कुठलीही मोठी ऐतिहासिक घटना घडली की, तिचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे परिणाम त्या काळावर, समाजावर आणि संस्कृतीवर होत असतात. काही परिणाम लगेच दिसतात, तर काही परिणाम पुढची अनेक शतके दिसत राहतात. पंधराव्या शतकाच्या सुमारास जगामध्ये अशाच प्रकारचे मोठे बदल घडत होते.
त्या काळात युरोपमध्ये दोन मोठ्या सागरी सत्ता निर्माण झाल्या होत्या. एक होती स्पेन आणि दुसरी पोर्तुगाल. तेव्हा विमान नव्हते. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याचा आणि व्यापार करण्याचा सर्वांत मोठा मार्ग समुद्र होता. त्यामुळे त्या काळचे गणित अगदी सोपे होते — ज्याची सत्ता समुद्रावर, तोच जगज्जेता.
पोर्तुगालचे खलाशी आफ्रिकेच्या किनाऱ्याने नवीन मार्ग शोधत होते. आपल्याला माहिती असलेला वास्को द गामा याच पोर्तुगालचा. पुढे त्याने समुद्रमार्गे भारत गाठला.
दुसऱ्या बाजूला स्पेनच्या मदतीने ख्रिस्तोफर कोलंबस पश्चिमेकडे निघाला. त्याला भारताकडे जाण्याचा दुसरा मार्ग शोधायचा होता; पण 1492 मध्ये तो अमेरिकेच्या परिसरात पोहोचला.
हेही वाचा – Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान
आणि इथून एक नवीनच प्रश्न निर्माण झाला.
नव्याने सापडणाऱ्या या प्रदेशांवर सत्ता कुणाची असणार? स्पेनची की पोर्तुगालची? दोन्ही महासत्तांमध्ये भांडणे होण्याची शक्यता निर्माण झाली. त्या काळात युरोपमध्ये चर्चचा आणि पोपचा प्रभाव प्रचंड होता. त्यांचा प्रभाव केवळ धर्मापुरता मर्यादित नव्हता; राजकारणामध्येही त्यांचे मोठे स्थान होते. त्यामुळे तत्कालीन पोप अलेक्झांडर सहावा यांनी 1493मध्ये या प्रश्नामध्ये हस्तक्षेप केला आणि नव्याने शोधल्या जाणाऱ्या प्रदेशांवरील अधिकारासाठी एक सीमारेषा सुचवली. त्यानंतर 1494 मध्ये स्पेन आणि पोर्तुगाल यांच्यामध्ये Treaty of Tordesillas हा करार झाला.
सोप्या भाषेत सांगायचे तर, त्यांनी जगाची जणू आपापसात वाटणीच करून घेतली — हा भाग तुमचा आणि तो भाग आमचा. तुम्ही तिकडे जा, आम्ही इकडे जातो!
आजच्या काळात आपण विचार केला तर ही गोष्ट चीड आणणारी वाटते. ज्या प्रदेशांमध्ये आधीपासून लाखो लोक राहत होते, त्यांच्या स्वतःच्या संस्कृती होत्या, भाषा होत्या, राज्ये होती — त्या लोकांना काहीही न विचारता युरोपमध्ये बसलेल्या काही लोकांनी ठरवून टाकले की हा भाग तुमचा आणि हा भाग आमचा!
पण आज आपण त्या घटनेकडे फक्त चीड किंवा रागाने पाहून उपयोग नाही. कारण जे घडून गेले ते बदलता येणार नाही. उलट त्यानंतर काय घडले आणि त्याने जग कसे बदलले, हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण या घटनेनंतर जगाचा इतिहास बदलला, भूगोल बदलला, व्यापार बदलला, लोकांचे खाणेपिणे बदलले आणि पुढे वैद्यकीय शास्त्रसुद्धा बदलले.
पण इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जगामध्ये देवाणघेवाण ही कोलंबसपासून सुरू झालेली नव्हती. त्याच्या कितीतरी आधीपासून सिल्क रूटद्वारे युरोप आणि आशिया यांच्यामध्ये देवाणघेवाण चालूच होती. हा सिल्क रूट केवळ रेशीम किंवा इतर वस्तूंच्या व्यापाराचा मार्ग नव्हता. त्याच मार्गाने माणसे प्रवास करत होती, विचार प्रवास करत होते आणि औषधांचे ज्ञानसुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते.
