अध्याय पंधरावा
तें ऊर्ध्व आत्मा निर्मळें । अधोर्ध्व सूचिती मूळें । बळिया बांधोनि आळें । मायायोगाचें ॥91॥ मग आधिलीं सदेहांतरें । उठती जियें अपारें । ते चौपासि घेऊनि आगारें । खोलावती ॥92॥ ऐसें भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ । मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी ॥93॥ तेथ् चिद्वृत्ति पहिलें । महत्तत्त्व उमललें । तें पान वाल्हेंदुल्हें । एक निघे ॥94॥ मग सत्त्वरजतमात्मकु । त्रिविध अहंकारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ॥95॥ तो बुद्धीची घेऊनि आगारी । भेदाची वृद्धि करी । तेथे मनाचे डाळ धरी । साजेपणें ॥96॥ ऐसा मूळाचिया गाढिका । विकल्परस कोंवळिका । चित्तचतुष्टय डाहाळिका । कोंभैजे तो ॥97॥ मग आकाश वायु द्योतक । आप पृथ्वी हें पांच फोंक । महाभूतांचें सारोख । सरळे होती ॥98॥ तैसींचि श्रोत्रादि तन्मात्रें । तियें अंगवसां गर्भपत्रें । लुळलुळितें विचित्रें । उमळती गा ॥99॥ तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रा वाढी देव्हडी । होता करित कांडीं । आकांक्षेचीं ॥100॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : श्रीकृष्णोक्तिसागरा, हा अगस्तीचि दुसरा
अर्थ
वेदांतामधे प्रतिपादन करावयाच्या भाषेत, यास वरीलप्रमाणे प्रसिद्धी आहे, परंतु ते राहू दे. या सर्वास कारण अज्ञान आहे. ॥90॥ त्या उपाधिरहित व सर्वांचे पलीकडे असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी मायेचा दृढ संबंध होणे हे आळे तयार होऊन, त्यातील मुळे संसारवृक्षाचा खालचा व वरचा भाग दाखवतात. ॥91॥ मग अपार असे निरनिराळे देह खाली चोहीकडे अंकुर घेऊन खोल जातात. ॥92॥ असे जे संसारवृक्षाचे मूळ (माया) ते वरच्या बाजूस (ब्रह्माच्या ठिकाणी) बळ बांधण्यास लागले, म्हणजे मग अग्राचे जुंबाडेच्या जुंबाडे खाली येतात. ॥93॥ त्या जुंबाड्यात, चिद्वृत्ती म्हणजे जी माया, त्या मायेपासून पहिल्या प्रथम महतत्व हेच एक उमललेले कोवळे लुसलुशीत पान निघते. ॥94॥ मग त्या पानास सत्वरजतमात्मक जो तीन प्रकारचा अहंकार आहे, तोच खाली मुख असलेला असा तीन पानांचा एक शेंडा फुटतो. ॥95॥ तो (त्रिगुणात्मक अहंकार सत्वापासून उपन्न होणार्या) बुद्धीचे शेंडे घेऊन भेदाची वृद्धी करतो, तेव्हा टवटवीत अशा मनाची डहाळी वाढावयास लागते. ॥96॥ याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन, बुद्धी, चित्त, अहंकाररूपी लहान फांद्या, या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात. ॥97॥ मग (तामस अहंकारापासून उत्पन्न होणार्या) आकाश, वायु, तेज, उदक व पृथ्वी, या पंचमहाभूतांचे फोक सरळ जोराने फुटतात. ॥98॥ त्याचप्रमाणे श्रोत्रादी पंचज्ञानेंद्रिये व सूक्ष्म विषय, ती ढगळ्यांचे शेवटास असलेली (व) पूर्णपणे न उमललेली लुसलुशीत, एकसारखी एक नसलेली (अशी) पाने व्यक्त होतात. ॥99॥ तेव्हा शब्दांकुरापर्यंत श्रोत्राची मोठी वाढ होत असता श्रोत्रेंद्रिय हे विषयाविषयीच्या आशेचे कांडे तयार करते. ॥100॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : घन अज्ञानसुषुप्ती, तो बीजांकुरभावो म्हणती


