दीपिकाची घाई झाली होती, आठ पन्नासची तिची बोरिवली फास्टलोकल… पहाटे उठून तिने मुलगा समीरचा डबा करून दिलेला. त्याची सातची शाळा. मग आपला आणि नवऱ्याचा डबा… सासरेबुवा रामराव एकटेच घरी असायचे… त्यांचे जेवण… दुपारी उषा कामाला आली की, ती रामरावांना वाढायची. त्त्यांचे ताट, भांडी धुवून ठेवायची.
दीपिकाला ही गाडी चुकवून चालायचे नाही, कारण वांद्रे स्टेशनवरुन तिच्या कंपनीची बस असायची. तिने पर्स खांद्याला लावली आणि दार उघडून बाहेर पडणार एवढ्यात तिच्या सासऱ्याचा आवाज तिला ऐकू आला…
“दीपाSS त्या वरच्या कपाटात ‘दूरचे दिवे’ नावाचे पुस्तक आहे, ते काढून देतेस?”
दीपिकाने घड्याळात पाहिले. पुस्तक काढत बसले तर, गाडी चुकणार… ती म्हणाली,
“बाबा, संध्याकाळी देऊ का? मला उशीर होईल…”
“अगं, पण मी दिवस कसा घालवू? तुम्ही सर्वजण बाहेर जाता मग माझा वेळ जात नाही…”
चरफडत दीपिकाने कपाट उघडलं आणि त्यांना हवे ते पुस्तक काढून दिले. मग धावत ती बाहेर पडली आणि तिने रिक्षा पकडली… आणि कशीबशी ट्रेन मिळवली.
हेही वाचा – बनिया आणि मराठी कस्टमर
रात्री ती दमूनभागून घरी आली, तर तिचा मुलगा समीर तक्रार करू लागला…
“आई, आजोबा मला सतत हाक मारत रहातात, काही ना काही कामं सांगतात…”
“कसली कामं सांगतात?”
“माझा मोबाइल चार्जिंगला लाव, कधी मित्रांना फोन लाव, माझी पाठ खाजव, माझी नखे कापून दे… त्यामुळे मला खेळायला जायला उशीर होतो.”
“हो, बरोबर आहे. मी सांगते आजोबांना समीरला खेळायला जायचं असतं, त्याला कामं सांगत जाऊ नका म्हणून…”
दुसऱ्या दिवशीची पण तीच तऱ्हा… रोजच्याप्रमाणे दीपाली ऑफिसला जायला निघाली, तसे आजोबा तिला म्हणाले, “दीपा, माझे एक काम कर…”
दीपालीच्या पोटात गोळा आला, आता काय हे सांगतात म्हणून!
“जाता जाता माझे हे पत्र कुरिअर ऑफिसला दे.”
“बाबा, अर्जंट आहे का कुरिअर? उद्या दिलीपला सांगते…”
“अगं, त्याला मी काल सांगितलं, तो म्हणाला दीपाकडे द्या… तो घाईत असतो ना सदा!”
“द्या…” घडयाळाकडे पहात ती म्हणाली. तिला आपल्या नवऱ्याचा राग आला आणि सासऱ्यांचा सुद्धा! दोघेही सगळी कामे आपल्यावर सोपवून देतात. रोज ट्रेन पकडण्याची घाई आणि हे रोजचं… काय हे आपले जीवन? कमवत्या स्त्रीला घरचे करून बाहेर पडायचं… सगळ्यांचे डबे, रोजचे वाणसामान, भाजी, मासे… त्यात मुलाचा अभ्यास… यात आपल्या मुलाकडे आपले दुर्लक्ष होते आहे, असे तिला वाटले. या गडबडीत सासरे बाहेर पडताना रोज काहीतरी काम सांगतात… तिला वाटायचे, यामुळे आपल्या तोंडातून चटकन त्त्यांचा अवमान व्हायचा… ते तसे होता नये. तसा तिला आपल्या सासऱ्यांचा अभिमान होता, मराठीतील ते नावाजलेले कथालेखक होते. तिच्या माहेरच्यांना, तिच्या मैत्रिणींना, ऑफिसमधील सहकाऱ्यांना त्यांचे कौतुक होते. त्यांची अनेक पुस्तके बेस्टसेलर होती. पण तिला ऑफिसमध्ये जाताना रोज उशीर होत होता, हे पण तितकेच खरे!
