दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते दिव्यांचा लखलखता प्रकाश, घरभर दरवळणारा फराळाचा सुगंध, रांगोळ्यांचे रंग आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद! पण कधी विचार केलाय का, की दिवाळीची तयारी म्हणजे केवळ घराची स्वच्छता, फराळाची लगबग किंवा सजावट नसते. ती एक प्रकारे मनाची साधना असते… एक सुंदर मेडिटेशन!
दिवाळीची स्वच्छता करताना आपण घरातला प्रत्येक कोपरा स्वच्छ करतो. कित्येक दिवसांपासून एका कोपऱ्यात पडून असलेल्या वस्तू हातात घेतो. काही जपून ठेवतो, काही सोडून देतो. नको असलेल्या गोष्टी बाहेर काढताना नकळत मनात साठलेली धूळही झटकली जाते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि नव्या सुरुवातीसाठी जागा तयार होते.
आणि मग सुरू होते फराळाची तयारी!
फराळ तयार करताना काही पदार्थांना हवी गरम तेलाची फोडणी, कुणाला गरम तुपाची, तर काही पदार्थांना अगदी गार फोडणीच योग्य असते. प्रत्येक पदार्थाचा स्वभाव वेगळा, त्याची गरज वेगळी! मंद आचेवर काही पदार्थ भाजताना वेळ द्यावा लागतो. घाई केली तर ते करपतात आणि लक्ष दुसरीकडे गेलं तर रंग बदलतात. भाजणीचा तो मंद सुगंध दरवळत असताना हाताने सतत ढवळत राहावं लागतं. जणू काही स्वतःलाच सांगत असतो, ‘थोडा धीर धर, प्रत्येक गोष्टीला तिचा वेळ द्यावा लागतो.’
काही पदार्थ गरम तेलात तळायचे असतात, तर काहींना तेलाचं तापमान अगदी मोजून हवं असतं. तेल कमी गरम असेल तर पदार्थ तेलकट होतात आणि जास्त गरम असेल तर क्षणात रंग बदलतात.
अगदी आयुष्यासारखंच नाही का हे?
फराळ करताना देखील कुठे ऊब हवी, कुठे थंडावा, कुठे संयम, तर कुठे योग्य वेळी केलेली कृती! आणि मापं तर विचारायलाच नकोत! थोडंसं मीठ जास्त झालं, साखर कमी पडली किंवा पाणी जास्त झालं की पदार्थ आपल्याला हसवतात… कधी फसवतातसुद्धा! पण या सगळ्या गडबडीतही एक गंमत असते. चुकलेला पदार्थ पुन्हा सावरायचा प्रयत्न, कधी नवीन प्रयोग, कधी घरच्यांचे सल्ले, तर कधी सगळ्यांनी मिळून केलेली चेष्टा!
या सगळ्यात आपण वेळेचं भान विसरतो. हात कामात गुंतलेले असतात, मन मात्र प्रत्येक क्षणात रमलेलं असतं. मला वाटतं, हेच तर खरं मेडिटेशन!
हेही वाचा – तीन मित्र
मेडिटेशन म्हणजे नेहमी डोळे मिटून शांत बसणं असतं असं नाही. कधी कणीक मळताना तिच्या मऊपणात मन रमवणं, कधी लाडू वळताना हातातला स्पर्श अनुभवणं, कधी चकल्या पाडताना त्या गोलाकार रेषांमध्ये गुंतणं, तर कधी चिवड्याचा खमंग वास मनापासून अनुभवणं… हेही मेडिटेशनच!
फराळ करताना आपण फक्त पदार्थ तयार करत नसतो, तर त्यात आपल्या माणसांसाठीचं प्रेम, काळजी, आठवणी आणि आनंद मिसळत असतो. प्रत्येक लाडवात थोडी माया, प्रत्येक चकलीत थोडा संयम, प्रत्येक करंजीत थोडं कौशल्य आणि प्रत्येक चिवड्यात थोडीशी खट्याळ गंमत मिसळलेली असते. आणि म्हणूनच दिवाळीचा फराळ कधीच फक्त खाण्यापुरता मर्यादित नसतो. त्यात आईच्या हातांची ऊब असते, आजीच्या पाककृतींचा वारसा असतो, बहिणींच्या गप्पा असतात, मुलांच्या आवडी असतात आणि एकत्र घालवलेल्या क्षणांची गोडी असते.
दिवाळीची स्वच्छता घराला उजळवते, फराळ घराला सुगंधित करतो आणि या सगळ्या प्रक्रियेत मनालाही एक वेगळीच प्रसन्नता मिळते. म्हणून यंदा दिवाळीची तयारी करताना घाई नको, परिपूर्णतेचा अट्टहास नको, प्रत्येक पदार्थ अगदी तसाच झाला पाहिजे हा आग्रहही नको. काही लाडू फुटले तर हसूया, काही चकल्या वाकड्या झाल्या तर त्यांचं वेगळेपण स्वीकारूया आणि एखादा पदार्थ फसला तर त्यातूनही काहीतरी शिकूया. कारण शेवटी दिवाळीचा खरा आनंद पदार्थांच्या चवीत नसतो, तर ते बनवताना आपण अनुभवलेल्या क्षणांत असतो.
हेही वाचा – एका मुठीतील आनंद…
घर स्वच्छ करताना मन स्वच्छ होतं, फराळ करताना मन रमतं आणि आपल्या माणसांसोबत हे सगळं करताना मन समृद्ध होतं! कदाचित म्हणूनच दिवाळी हा केवळ सण नाही… ती स्वतःशी जोडून घेण्याची, नात्यांना उजाळा देण्याची आणि आयुष्याच्या छोट्या छोट्या क्षणांत आनंद शोधण्याची एक सुंदर संधी आहे. दिवाळीचा फराळ म्हणजे फक्त जिभेची मेजवानी नाही, तर मनासाठीचं एक सुंदर मेडिटेशन आहे!
आणि या मेडिटेशनचा शेवट होतो तो एका सुंदर सुगंधाने दरवळणाऱ्या, ताटभर फराळाने आणि मनभर समाधानाने…
शुभ दीपावली!


