‘मटेरिया मेडिका’ची कल्पना एका दिवसात किंवा एका माणसाच्या डोक्यातून निर्माण झालेली नव्हती. अनेक शतकांमध्ये अनेक वैद्यांनी, अभ्यासकांनी आणि प्रवाशांनी त्यात आपापल्या अनुभवाची भर घातली आणि औषधांविषयीचे हे ज्ञान सतत विकसित होत गेले. या इतिहासात सर्वप्रथम ठळकपणे समोर येणारे नाव म्हणजे पेडॅनियस डायोस्कोरिडीस (Dioscorides).
इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेला डायोस्कोरिडीस हा ग्रीक वैद्य होता. त्याने मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. वेगवेगळ्या प्रदेशांतील वनस्पती, औषधी पदार्थ आणि त्यांचे स्थानिक उपयोग यांचा त्याने अभ्यास केला. केवळ दुसऱ्यांनी सांगितले म्हणून नोंद करण्यापेक्षा वनस्पती प्रत्यक्ष पाहणे, त्यांच्याविषयी उपलब्ध माहिती गोळा करणे आणि त्यांचा वैद्यकीय उपयोग समजून घेणे, असा त्याचा प्रयत्न होता.
या प्रचंड अभ्यासातून त्याने पाच खंडांचा एक ग्रंथ लिहिला— De Materia Medica.
त्यात सुमारे सातशे वनस्पतींसह एक हजाराहून अधिक औषधी पदार्थांची माहिती आढळते. वनस्पती कशी ओळखायची, ती कुठे मिळते, तिचा कोणता भाग वापरायचा, औषध कसे तयार करायचे आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो—अशी अत्यंत विस्तृत माहिती त्याने नोंदवली.
हेही वाचा – Homeopathy : हॅनिमनला प्रश्न पडला…
आजच्या भाषेत सांगायचं तर, हा केवळ औषधांचा संग्रह नव्हता; औषधांविषयी उपलब्ध असलेले ज्ञान एका ठिकाणी आणण्याचा तो त्या काळातील एक विलक्षण प्रयत्न होता आणि त्याचे महत्त्व इतके होते की, पुढची जवळजवळ दीड हजार वर्षे De Materia Medica चा प्रभाव युरोप आणि आसपासच्या वैद्यकीय जगतावर टिकून राहिला.
पुढे अरब जगतात वैद्यकशास्त्राला नवी गती मिळाली. त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचे नाव पुढे आले— इब्न सिना—ज्याला युरोपने Avicenna या नावाने ओळखले.
इब्न सिनाने आधीच्या ग्रीक वैद्यकीय ज्ञानाचा अभ्यास केला, त्यात स्वतःचे निरीक्षण आणि तत्कालीन अरब-पर्शियन वैद्यकीय ज्ञानाची भर घातली आणि The Canon of Medicine सारखा प्रचंड ग्रंथ तयार केला. औषधी पदार्थांचे गुणधर्म, त्यांचे उपयोग आणि औषधांचा अभ्यास कसा करावा या सगळ्याच गोष्टी त्याने अधिक व्यवस्थित स्वरूपात मांडल्या.
म्हणजे औषधांविषयीचे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होते. प्रत्येक पिढी त्यात काहीतरी भर घालत होती.
या प्रवासात पुढे आणखी एक रंगतदार व्यक्तिमत्त्व येते – निकोलस कल्पेपर (Nicholas Culpeper). कल्पेपरला आजच्या परिभाषेत डॉक्टर म्हणायचे की, herbalist, apothecary आणि physician-astrologer म्हणायचे, याबद्दल इतिहासात चर्चा आहे. पण एक गोष्ट निश्चित होती— सतराव्या शतकातील इंग्लंडमध्ये तो अत्यंत लोकप्रिय झाला होता.