ती रात्री दिलीपला म्हणाली, “हे बघ, हल्ली काही दिवस मी ऑफिसला जायला निघताना बाबा काम सांगतात. त्यामुळे मला ऑफिसला जायला उशीर होतो..”
“अगं हो… मी सकाळी लवकर बाहेर पडतो, त्यामुळे ते तुला सांगत असतील. पण मी संध्याकाळी घरी आल्यावर माझ्याशी गप्पा मारत रहातात… आईची आठवण काढत राहतात… माझ्या आणि रतनच्या लहानपणाच्या आठवणी काढतात, आईच्या आठवणीने त्यांचे डोळे ओले होतात… खरं सांगू का, बाबा एवढे मोठे लेखक, एवढ्या कथा-कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी, पण आयुष्याच्या या टप्प्यावर ते हळवे होतात. त्यामुळे ते सांगतात ते मी ऐकतो… पण मी त्यांना आता सांगतो, दीपाला ऑफिसला जायच्या वेळी काम सांगू नका.”
“हो, मी पण तेच म्हणते, इतर वेळी त्यांनी सांगितले ते मी ऐकते, पण सकाळी खूप धावपळ असते रे माझी…”
रमेश भिडे हे रामरावांचे जवळचे मित्र. ते कवी. ते बऱ्याच वेळा घरी यायचे, मग दोन मित्रांच्या गप्पाना ऊत यायचा… अनेक ठिकाणी आलेले लेख, कथा, कविता, नवीन नाटके यावर चर्चा… गप्पा मारून, चहा घेऊन रमेशराव घरी जायचे.
रामरावांचा मधुमेह मधेच खूप वाढे. मग दिलीपची धावपळ होई. काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागे. अशाच एका महिन्यात दिलीपने वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होतें, दीपिकाला सुट्टी होती म्हणून ती सासऱ्यांच्या खोलीत गेली. खोली आवरता आवरता तिला त्यांची डायरी सापडली… आपले सासरे काय लिहितात एवढे? ती सहजच त्यांची डायरी चाळू लागली… गेल्या सत्तर वर्षांची.. कॉलेजमध्ये असतानाच्या आठवणी.. मग नोकरी, लेखन… पुस्तके, मिळालेले पुरस्कार… लग्न… मग दिलीप आणि रतन ही दोन मुले… मुलांचे संगोपन, मुले मोठी झाली… रतनचे लग्न… दिलीपचे लग्न… समीरचा जन्म… मग पत्नीचे निधन…
या टप्प्यावर रामराव बदलले… त्यांच्या डायरी लेखनात विष्णणता आली! पत्नीच्या निधनानंतर ते व्यथित झाले. त्यांना आयुष्य भयाण वाटू लागले… ते मुलगा, सून आणि नातवावर विसंबून राहू लागले… रामराव पुढे लिहितात – तरुणपणात मधुमेह आला आणि तो उतारवयात वाढला. दर महिन्याला हॉस्पिटलची वारी… तात्पुरता उपचार, त्यामुळे येणारे इतर रोग… आपले दिवस आता कमी राहिलेत, याची जाणीव झाली आणि मग मुलगा- सुनेचा जास्तीत जास्त सहवास मिळावा म्हणून आपण प्रयत्न करू लागलो. मुलगा दिलीप, सून दीपिका आणि नातू समीर यांनी थोडावेळ तरी आपल्यासोबत काढावा म्हणून रोज सुनेला, दीपिकाला काहीतरी काम सांगू लागलो… संध्याकाळी मुलगा आला की, त्याच्यासोबत जुन्या आठवणी काढू लागलो आणि नातू समीरला खेळायला जायचं असतं, पण त्यालाही काहीतरी काम सांगून आपल्याजवळ बसवू लागलो… मला कल्पना असायची की, त्याना याचा त्रास होतो… दीपिकाची ट्रेन चुकते, समीरला खेळायला उशीर होतो… पण बाळांनो, मला क्षमा करा, माझ्याजवळ वेळ थोडा आहे, मी थोडया दिवसांचा सोबती आहे… म्हणून…
दीपिकाला पुढे वाचवेना. तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहवू लागल्या. तिने डायरी बंद केली आणि ती डोळे पुसत बाहेर आली.
