दिवाळी म्हटली की दरवर्षी बालपणीच्या गोड आठवणींचा पट हळूहळू नजरेसमोर उलगडत जातो आणि सगळ्यात आधी डोळ्यासमोर उभा राहतो तो दिवाळीतील पहाटेच्या अभ्यंगस्नासाठी सकाळी चार वाजता आईने सर्वांना गरम पाणी मिळावे म्हणून पेटवलेला पाण्याचा बंब. सुगंधित उटण्याचा सुवास, हार फुलांचा, सुगंध आसमंतात दरवळतो. दरवाजाला लावलेली सुबक आणि रेखीव तोरणे डुलतांना दिसतात. घराच्या छतावर उंच जागी रंगीबेरंगी आकाशकंदील दिमाखात लटकलेले दिसतात, फटाक्यांची आतषबाजी, फुलबाजीच्या असंख्य चांदण्या आणि अनाराचे कारंजे डोळ्यासमोर चमकत थुईथुई नाचतांना दिसते.
दणदणीत आवाजाच्या सुतळी बॅाम्बशिवाय तर दिवाळी अपूर्णच असते. भुईचक्र, काळ्या गोळ्यांमधून तयार होणारे सापाचे वेटोळे, काचेच्या बाटलीतून उंच आकाशात झेपावणारे रॉकेट हे सगळेच मनाच्या कोपऱ्यात फेर धरुन नाचत असतात. लवंगी फटाक्यांच्या लडी ताडताड इकडे तिकडे उडतांना दिसतात, दिवाळी म्हणजे वर्षभराचा आनंद चार दिवसांत मिळवून देणारा आप्तेष्टांच्या सहवासाचा, इष्टमित्रांच्या भेटीचा, लेकी सुनांच्या आणि भावाबहिणींच्या कोड कौतुकाचा सण, जो मायेने सगळ्यांना त्याच्या आनंदात नहायला भाग पाडतो.
दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर येतो तो खमंग फराळाचा घमघमाट! चकली, चिवडा, करंजी सगळेच आवडीचे आणि खास असतात. पण फराळाच्या ताटात मध्यभागी अगदी दिमाखात आणि डौलाने बसलेला असतो तो आपला लाडका ‘बेसनाचा लाडू’!
हा लाडू म्हणजे नुसता गोड पदार्थ नाहीये हो, तर तो आपल्या बालपणीच्या अनेक सुंदर आठवणींचा आणि आईच्या किंवा आजीच्या प्रेमाचा आरसा आहे. बेसन खमंग भाजताना संपूर्ण घरात जो दरवळ सुटतो, तीच खऱ्या अर्थाने दिवाळीच्या आगमनाची पहिली नांदी असते. मंद आचेवर तूप आणि बेसन एकत्र भाजत असतानाचा तो सोहळा म्हणजे एक प्रकारची तपश्चर्याच! याकरता खूप संयम लागतो.
आज कितीही ब्रँडेड चॉकलेट्स किंवा मिठाई जरी आपल्या पारंपरिक पदार्थांमध्ये समाविष्ट होत असली तरी, त्या एका लाडवाच्या गोडीची सर कशालाच येऊ शकत नाही. दर वेळेस फराळाचे कमी करु असं म्हणता म्हणता मुलांकडून आणि काही जवळच्या नातेवाईकांकडून आपल्या काही खास पदार्थांची जेव्हा आवर्जून मागणी होते तेव्हा आपण जास्त उत्साहात येऊन त्यांची ती खास मागणी पूर्ण करण्याकरता तयार होतो. मी केलेले बेसनाचे लाडू कधीच फसत नाहीत हे मी आत्मविश्वासाने सांगते. यात अतिशयोक्ती काहीच नाही, कारण बेसनाचे लाडू तयार करण्यात माझा हातखंडा आहे हे 100 % खरं आहे.
हेही वाचा- Recipe : विदर्भातील पारंपरिक पदार्थ गुळशेल!
दिवाळीचा फराळ घरी तयार करण्यात एक वेगळीच मजा आहे, काहींचे प्रमाण बिघडले, काही पदार्थ परफेक्ट झाले तरी हरकत नाही! हे तर व्हायलाचं हवं, घडलंय बिघडलंय करतचं संसार करायचा असतो. चुकांमधूनच मनुष्य घडत असतो नाही का? आपले पदार्थ चुकतात, जे आपल्याला जमतचं नाही त्याच्या वाटेला कशाला जायचे? हे मनात आणूचं नये असं मला वाटत. ‘Practice makes man perfect.’ असं उगाच म्हटलं जातं नाही! बाकी काय आजकाल बाजारात तर सगळचं विकत मिळत, परंतु आपण मेहनतीने केलेल्या कुठल्याही कामाची सर बाजारातील तयार वस्तूंना येत नाही! ‘मेहनत का फल मीठा होता है’ हे अगदी खरं आहे. त्याचे कौतुक झाले आणि प्रेमाची एक थाप पाठीवर पडली की त्याचा मनस्वी आनंद होतो हे खरं आहे की नाही?
बेसनाच्या लाडवाशिवाय दिवाळीचा फराळ अपूर्णच वाटतो. त्याकरताचं मी घरी तयार केलेल्या बेसनाच्या लाडवाची कृती खाली दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्हीदेखील तुमच्या घरी हे लाडू तयार करा व त्याच्याबरोबर दिवाळीच्या फराळाचा आनंद घ्या! नवशिक्या मुलींकरता तर ही पद्धत अतिशय सोपी आहे!