भारतीय उपखंडातून, चीनमधून आणि आशियातील इतर अनेक देशांमधून वेगवेगळ्या औषधी वनस्पती आणि त्यांची माहिती एका भागातून दुसऱ्या भागात जात होती. भारतीय वैद्यक, चायनीज मेडिसिन आणि त्याच्याबरोबर पुढे विकसित झालेले अरेबिक मेडिसिन यांचा एकमेकांशी संबंध येत गेला. एका ठिकाणचे ज्ञान दुसऱ्या ठिकाणी पोहोचले, त्यात नवीन अनुभवांची भर पडली आणि अशा प्रकारे वैद्यकीय शास्त्र वाढत गेले, फोफावत गेले.
एखादी वनस्पती एका देशातून दुसऱ्या देशात जाणे म्हणजे केवळ ती वनस्पती तिकडे पोहोचणे नव्हते. ती वनस्पती कशासाठी वापरायची, तिचा कोणता भाग वापरायचा, तिचा अर्क कसा काढायचा, कोणत्या आजारात तिचा उपयोग करायचा—हे ज्ञानसुद्धा त्या वनस्पतीबरोबर प्रवास करत होते… आणि जेव्हा युरोप आणि अमेरिकन खंडाचा संपर्क वाढला, तेव्हा या देवाणघेवाणीचे क्षेत्र अचानक प्रचंड मोठे झाले.
यालाच पुढे इतिहासात नाव मिळाले – Columbian Exchange — कोलंबियन एक्स्चेंज.
या एक्स्चेंजमुळे अनेक अशा वनस्पती जगासमोर आल्या ज्या युरोपियन लोकांना पूर्वी कधीच माहिती नव्हत्या. एवढेच नाही, तर त्यातील अनेक वनस्पती भारतीयांनासुद्धा माहिती नव्हत्या. अमेरिकेतील स्थानिक लोक अनेक पिढ्यांपासून काही वनस्पती औषध म्हणून वापरत होते. त्यामुळे केवळ त्या वनस्पतीच बाहेरच्या जगात आल्या नाहीत, तर त्या वनस्पतींचा औषध म्हणून कसा उपयोग करायचा, याचे त्यांच्याकडे असलेले ज्ञानसुद्धा बाहेरच्या जगापर्यंत पोहोचले. त्यामुळे Columbian Exchange म्हटले की फक्त बटाटा, टोमॅटो, मिरची, मका किंवा इतर अन्नधान्य एका खंडातून दुसऱ्या खंडात गेले, एवढेच लक्षात ठेवून चालणार नाही. अन्नधान्य गेले. प्राणी गेले. वेगवेगळ्या वस्तू गेल्या.
हेही वाचा – Homeopathy : मटेरिया मेडिकाची पार्श्वभूमी
पण वैद्यकीय इतिहासाच्या दृष्टीने आणखी एक अत्यंत महत्त्वाची देवाणघेवाण झाली — औषधी वनस्पतींची आणि त्यांच्याबरोबर असलेल्या औषधी ज्ञानाची. या सतत चालत आलेल्या देवाणघेवाणीमुळे मटेरिया मेडिकामध्ये नवीन वनस्पती, नवीन औषधी पदार्थ आणि त्यांच्या उपयोगांची नवीन माहिती सतत जमा होत गेली. त्यामुळे मटेरिया मेडिका हा कधीच एका जागी थांबलेला विषय नव्हता.
जग जसे एकमेकांच्या जवळ येत गेले, तसे एका संस्कृतीचे औषधी ज्ञान दुसऱ्या संस्कृतीपर्यंत पोहोचत गेले. त्यात नवीन अनुभवांची भर पडत गेली आणि मटेरिया मेडिका अधिकाधिक विकसित आणि समृद्ध होत गेला. म्हणून औषधांचा इतिहास हा फक्त वनस्पतींचा इतिहास नाही; तो एका संस्कृतीकडून दुसऱ्या संस्कृतीकडे प्रवास करत गेलेल्या औषधी ज्ञानाचाही इतिहास आहे.