त्याचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास होता. ग्रह, तारे, राशी आणि औषधी वनस्पती यांचा परस्पर संबंध आहे, अशी त्याची धारणा होती. आज आपल्याला हे वैज्ञानिक वाटणार नाही; पण त्या काळातील वैद्यकीय विचार समजून घेताना हे लक्षात घ्यावे लागते की विज्ञान, लोकपरंपरा, वनस्पतींचे प्रत्यक्ष ज्ञान आणि ज्योतिष यांच्यामधील सीमा आजच्या इतक्या स्पष्ट नव्हत्या.
कल्पेपरचे आणखी एक वैशिष्ट्य मात्र फार महत्त्वाचे होते. त्याला वैद्यकीय ज्ञान केवळ डॉक्टरांच्या हातात बंदिस्त राहू द्यायचे नव्हते.
त्या काळातील महत्त्वाचे वैद्यकीय ग्रंथ सामान्य माणसाला न समजणाऱ्या लॅटिन भाषेत असत. कल्पेपरने औषधी वनस्पती आणि उपचारांविषयीचे ज्ञान इंग्रजी भाषेत सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याचे The English Physitian, पुढे Culpeper’s Complete Herbal म्हणून प्रसिद्ध झालेले पुस्तक, अत्यंत लोकप्रिय झाले.
हेही वाचा – Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान
अशा अनेक प्रयत्नांतून मटेरिया मेडिका सतत बदलत आणि वाढत राहिला.
आणि मग अठराव्या शतकाच्या अखेरीस या प्रवासात आणखी एक अत्यंत महत्त्वाचे नाव आले—एडिनबरोचे प्रख्यात चिकित्सक आणि प्राध्यापक विल्यम कुलन (William Cullen).
कुलनचा A Treatise of the Materia Medica हा दोन खंडांचा ग्रंथ 1789 मध्ये प्रकाशित झाला. त्या काळातील औषधे, त्यांचे गुणधर्म, शरीरावर होणारे परिणाम आणि चिकित्सेतील उपयोग यांची त्याने विस्तृत मांडणी केली होती. त्यामुळे युरोपातील वैद्यकीय जगतात या ग्रंथाला मोठी प्रतिष्ठा मिळाली.
आता इथे आपल्या कथेत हॅनिमनचा प्रवेश होतो. कुलनचा हा महत्त्वाचा ग्रंथ इंग्रजीत होता आणि हॅनिमनला अनेक भाषा उत्तम प्रकारे अवगत होत्या. 1790 मध्ये त्याने कुलनच्या Materia Medica चे जर्मन भाषांतर केले. पण हॅनिमन हा केवळ शब्दांचे भाषांतर करणारा माणूस नव्हता.
तो वाचत होता.
तो विचार करत होता.
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—
तो प्रश्न विचारत होता.
“या औषधाबद्दल हे लिहिलं आहे, पण हे खरं कशावरून?”
“एखाद्या औषधाचा हा परिणाम होतो असं आपण म्हणतो, पण तो कोणी प्रत्यक्ष तपासून पाहिला आहे का?”
आणि इथेच मटेरिया मेडिकाच्या इतिहासाला एक विलक्षण वळण मिळणार होते.
डायोस्कोरिडीसपासून इब्न सिना, कल्पेपर आणि कुलनपर्यंत मटेरिया मेडिका सतत विकसित होत गेला होता. तो कधीही स्थिर नव्हता. प्रत्येक पिढीने आधीच्या ज्ञानात काहीतरी भर घातली, काही स्वीकारले आणि काही बदलले.
पण हॅनिमनने पुढे एक वेगळाच प्रश्न विचारला—
“आपण औषधांबद्दल जे काही लिहितो आहोत, त्यातलं खरं किती आणि गृहीत धरलेलं किती?” कदाचित म्हणूनच पुढे आपल्या स्वतःच्या ग्रंथाला त्याने एक अत्यंत बोलके नाव दिले—Materia Medica Pura — ‘शुद्ध मटेरिया मेडिका’.
हॅनिमनला आपल्या मटेरिया मेडिकाला ‘Pura’—शुद्ध—असे का म्हणावेसे वाटले? त्याची गोष्ट आपण पुढच्या भागात पाहू.