रात्री दीपिकाने नवऱ्याला बाबांच्या डायरीबद्दल सांगितले… त्याला बाबा डायरी लिहितात हे माहीत होते… पण त्याने त्यांची डायरी वाचली नव्हती. दीपिका नवऱ्याला म्हणाली,
‘बाबा रोज ऑफिसला जायच्या वेळी कामे सांगतात म्हणून राग यायचा… पण आता मी माझे काम दहा मिनिटे लवकर संपवेन आणि ती दहा मिनिटे बाबासोबत घालवीन… त्यांच्याशी गप्पा मारीन… त्यांच्या पुस्तकाविषयी बोलेन… दिलीप तू सुद्धा जास्तीत जास्त वेळ त्यांच्याबरोबर घालव… तुझी कामे दहा मिनिटे लवकर संपव. मी समीरला पण सांगेन, दहा मिनिटे उशिरा खेळायला जा, ती दहा मिनिटे आजोबाना दे! शेवटी त्यांना काय हवंय? तर, आपली रोजची फक्त दहा मिनिटे!
दुसऱ्यादिवसापासून दीपिका आपली कामं लवकर आवरू लागली आणि दहा मिनिटे सासऱ्यासोबत घालवू लागली. दिलीप संध्याकाळी घरी आला की, बाबासमवेत गप्पा मारू लागला… त्यांना घेऊन बागेत जाऊ लागला. समीर शाळेत जाताना-येताना आजोबाच्या बाजूला बसू लागला…
हेही वाचा – लग्नाची बेडी अन् स्वच्छंद आयुष्य!
गेली काही वर्षे खंगलेले रामराव आता टवटवीत दिसू लागले. त्यांचे घरातील बोलणे, हसणे वाढले. आपल्या मित्राचा बदललेला मूड रमेशरावांच्या लक्षात आला. ते मित्राला म्हणाले,
“राम्या.. पूर्वीपेक्षा आता तू आनंदी दिसतोस.. वहिनी गेल्यापासून नर्व्हस असायचास”
“होय रमेश.. माझा मुलगा, सुन आणि नातू माझी खूप काळजी घेतात.. माझ्याशी बोलतात.. गप्पा मारतात. आणि मला काय हवंय? त्यांच्या प्रेमाचे टॉनिक मला मिळतेय..”
“होय.. आहेस बाबा तू भाग्यवान…”
अचानक एका रात्री मधुमेह खूप वाढला आणि हॉस्पिटलला पोचण्याआधी रामराव निधन पावले.
माणसे जमली… मित्र जमले, वाचक, नातेवाईक जमले. सर्वजण म्हणत होते… रामराव गेले, पण त्यांचा चेहेरा प्रसन्न होता.. आंनदीत होता…
दीपिका हे ऐकत होती, नातेवाईकांचे बोलणे ऐकून तिला समाधान वाटले.. शेवटी आपले सासरे समाधानाने गेले… आपण तिघांनी काय केले? त्यांना थोडा वेळ दिला… त्याने त्यांना आनंद मिळाला… किती लहानशी गोष्ट… एक छोटीसी बात!


