2000 पासून 2011-12 पर्यंत आम्ही दरवर्षी मुलाकडे अमेरिकेला जात असू. कधी कधी तर वर्षातून दोनदा पण, कारण नातवंडं लहान होती. त्यांचं बाल्य अनुभवायला, त्यांच्याबरोबर खेळायला आम्हाला खूप आवडायचं.
तेव्हा वर्तमानपत्रं वाचताना… आता मला आठवण नाही कोणता रकाना तो… पण त्यात स्त्रियांचे प्रश्न आणि त्याची उत्तरं असायची. आपल्याकडे पूर्वी ‘ उषाताईचा सल्ला’ असायचा त्या प्रकारे!
त्यात ‘ How is / was he in bed?’ हे अत्यंत महत्वपूर्ण आणि प्रामुख्याने असायचं. मला त्या काळात वाचताना ते अजब वाटायचं! अनेक अर्थांनी.
हेही वाचा – काय पण एकेक आठवणी असतात!
अलिकडेच पुण्यातील लोहगड किल्ला अपघात (केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण) म्हणजे प्रत्यक्षात अपघाताचा बनाव करून रचलेला एक पूर्वनियोजित प्रकार आणि इतर ठिकाणी साधारणपणे अशाच प्रकारच्या घडलेल्या दुर्घटनांबद्दल निरनिराळ्या पोस्ट वाचताना… त्यातील गुन्हेगार मुलींची जबानी वाचताना हे बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेलं प्रकर्षाने आठवलं.
आज काळ बदलला आहे. अन्न, वस्त्र, निवारा केवळ याच गोष्टींसाठी मुली लग्न करत नाहीत. हे सर्व त्या स्वबळावर मिळवत असतात किंवा त्यांच्या पालकांकडून सहजपणे त्यांना मिळत असतं. एक काळ होता असा… हक्काच्या अन्न, वस्त्र, निवारा यासाठी मुली ‘चांगल्या’ स्थळाशी लग्न करायच्या आणि वाटेल त्या हाल अपेष्टा सोसून ते लग्न टिकवायच्या पण!
आता आपल्याकडे पण, सगळ्याच राहणीमानावर बऱ्याच प्रमाणात पाश्चात्य संस्कृतीचा जसा प्रभाव पडला आहे, त्याचप्रमाणे विचारांवर पण पडला आहे. मुली आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजांना महत्व द्यायला लागल्या आहेत. त्यामुळे मुलाकडचे म्हणतात की, मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
मुलींच्या या अपेक्षा आधीही होत्या. पण त्या उघड करू शकत नव्हत्या, बोलू शकत नव्हत्या. मिळेल ते स्वीकारत होत्या.
हेही वाचा – … तर लाइक कराच!
आजच्या काळात, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असणाऱ्या समाजात तरी स्त्रीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा मान्य केल्या जात आहेत. जशा आजपर्यंत मुलांच्या मान्य केल्या जात होत्या. म्हणजे होणारी बायको ही गोरी, सुंदर, मिळवती, गृहकृत्यदक्ष असावी इत्यादी.
त्यामुळे मुलींनी स्पष्टपणे आपल्या पालकांशी बोलावं. मुख्य म्हणजे पालकांनी आपला आर्थिक, सामाजिक दर्जा, लोक काय म्हणतील याची दहशत बाजूला ठेवून मुलांच्या मताला, त्यांच्या सुखाला अग्रक्रम द्यावा. मुलं जर चुकीच्या निर्णयामुळे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार असतील, आपल्या आयुष्याची भविष्यात दुर्दशा करुन घेणार असतील तर तज्ज्ञांकडून त्यांचं समुपदेशन करुन घ्यावं.
आज केवळ 2 ते 3 वर्षांच्या अंतराने एका पिढीचा फरक पडतो आहे. मग पालक आणि मुलं यांच्यामध्ये तर किती पिढ्यांचं अंतर पडतं आहे. मुलांचे प्रश्न, ताण, विचार पालक म्हणून आपण पूर्णपणे, स्वानुभवाने नाही समजू शकत. आपला अनुभव तोकडा पडतो आहे. त्यामुळे तिथे सामंजस्याची आणि तज्ज्ञांचीच आवश्यकता आहे.
मुलांनी, मुलींनी एकमेकांशी आणि पालकांशी स्पष्ट बोलावं. मुख्य म्हणजे पालकांनी मुलांचं म्हणणं, त्यांचे विचार, त्यांचं सांगणं लक्षपूर्वक, त्यांच्या मताचा योग्य सन्मान ठेवून ऐकावं. आपलं म्हणणं त्यांच्यावर लादावं असं नाही, त्याचप्रमाणे त्यांचं चुकीचं स्वीकारावं असंही नाही. यात संतुलन राखलं पाहिजे. त्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. धीर धरला पाहिजे. पालकांची जबाबदारी वाढली आहे आणि मुलांनीही पालकांशी चांगले संबंध ठेवणं आणि वैचारिकदृष्ट्या आपण प्रगल्भ होणं ही आपली जबाबदारी मानली पाहिजे.


