस्ट… आणि जर एखाद्याने साधेपणाने लग्न केलं तर?
“ओह, यांचं लग्न अगदी सोपं होतं, काही स्पेशल वाटलं नाही!” अशी कुजबुज होते.
कर्ज काढून केलेली श्रीमंती दाखवण्याची ही नवी पद्धत खूप धोकादायक आहे. जेव्हा विवाह समारंभात ‘बजेट’ महत्त्वाचं ठरतं आणि ‘भावना’ मागे पडतात… तेव्हा समाजात एक नवं विष पसरतं. हे फक्त श्रीमंतांची चैन नाही – मध्यमवर्गीयांनीही ते अनुकरण करायला सुरुवात केली आहे…
…आणि मग सुरू होतो कर्जाचा खेळ… आणि जीवनभराचं आर्थिक टेंशन.
हेही वाचा – दोन कन्यादानांतून मिळाले दोन पुत्र
आपल्या संस्कृतीमधलं लग्न… घरगुती चहा, पंगतीत बसून रंगलेली गप्पांची मैफल, एका प्लेटमधून चिवडा लाडू खात एकत्र येणं, वडीलधाऱ्या नात्यातून मिळणारे आशीर्वाद…
हे क्षण आता डेकोरेशनच्या झगमगाटात हरवले आहेत.
शेवटचं मनापासून :
दिसणं महत्त्वाचं नाही, “मिळवलेलं नातं टिकणं” महत्त्वाचं.
फुलांनी सजवलेलं स्टेज, महागडे कपडे, किंवा कोरिओग्राफरचं संगीत – यापेक्षा… नात्याची आपुलकी, साधेपणातला स्नेह आणि मनःपूर्वक दिलेला आशीर्वाद खूप मोठा असतो.
“साधेपणातली श्रीमंती हीच खरी श्रीमंती!”
“दिसण्यासाठी जगणं सोडा – आपुलकीसाठी जगायला शिका.”
तर, कोणाचं लग्न असो… दोन जीव जोडले जात असतील, तर तो आनंदाचा सोहळा आहे – इव्हेंट नाही. तो एक क्षणांचा देखावा नको, तर आयुष्यभराचा आधार ठरावा!