बेसनाच्या लाडवाची अचूक प्रमाणासह कृती!
साहित्य-
- तीन वाट्या थोडे रवाळ दळलेले बेसन
- दीड ते दोन वाट्या पिठी साखर
- एक मोठी वाटी तूप (म्हणजे साधारणपणे 200 ते 250 ग्रॅम)
- वेलची पावडर एक टीस्पून
- वरुन लावायला काजू, बदामाचे तुकडे किंवा किसमीस (आपापल्या आवडीनुसार घ्यावे.)
कृती –
- सर्वप्रथम अर्धा वाटी तूप कढईत घेऊन ते गरम झाले की मग त्यात बेसन घालावे आणि मंद आचेवर त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यावे. सुरवातीला बेसन खूप कोरडे भाजले जात आहे असं वाटेल. पण काळजी करण्याचे कारण नाही.
- बेसनाच्या गुठळ्या मोडत मंद आचेवर बेसन सतत परतत रहावे.
- पंधरा मिनीटांनी बेसनाच्या गाठी मोडल्यावर बेसन जेव्हा एकसारखे होईल तेव्हा उरलेल्या तुपातले दोन तीन चमचे तूप बाजूला काढून बाकीचे तूप बेसनात टाकावे.
- परत तूप आणि बेसन एकत्र करुन बेसनाचा रंग बदलेपर्यंत जवळपास पंचेचाळीस मिनिटे मंद गॅसवर बेसन भाजत रहावे.
- 45 मिनिटांनी बेसनाचा रंग बदलेल आणि खमंग असा सुवास येईल.
- बेसन थोडे तांबूस रंगाचे झाले की गॅस बंद करुन बेसन थंड व्हायला ठेवावे.
- अंदाजे पाऊण तासाने बेसन थंड झाल्यावर त्यामध्ये दीड ते दोन वाट्या साखर आणि एक टीस्पून वेलची पूड घाला
- आता बेसन आणि पिठीसाखर एकजीव करुन घ्या.
- नंतर याचा लाडू तयार करतांना हाताच्या मुठीत मावेल एवढे मिश्रण हातावर घेऊन ते दाबत, चारही बाजूंनी गोल गोल फिरवत, हातावर खेळवत वाटोळा आकार द्यावा.
- अशा प्रकारे एकेका लाडवाला गरगरीत आकार देऊन सर्व लाडू तयार करुन घेतले की त्यावर काजू, बदामाचे तुकडे किंवा किसमिस लावावे.
विशेष टीप्स-
- बेसनाचा लाडू तयार करतांना सुरवातीलाचं एकदम सगळे तूप कढईत टाकायचे नाही कारण कधी कधी तूप जास्त झाले तर लाडू नीट वळले जात नाहीत ते पसरतात.
- भाजलेल्या गरम बेसनात लगेच पिठीसाखर टाकू नये . गरम बेसनात पिठीसाखर विरघळल्यामुळे लाडवांना गोल आकार देता येणार नाही
- या लाडवाकरता बेसन भाजतांना त्याचे टेक्श्चर पाहून तूप नेहमी गरम करुन जसे लागेल तसे वापरावे. त्यामुळे लाडू पसरत नाहीत.
एखाद्या लहान गोड व गोंडस मुलाच्या चेहऱ्यावरून आपण जसा मायेने हात फिरवतो तसा त्या लाडवांवरुन परत एकदा प्रेमाने हात फिरवत न्यावा आणि मग डब्यात भरून ठेवावे. या लाडवांना इतक्या लडिवाळपणे हाताळल्यावर त्यांचे रुप खुलणारच नाही का?
हेही वाचा- Recipe : विदर्भ स्पेशल… टुट्टुमियाच्या शेंगांचे लोणचे!
बेसनाचे लाडू माझ्या तर फार आवडीचे आहेत. त्यामुळे त्याची आठवण येताच माझ्या मनातील हे साधे सोपे भाव शब्दरुपातून लेखणीत उतरले. आज पुन्हा एकदा नव्याने बालपणीचा तो काळ आठवला. आईने तयार केलेले बेसनाचे लाडू खाण्याकरत्ता किती युक्त्या कराव्या लागायच्या ते आठवलं की हसायला येत. फडताळातल्या डब्यातून हळूच लाडू काढायला हात सरसावणे, लाडू हळूच घेतांना डब्याचा आवाज होईल का? याची भीती वाटणे आणि ती चोरी करतांना नेमके आईच्या नजरेत अलगद पकडले जाणे…आणि मग त्याकरता तिचा ओरडा किंवा कधीकधी पाठीवर एखादा धपाटा मिळायचा. तेव्हा रडू यायचे पण त्या लपाछपीच्या खेळात खरचं किती मजा होती हे मोठे झाल्यावर लक्षात आले. आजही त्या आठवणी मनाला भुलवतात आणि ते सुख आठवून डोळ्यांमध्ये आनंद अश्रू तरळतात.
सोन्यासारखा रंग अन तूप साजूक छान, बेसनाचा लाडू म्हणजे तमाम गृहिणींचा मान!
हा लाडू तोंडात टाकताच विरघळतो क्षणार्धात, अमृतच जणू भरलेलं त्याच्या प्रत्येक कणात!
दिवाळीची ही गोडी कधी ना संपणारी, पिढ्यानपिढ्या चालणारी ही घरोघरची परंपरा न्यारी!
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!


